`चाँद तारों को छुने की आशा...!'
पहिली भारतीय अंतराळवीर कल्पना चावला आजच्याच दिवशी अंतराळातच अनंतात विलिन झाली. कल्पनाला अमेरिकेत वारंवार भेटण्याची संधी भारतकुमार राऊत यांना मिळाली. या भेटींचे रुपांतर मैत्रीत झाले. ही मैत्री अखेरपर्यंत टिकली याच मैत्रीच्या आठवणी भारतकुमार राऊत यांनी आपल्या 'स्मरण' या स्मति-संग्रहात जाग्या केल्या आहेत. त्याचाच काही भाग तुमच्यासाठी..
तुम्ही जर एकटे राहात असाल आणि क्लब संस्कृतीत रमणारे नसाल, तर अमेरिकेतला विक-एंड जीवघेणा वाटायला लागतो. शुक्रवार संध्याकाळपासून रविवारच्या रात्रीपर्यंतचा काळ एकलकोंड्यासारखा काढावा लागतो. `झी नेटवर्क'च्या अमेरिकेतील स्थापनेच्या काळात त्या देशात राहताना अशा अवस्थेत कुणाला तरी भेटावे, निदान थोडा वेळ फोनवर बोलावे, असे राहून राहून वाटत असे. 1998 मध्ये टेक्सास राज्यातील ह्युस्टन शहरात मुक्कामाला असताना अशा एका एकान्त शनिवारी केवळ टाइमपास म्हणून टेलिफोन डिरेक्टरी चाळत होतो. अचानक लक्ष `नासा'वर गेले. काही महिन्यांपूर्वीच कल्पना चावला ही अंतराळवीर नासामधूनच अंतराळ सफरीवर जाऊन परत आली होती. तिच्या कौतुकाच्या बातम्या भारतात वाचत असताना `नासा'बद्दलही एक नकळत आपुलकी निर्माण झाली होती.
केवळ प्रतिक्षिप्त क्रियेने `नासा'ची पाने उलटू लागलो, तर नजर कल्पना चावला या नावावर स्थिरावली. तिच्या नावासमोर `व्हाइस प्रेसिडेंट' असे ठसठशीतपणे नमूद केलेले होते. तिच्याशी बोलता येते का, ते पाहावे, म्हणून अगदी सहज फोन फिरवला, तर अपेक्षेप्रमाणेच पलिकडून रेकॉर्डेड मेसेज ऐकायला मिळाला. कल्पना चावला फोन घेण्यास उपस्थित नव्हती. तिच्या रेकॉर्डेड सूचनेप्रमाणे माझे नाव, भारतीयत्व आणि मोबाइल नंबर सांगून टाकला आणि फोन बंद केला. उत्तराची शक्यता गृहितच धरली नसल्यामुळे इतर कामाला लागलो.
आणि काय आश्चर्य? थोड्या वेळातच फोनची रिंग खणाणली. पलिकडे साक्षात कल्पना चावला होती. हाय, हॅलो झाल्यानंतर तीच म्हणाली `इथे वीक-एंड खायला उठतो ना? काही अपॉइंर्टमेंट नसेल, तर उद्या सकाळी `नासा'वर ये'.
मला मी झोपेत आहे, असेच वाटायला लागले. दुसऱ्या दिवशी लवकर उठून `नासा'वर गेलो. हे अमेरिकी अंतराळ संशोधन केंद्र ह्युस्टन शहरापासुन अंमळ दूरच आहे. `नासा'चा मुख्य दरवाजा आणि त्याची ती प्रसिद्ध कमान दूरवरूनच दिसू लागली. टॅक्सी थांबवून मुख्य दरवाज्यातील सुरक्षा अधिकाऱ्याला माझे नाव सांगितले. इथे आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. त्या अधिकाऱ्याने मी नाव सांगताच मला आत बोलावले व कल्पना चावला लवकरच इथे येऊन भेटतील. कृपया इथेच बसा', असे मला मोठ्या आदबीने सांगून वेटिंग लाऊंजमध्ये बसायला जागा दिली. माझ्या येण्याची सूचना कल्पनाने आगाऊच देऊन ठेवली होती.
दोन मिनिटांतच कल्पना चावला हजर झाली. फिकट निळ्या रंगांचा शर्ट, गर्द निळ्या रंगाची पँट, पायात पुरुषी बूट, काखेला टोपी आणि वर घट्ट बांधलेले केस. फोटोत पाहिली होती, तशीच कल्पना चावला दिसत होती. तिच्या समवेत एक सुरक्षा रक्षक होता. मला पाहतातच त्याने माझी सुरक्षा झडती घेतली. कल्पना ही बाब फारशी रुचली नसावी. `हे सारे माझ्या सुरक्षेसाठी याला करावेच लागते. अरे, माझ्या आई-वडिलांचीही या छळातून सुटका नाही', अशी ती ओशाळलेल्या स्वरात पुटपुटली. अमेरिकेत विमानतळापासून डिपार्टमेंट स्टोअर्सपर्यंत सर्वत्र अशी झाडाझडती होत असल्याने एव्हाना हे सोपस्कार अंगवळणी पडले होते.
पाचच मिनिटे तिथे औपचारिक गप्पा मारून आम्ही दोघे तिच्या क्वार्टर्समध्ये जायला निघालो. बॅटरीवर चालणाऱ्या इवल्याशा रिक्षासारख्या गाडीतून `नासा'चे आवार पाहात जाताना खूप गंमत वाटली. ती गाडी चालवायला तोच सुरक्षा रक्षक होता.
`हा ही गाडीसुद्धा चालवतो? '... माझा भाबडा भारतीय प्रश्न.
ती म्हणाली, `इथे सर्वांनाच अनेक प्रकारची कामे करावी लागतात. मी इथे व्हाइस प्रेसिडेंट आहे. मी अंतराळात जाऊन आले, मी संशोधन करते आणि इथल्या स्टाफच्या वेल्फेअरची जबाबदारीही माझ्याकडेच आहे'. कमी श्रमशक्तीत कामे करून घ्यायची आणि श्रमणाऱ्या सर्वांना अधिक मोबदला देऊन खुष ठेवायचे, या अमेरिकन भांडवलदारी मानसिकतेचे दर्शन `नासा'मध्येही घडत होते.
दुतर्फा सुंदर नाजुक फुलांच्या ताटव्यांतून वळणे घेत जाणाऱ्या नागमोडी वाटेने आमची गाडी स्टाफ क्वार्टर्सकडे जात होती. निसर्गाच्या इतक्या निकट सानिध्यात राहून परलोकीचे संशोधन करण्यात गढून गेलेली ही वस्ती. रविवार असल्याने आजुबाजूला बागांमधून फिरणारी आणि अंमळ पहुडलेली काळी-गोरी माणसे आणि त्यातच हुंदडणारी गोजिरवाणी मुले. सारे वातावरणच कमालीचे प्रसन्न होते. प्रत्येकजण आपापल्या जगातच मश्गुल. दुसऱ्याकडे पाहायला कुणालाच फुरसद वा स्वारस्य नाही.
`हे आपल्या भारतासारखं नाही. इथे काम किंवा ओळख नसेल, तर कुणीच कुणाशी बोलत नाही.', कल्पना सांगत होती. `कधी कधी खूप कंटाळा येतो. कर्नालला पळून जावंसं वाटतं.' तिने आपल्या मनातली दुखरी खंत पहिल्या भेटीतच बोलून दाखवली.
बोलता बोलता आम्ही तिच्या घरापाशी पोहोचलो. कडक सॅल्युट मारून तिचा सिक्युरिटी गार्ड निघून गेला आणि काही तरी परवलीची अक्षरे टाकून कल्पनाने दरवाजा उघडला. छोटेसे टुमदार पण व्यवस्थित ठेवलेले घर. कल्पनाचा नवरा - जीन पेरी हॅरिसन पक्का अमेरिकन असला, तरी तिच्या घरामध्ये भारतीयपण डोकावत होतेच. बैठकीच्या खोलीत संत मीराबाईचे बाटीक पेंटिंग लक्ष वेधून घेत होते.
आत शिरताच तिने पाणी आणले आणि आपल्या भारतीयत्वाचा पुन्हा परिचय करुन दिला. टेबलावरच तिच्या कोलंबिया अंतराळ सफरीच्या फोटोंचा अल्बम होता. तो तिने हौसेने पाहायला दिला आणि `आय एम जस्ट कमिंग', असे सांगून ती आतल्या खोलीत गेली... मी अल्बम बघण्यात दंग झालो...
दहाच मिनिटांनी कल्पना बाहेर आली. आता पूर्णपणे बदलललेली. गर्द हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस, हातभर चुडा, मोकळे सोडलेला केशसंभार, त्यावर माळलेला गजरा आणि कपाळावर ठसठशीत बिंदी...
मी थक्क होऊन पाहातच राहिलो.
`क्यूॅं.. कैसी लगती है कर्नाल की छोरी??' ... कल्पना समोर खिदळत होती.
मग आम्ही तिथेच बसून तासभर गप्पा मारल्या. कर्नालच्या सामान्य कुटुंबात जन्मलेली ही मुलगी तिथून थेट अमेरिकेत आणि नंतर अवकाशात कशी पोहोचली, हे सारं सारं ती मनापासून सांगत होती.
1982 सालापासून अमेरिकेतच राहणारी कल्पना जेव्हा हिंदी बोलत होती, तेव्हा त्यात इंग्रजीचा एकही शब्द नाही. सगळं बोलणं अस्सल हरयाणवी ठसक्यातलं.
मग तिने तिचा आतापर्यंतचा सगळा जीवन प्रवास कथन केला. एखाद्या सिनेमाची गोष्ट वाटावी, तशी हिची कहाणी.
`मला बालपणापासूनच आकाशाकडे पाहात राहावंसं वाटायचं. रात्र झाली की घराच्या गच्चीवर बिछान्यात पडून मी चांदण्या पाहात राहायचे. त्यांचा पूर्वेकडून पश्चिमेपर्यंतचा प्रवास मी निरखायचे. दिवसा शाळेतही बसल्या बसल्या वहीत विमानांची चित्रे काढायचे. मला सारे वेडी म्हणत. पण मला आकाशाशीच नाते जोडायचे होते. म्हणून शाळा संपल्यावर मी पंजाब इंजिनियरिंग कॉलेजातून एरोनॉटिकल इंजिनियरिंगमध्ये पदवी मिळवली. आई-बाबा चिंतेत होते. मुलगी इंजिनियर झाली खरी, पण या पदवीचा इथे काय उपयोग. विमान कंपनीत नोकरी करायची, तरी दिल्ली, मुंबई, बंगलोरला जावे लागणार. हे कसे जमायचे? पण माझ्या मनात वेगळेच होते. मी गुपचूप काम करत होते. कुठुन तरी अमेरिकेतल्या विद्यापीठांची माहिती मिळवली आणि थेट अर्जच केले. माझी निवड झाली आणि कर्नालहून थेट अमेरिकेतच पोहोचले.' कल्पना भरभरुन सांगत होती.
`खरं सांगते, मी कर्नाल आणि चंदीगड सोडून कोणतंही शहर पाहिलेलं नव्हतं. विमानात पहिल्यांदा बसले, ती थेट अमेरिकेत येण्यासाठीच.' कल्पनाचा पराक्रम असा न्यारा आहे.
1982साली अमेरिकेत दाखल झालेली कल्पना खूप मेहनत घेऊन शिकत होती. दोनच वर्षांत तिने एरोस्पेस इंजिनियरिंगमध्ये एम.एस.ची पदवी मिळवली. आता तिची कारकिर्दीची दिशा निश्चित व्हायला लागली होती. कल्पना पुढे शिकतच राहिली. 1988मध्ये तिने कोलोराडो विद्यापीठातून पीएच. डी. मिळवली आणि तिला तिच्या स्वप्न नगरीत - `नासा'मध्ये प्रवेश मिळाला. ती खूप आनंदात होती. आता ती दुर्बिणीतून ग्रह-तारे पाहात त्यांच्यावर संशोधन करू लागली होती. एक भारतीय मुलगी केवळ स्वकर्तृत्वावर स्वत:चे स्थान निर्माण करत होती. `नासा'ने तिच्या मेहनतीचे व बुद्धिमत्तेचे चीज केले आणि 1995मध्ये ती `नासा'ची व्हाइस प्रेसिडेंट झाली.
`नासा'चा अंतराळ संशोधन कार्यक्रम जोरात चालू होता. केवळ चंद्रावर, मंगळावर न जाता अंतराळातच राहून विश्वातील अगम्य वास्तवांची माहिती करुन घेण्यासाठी `नासा' खर्च करत होती. त्यातूनच `कोलंबिया अंतराळ मोहिमेची आखणी झाली आणि मुख्य म्हणजे अंतराळ सफरीसाठी कल्पनाची निवडही झाली. तिचा नवरा हॅरिसन खुप खुश झाला होता. त्याने अनेक टिप्स दिल्या.
...आणि 19 नोव्हेंबर 1997ला कल्पनाचे स्वप्न साकार झाले. कोलंबिया यानातून आपल्या चार सहकाऱ्यांसह ती अंतराळात झेपावली. भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर बनण्याचा बहुमान तिला मिळाला.
`अंतराळातले दिवस खूप वेगळा अनुभव देऊन गेले.', कल्पना सांगत होती. `इतका काळ त्या छोट्याशा यानात राहायचे. पूर्णपणे बदललेल्या वातावरणाशी जमवून घेत संशोधनाचे काम ठरलेल्या वेळात पार पाडायचे. एक मिनिटही वाया घालवायचं नाही. या संशोधनात निरिक्षणांचं महत्त्व खूप. ती चुकू नयेत, म्हणुन मनावर कोणतंही दडपण येऊ न देता काम करायचं, हे सारं काही बरंच काही शिकवणारं होतं.'
याच प्रवासात एक घोटाळा झाला. स्पार्टन सॅटेलाइटच्या हाताळणीत काही तरी गडबड झाली आणि अचानक आणीबाणी उद्भवली. अखेर यानातल्या दोघा अंतराळवीरांना यानातून बाहेर पडून अंतराळात चालून दुरुस्ती करावी लागली. सारं काही ठाकठीक झालं, पण या चुकीचं खापर कल्पनावर फोडलं गेलं. कोलंबिया व सर्व अंतराळवीर वाचले खरे, पण ही चूक झालीच कशी, याबद्दल संशोधकांच्या वर्तुळात आणि अमेरिकन माध्यमांमध्ये काहूर उठले. कल्पनावर टीकेचा भडिमार चालू झाला. ती खट्टू झाली, पण डगमगली मात्र नाही. तिने सरळ चौकशीची मागणी केली आणि `नासा'ने तज्ज्ञांची समिती नेमली.
कल्पनाशी पहिली भेट झाली, तेव्हा या चौकशी समितीचे काम चालू होते. कल्पनाला मात्र आत्मविश्वास होता, `मी चूक केलेली नाही. यांत्रिक बिघाडाला मी जबाबदार नाही', ती निक्षून सांगत होती. तसेच तिने चौकशी समितीलाही सांगितले होते.
`तुझ्यावर आरोप का झाले?'
कल्पना खिन्न हसली. आपल्या एका हातावर दुसऱ्या हाताचे बोट ठेवत म्हणाली, `चमडी भाई, चमडी. हमारी यह चमडी इन गोरों को शायद डराती है। इसलिये ऐसे इल्जाम आते रहते हैं। मगर मैं डरुंगी नही। कर्नाल का खून है मेरा।' ... कल्पनाचा आत्मविश्वास चकीत करणारा होता.
बोलता बोलताच कल्पनाने जेवणाची तयारी केली. अस्सल पाश्चिमात्य जेवण. ते जेवताना म्हणाली, `पुढच्या वेळी नीट ठरवून ये. मी मकई की रोटी आणि सरसों का साग छान बनवते. हॅरिसनलाही खूप आवडतो माझा भारतीय स्वयंपाक!' तिच्या बोलण्या-वागण्यात खास पंजाबी -हरयाणी स्निग्धता होती. ती सोडायला मुख्य दरवाज्यापर्यंत आली.
नंतर अधुन मधुन तिचा फोन येत राहीला. आमच्या `झी नेटवर्क'चा ह्युस्टनमध्ये एक कार्यक्रम होता. त्यालाही ती आवर्जुन उपस्थित राहिली. इतका काळ ह्युस्टनमध्ये राहूनही तिला ह्युस्टन शहराची विशेष माहिती नव्हती. `आमचा सारा दिवस नासामध्येच जातो. बाहेरच्या जगाशी संबंधच नाही. संबंध असतो, ते केवळ चंद्र, चांदण्यांशी', हसता हसता ती म्हणाली.
काही दिवसांनी अमेरिकेतच बातमी वाचली, कल्पनाची चौकशी समितीने निर्दोष मुक्तता केली होती. जे काही घडले त्याला स्पार्टन सॅटेलाइटच्या बांधणीतला दोषच कारणीभूत होता, असेच मत या समितीतील तज्ज्ञांनी नोंदवले. हा कल्पनाचा विजय होता. रात्री तिला फोन केला, तर एकच वाक्य म्हणाली `सत्यमेव जयते।' ती खुप आनंदी होती. काही दिवसांनीच पुन्हा ह्युस्टनला गेलो, तर आवर्जुन भेटायला आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. आनंदातही ही खुप रडली. मी दोषी ठरले असते, तर मला तो भारताचा अपमान ठरला असता, म्हणुन मी लढले व जिंकले. हम भी कुछ कम नही, हेच मला सिद्ध करायचे होते,' भारताबद्दलचा अभिमान तिच्या शब्दाशब्दातून आणि अश्रूच्या प्रत्येक थेंबातून ओसंडून वाहात होता.
मला कल्पनाचा अभिमान वाटला.
मी भारतात परतलो. मग अधून मधून फोन, कधी ई-मेल चालू होते. आता तिच्यासाठी पुढल्या अंतराळ सफरीचे दरवाजे खुले झाले होते. पण का कोण जाणे कोलंबियाचे उड्डाण वारंवार लांबत गेले. अखेर 16 जानेवारी 2003ला पांढरा, काळा धूर सोडत कोलंबिया पुन्हा अवकाशात झेपावले. आता कल्पनासमवेत आणखी सहा अंतराळवीर होते. वजनविरहीत अवस्थेचा शरीर रसायनावर काय परिणाम होतो, याचे मायक्रोग्रॅव्हिटी संशोधन करण्याची जबाबदारी कल्पनावर होती. आपले काम चोखपणे केल्याचे समाधान तिला होते. तसे अनेक मेसेजेस तिने अंतराळातून आपल्या मित्रांना, सहकाऱ्यांना पाठवले.
कोलंबियाची या माहिमेवरील कागिरी संपली आणि परतीचा प्रवास सुरू झाला. अवकाशातून पृथ्वीकडे एक टक पाहात कल्पना परतत होती. वजनरहित तरल अवस्थेतून पुन्हा जडत्वाकडे तिचा प्रवास चालू होता. पण `चाँद तारों को छुने की आशा, आसमान में उडने की आशा' ऊराशी बाळगून जगणाऱ्या कल्पनाचे पृथ्वीवर परतणे नियतीला मान्य नव्हते.
... 1 फेब्रुवारी 2003! मुंबईत `झी'चा पुरस्कार वितरण सोहळा चालू होता आणि मोबाईल खणाणला... कल्पनाला घेऊन येणाऱ्या कोलंबियाला पृथ्वीच्या कक्षेत शिरल्यानंतर आपघात झाला होता. कल्पना खरोखरच अनंतात विलीन झाली होती.
स्वत:ला आकाशाची कन्या मानणाऱ्या कल्पनाला नियतीकडून काव्यात्मक न्याय मिळाला होता. वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी ही अवकाश कन्या अवकाशात कायमची हरवली होती. आकाशात चमचमणाऱ्या चांदण्या तिला वेड लावायच्या पण क्षणभरच चमचमाट करत पृथ्वीकडे वेगाने धावणाऱ्या आणि अंतर्धान पावणाऱ्या उल्कांची तिला भीती वाटायची. कल्पना तशीच चमकून निघूनही गेली.
पण अनंतात खरोखरीच विलीन होण्यापूर्वी तिने चंदिगडमधल्या तिच्या इंजिनियरिंग कॉलेजातल्या विद्यार्थ्यांना मेसेज पाठवला. त्यात तिने आपलं मनच मोकळं केलं.
भारतीय विद्यार्थ्यांना `महान प्रवासा'च्या शुभेच्छा देऊन कल्पना स्वत:च अनंताच्या प्रवासाला निघुन गेली.
शुभास्थे पन्थान:, कल्पना!
- भारतकुमार राऊत