नेहमी इतिहास मिरवणाऱ्या माणसांचा इतिहास समजून घेण्यातला रस आटलाय का?
आम्हाला अमूक परंपरा आहे, तमूक क्रातिकारक आमचे पुर्वज होते. आम्हाला यांचा इतिहास आहे. अशा टिमक्या वाजवणारे आपल्या आजुबाजूला बरेच लोक असतात. आणि अशा लोकांमुळेच एका महात्म्याचा इतिहास सांगणारी मालिका प्रेक्षकांचा प्रतिसाद नसल्याने बंद करावी लागत आहे. याला जबाबदार कोण?;
६ जाने. २०२० रोजी सुरू झालेली " सावित्री-जोती : आभाळाएवढी माणसं होती " ही मालिका शनि. २६ डिसेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेतेय. या मालिकेला सर्व स्तरातील जाणत्यांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि सुजाण प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. ती मध्येच बंद होतेय याचे मनस्वी दु:ख आहे. खरं तर आत्ताशी कुठे गोष्टीला सुरूवात झाली होती. मालिका पकडही घेऊ लागली होती. एरवी कोणतीही मालिका न बघणारे काही जाणते लोक ही मालिका आवर्जून बघतात. एक नवा प्रेक्षकवर्ग मालिकांकडे, सोनी मराठीकडे वळू लागलेला होता. काहीलोक वेळ जुळत नसल्याने अॅपवर ही मालिका बघत होते. पण त्यांची मोजणी टीआरपीमध्ये होत नाही. टीआरपीच्या रेसमध्ये यशस्वी आणि लोकप्रिय असलेल्या सध्याच्या इतर मराठी वाहिन्या आणि मालिकांबदल माझ्या मनात किंचितही आकस नाही. उलट कुतुहलच आहे. कौतुकच आहे. माणसाला निखळ करमणुकीची गरज असते असे मी मानतो. त्याच्या जोडीला ज्ञान, संस्कृती, वर्तमान, जगाचे व जगण्याचे भान वाढवणार्या, रंजनातून सामाजिक प्रबोधन, लोकशिक्षण करणार्या सावित्रीजोतीसारख्या मालिकाही आवश्यक आहेत. त्या मुल्यभानाची रसद आणि जगण्याचा पैस विस्तारणारी उर्जा पुरवित असतात.
सदैव इतिहासात रमलेल्या मराठी माणसांचा १९-२० व्या शतकातील समाजसुधारणा, शिक्षण आणि परिवर्तन विचार मनोरंजनतून समजून घेण्यातला रस आटलाय का? कुठलीही कलाकृती ही त्या काळाचं अपत्य असते. प्रस्तुत काळ हा जोती-सावित्रीच्या विचारांना, प्रेरणांना, त्यागाला वा ध्येयवादाला फारसा पोषक नाही. ज्यांच्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग त्या दोघांनी केला त्या स्त्रिया आणि बहुजन समाज हेच टिव्हीच्या सर्व मालिकांचे मुख्य प्रेक्षक आहेत. तेच स्वत:च्या इतिहासाबद्दल, पुर्वजांच्या त्यागाबद्दल, वारशाबदल बेपर्वा आणि बेफिकीर आहेत? बहुजन समाजाला शतकांच्या गुलामीतून बाहेर काढणारे सावित्रीजोतीसारखे लोक बहुजनांनाच आपलेसे न वाटणे हे मला समाजद्रोहासारखे वाटते. हा आप्पलपोटेपणा, करंटेपणा मला फार बोचतो.
दर्जेदार कंटेण्ट लोकांना हवाच असतो यावर माझा ठाम विश्वास आहे. या मालिकेने सोनी मराठीला एक व्यापक सामाजिक पाया मिळवून दिला. सोनी मराठीचा रिच बहुजनांमध्ये वाढवला. सावित्री-जोतीची कथा सशक्त आहे. दणकट लेखन, कलाकारांचा उत्तम अभिनय, कसदार सादरीकरण, कसबी दिग्दर्शन आणि दशमी क्रिएशनची सर्वोत्कृष्ठ निर्मिती यामुळे ही मालिका अव्वल दर्जाची बनलेली आहे. ही मालिका ज्यांनी बघितली ते तिला अनेक वर्षे विसरणार नाहीत. जे लोक कोणत्याही मालिका बघत नाहीत त्यांना माझी ही पोस्ट लागू नाही.
कदाचित टिव्ही मालिका क्षेत्रातील जाणकारांना, यशस्वी मान्यवरांना माझी ही पोस्ट आवडणार नाही. " ग्राहक नेहमीच बरोबर असतो, निवडणुकीत पराभूत होणाराने मतदारांना दोष द्यायचा नसतो," या सुभाषितांची माहिती मलाही आहे.
उंच माझा झोका ही उत्तम मालिका चालते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९३५ नंतर आवरती घ्यावी लागते आणि सावित्री जोती तर मध्येच गुंडाळावी लागते. अशाने या जॉनरच्या मालिका करण्याचे धाडस कोण करील? म्हातारी मेल्याचेही दु:ख आहेच, पण काळ बेदरकारपणे सोकावतोय याचे जास्त दु:ख आहे. काहीजण आम्हाला म्हणाले, "टीआरपी नसला तरी मालिका चालू ठेवा." हा भाबडेपणा झाला. व्यवहारात तो चालत नाही. कोणतीही मालिका तयार करायला पैसा लागतो, तो ज्या वाहिनीकडून दिला जातो तिला जाहीरातींद्वारे तो परत मिळत असतो. जाहीराती मिळणे न मिळणे हे सर्वस्वी टीआरपीवरच अवलंबून असते. प्रेक्षकांपासून म्हणजेच टिआरपीपासून फटकून राहून मालिका चालू शकत नाहीत ही कटू असली तरी वस्तुस्थिती आहे.
सावित्री जोती मालिकेला टिआरपी होता, पण तेव्हढा पुरेसा नव्हता. ही बायोपिक असल्याने त्यात हमखास मनोरंजनाचा तद्दन मसाला भरता येत नव्हता. १८२७ ते १८९७ हा काळ उभा करायचा असल्याने प्रवास जास्त खडतर होता. या मालिकेमागचे आमचे, दशमी व सोनी मराठीचे प्रयत्न प्रामाणिक होते. उत्तम टिम आणि ऑनेस्ट स्पिरिट असूनही प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात खेचून आणण्यात आणि टाईमस्पेंड वाढवण्यात आम्ही कुठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण आम्ही नक्कीच करू.
सोनी मराठी वाहिनी, दशमी क्रिएशन ही निर्मितीसंस्था, सावित्री-जोतीची आमची सगळी टिम यांचे या ऎतिहासिक आणि दर्जेदार निर्मितीबद्दल मी मन:पुर्वक आभार मानतो. विशेषत: सोनी मराठी वाहिनीचे अजय भाळवणकर, सोहा कुलकर्णी, किर्तिकुमार नाईक, राजेश पाठक, दशमीचे नितीन वैद्य, निनाद वैद्य, व अपर्णा पाडगावकर, दिग्दर्शक उमेश नामजोशी, प्रमुख कलावंत, ओंकार गोवर्धन, अश्विनी कासार, पूजा नायक, मनोज कोल्हटकर, लेखक अभिजीत शेंडे, प्रसाद ठोसर, निर्मिती प्रमुख, (क्रियेटीव्ह हेड) लेखा त्रिलोक्य, सोहम देवधर, आणि या टिममधील पडद्यामागील सहकारी, तंत्रज्ञ या सर्वांचा मी कृतज्ञ आहे. सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही.
प्रत्येक कलाकृतीची एक नियती असावी. महिला, वंचित - बहुजन आणि अल्पसंख्यकांना काय वाचावं, काय बघावं, कोणत्या विचारात आपलं हित आहे, कशानं आपलं भलं होणार आहे याची जाण आजही असू नये हे वेदनादायी आहे. ५ डिसेंबरला मी या विषयावर एक पोस्ट लिहिली असताना, " आम्ही ही मालिका बघतो, ती चालू ठेवा" अशी एकमुखी मागणी तुमच्यापैकी अनेकांनी केली. तुमच्या कॉमेंट, तुमचे फिडबॅक सांगतात की सर्व थरातील खूप लोक ही मालिका आवर्जून बघतात. तर मग तो प्रतिसाद टिआरपी मशीनवर का दिसत नाही? याचा अर्थ विद्यमान प्रतिसाद पुरेसा नाही. अजून खुप जास्त प्रतिसाद हवा होता. आम्हाला तशी अपेक्षा आणि विश्वासही होता.
गाईने पान्हा चोरावा तशी प्रेक्षकांची या मालिकेबाबतची वागणूक राहिली. तमाम स्त्रियांना, चंगळवादी वंचित-बहुजन, अल्पसंख्यकांना आता सावित्रीबाई आणि जोतीरावांपेक्षा तुंबळ करमणूकीचा बेहद्द मारा करणार्या काल्पनिक मालिकांची जास्त निकड वाटत असावी. यावरून मराठी समाजाला स्वतंत्र विचार करायला लावणारे, मूल्यनिष्ठा शिकवणारे काही वाचायचे, बघायचेच नाहीये असे समजायचे काय? आजच्या बर्याच मालिका प्रेक्षकांना दैववाद, भ्रामक आणि खोटा इतिहास, फॉल्स ड्रामा, बेगडी कहाण्या दाखवित आहेत. अज्ञानमग्न आणि आत्मनाशउत्सुक बहुजन समाजाला ज्ञानद्रोहाचा अनेस्थेशिया देण्याचं काम त्या करीत आहेत. ( यालाही अपवाद आहेत, असतात.. काही उत्तम मालिकाही लोकांनी उचलून धरलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे.) दुसरीकडे सनातनी सत्ताधारी, समुहांना विचारहीन, एकसाची, नशेडी, उन्मादी प्राणी बनवण्यासाठीची लस रात्रंदिन टोचित आहेत. आत्ममग्न बहुजन चळवळी आपल्याच मित्रांच्या कमिटमेंट तपासण्यात मश्गुल आहेत. त्या कोमात गेल्याने त्यांना हा उलट्या पावलांचा प्रवास, हे मतलबी वारे दिसतच नाहीत.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही मालिका पुढची किमान १०० वर्षे डिजिटल स्वरूपात टिकणार आहे. आज नसली तरी उद्या, कदाचित परवा पण या मालिकेची गुणवत्ता नव्या पिढीला समजेल असा मला भरवसा वाटतो. आजच्या बहुसंख्य प्रेक्षकांची इयत्ता, आवड आणि कुवत यांची सरासरी बघता ही मालिका त्यांना बहुधा झेपली नसावी. आज कोरोनाच्या दहशतीखाली जगत असताना मेंदूला झिनझिण्या आणणारी, डोक्याला खाद्य पुरवणारी, काळाच्या पुढची सावित्रीजोतीची गोष्ट त्यांना अनावश्यक वाटत असावी.
तरिही एव्हढ्या लवकर आम्ही हार मानणार नाही. एका महाकवीनं म्हटल्याप्रमाणे, " काळ अनंत आहे आणि पृथ्वी विपुल आहे." कधीतरी समविचारी लोक आम्हाला भेटतीलच. "अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी सावित्रीजोतीची कहाणी...." ही खंत जरूर आहे. काही गोष्टींना लोकप्रिय उत्तरं नसतात. असली तरी त्यांची जाहीर वाच्यता माध्यमांमध्ये करता येत नाही. काही गोष्टी आमच्या कक्षेबाहेरच्याही असतात. संघर्ष कुणाला चुकलाय? नजिकच्या भविष्यात कधीतरी उरलेल्या कथाभागावरही मालिका येईल अशी बुलंद आशाय. देशाच्या उज्वल भविष्यासाठी, परिवर्तनवादी विधायक कृतींसाठी आम्ही नव्या उमेदीने, अभिजात आशेने, पोलादी चिवटपणे धडपडत राहू. एक दरवाजा बंद होतो तेव्हा दुसरा दरवाजा उघडतो असं ऎकतो. तोवर धडपडणं, झुंजणं चालूच राहिल.
- प्रा. हरी नरके
संशोधन सल्लागार, "सावित्री-जोती : आभाळाएवढी माणसं होती"