"..आणि मग मी 'बोल्ड ' ठरले"
अभिनेत्री सई ताम्हणकरची 'बोल्ड एन्ड ब्यूटीफूल' इमेज आहे. पण प्रत्यक्ष जीवनात सईची मतं नेमकी काय आहेत? आंतरराष्टीय महिला दिनाच्या निमीत्ताने 'फेमिनिझम’ बद्दल काय वाटतं? बोल्ड अभिनेत्रीला तिच्या बोल्ड इमेजमुळे समाजाकडून विषेशतः पुरुष वर्गाकडून काही त्रास होतो का? पडद्यावर सईने साकारलेल्या विविध ग्लॅमरस -बोल्ड भूमिका आणि प्रत्यक्षातील सई यात तफावत किती आणि समानता किती? अशा काही मुद्द्यांवर सईने मांडलेली मतं थेट तिच्याच शब्दांत.;
दरवर्षी येणाऱ्या पावसाळ्याप्रमाणे पुन्हा एकदा 'आंतर राष्ट्रीय महिला दिन (८ मार्च) आला आहे. आनंद याचा वाटतोय की, किमान या निमीत्ताने स्त्रीयांच्या प्रश्नांकडे, तिच्या आरोग्याकडे अवघ्या जगाचे लक्ष एकवटले जाते. हे कमी नाही.. अन्यथा स्त्रीचे अस्तित्व हे बहुधा फक्त गृहित धरले जाते. त्यामुळे महिला दिनाच्या निमित्याने का होईना महिलांच्या प्रश्नांवर होणारी घुसळण व्यापक प्रमाणात होतेय यातच मी महिला दिनाचा आनंद मानते.
मला नेहमी फेमिनिझमवर प्रश्न विचारले जातात. नारीवाद म्हणजे फेमिनिझम.. तशी ही टर्म खूप मोठी ज्यात अनेक स्त्रीविषयक जाणिवा सामावलेल्या आहेत. स्त्रीच्या हक्कांची पायमल्ली होऊ नये. तिला तिचे अधिकार, मनासारखे जगण्याचे हक्क मिळावेत असा एक साधारण अर्थ यातून अभिप्रेत आहे. एखाद्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला की तिचे पालनपोषण आई-वडील करतात हे स्वाभाविक आहे. पण, तिने कुणाबरोबर खेळावं, किती वाजेपर्यंत खेळावं, आणि मुख्य म्हणजे बाहेर अंगणात-मैदानात ही जाऊन खेळण्याची तिला मुभा नसते. तिचे लग्न होईपर्यंत तिच्याशी निगडित तिचे निर्णय तिचे वडील -भाऊ -प्रसंगी आजोबा देखील घेत असतात. तिच्या करियरच्या आवडी-निवडी जपण्याचे स्वातंत्र्य देखील प्रसंगी तिला लाभत नाही. लग्न झालं की तिचा ताबा तिच्या पतीकडे जातो.
अनेक मान्यवर -तालेवार घराण्यात देखील स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र नसते. घरातून बाहेर पडण्यासाठी तिला परवानगी घेणे क्रमप्राप्त असते.. घरातील कामं विनातक्रार करणं हे तर क्रमप्राप्त असते. त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून 'फेमिनिझम'चा अर्थ मी स्त्रीच्या ह्या मौलिक अधिकारांशी जोडते.
"स्त्रीला तिच्या आयुष्यात जे काही करण्याची इच्छा -महत्वकांक्षा -उर्मी असेल ते तिला करायला मिळणे म्हणजे स्त्रीवाद.. स्त्री स्वतंत्रता! फेमिनिझम.." असो, हळू हळू का होईना आपला भारतीय समाज हे मानू लागला आहे. स्त्रीला एक मन आहे. तिला तिच स्वतंत्र अस्तित्व, स्वतःची मतं आहेत.. आनंदीबाई जोशींना डॉकटर करण्यासाठी विलायतेत पाठवताना केवढा तरी गहजब झाला होता.. कारण त्या काळात स्त्रियांना उंबऱ्याबाहेर पडण्याची मुभा नव्हती! ही प्रगती खूप मंद असली तरी हरकत नाही, क्रांती घडून यायला खूप शतकं लोटावी लागतात हे विसरून कसं चालेल?'
आजही आपला समाज 'फेमिनिस्ट' महिलांकडे फार निकोप दृष्टीने पाहत नाही.. पण मी म्हणते, समाज म्हणजे तरी कोण? माझ्यासारखी -तुमच्यासारखी माणसंच ना? त्यामुळे आपण आपला दृष्टिकोन स्वच्छ ठेवावा. सकारात्मक -सुधारणावादी बदलांकडे डोळसपणे पाहावं. म्हणजे आपल्यासारखे अनेक घटक या बदलांकडे सकारात्मकतेने पाहतील. चॅरिटी बिगिन्स अॅट होम हे सत्य स्वीकारून पुढे जावं.
सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, संत गाडगेबाबा यांनी किती सामाजिक परिवर्तन घडवून आणले हे आठवलं पाहिजे. ते देखील १८ व्या शतकात. समाजाला काय वाटेल याचा विचार करत बसलात तर क्रांती, सामाजिक परिवर्तन, सकारात्मक बदल यातील काही शक्य होणार नाही. एका मर्यादेपर्यंत सामाजिक चौकटींचा विचार, त्याच भान ठेवावं.
मी स्वतः स्वप्नं पाहते, माझ्या महत्वकांक्षा आहेत. मी माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्याचे प्रयत्न करते. जर अशा पद्धतीने मी माझं जीवन माझ्या तऱ्हेने जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते तर होय मी फेमिनिस्ट आहे.
मी सांगलीसारख्या लहान गावात वाढले, शिक्षण घेतलं आणि पुढे आईची परवानगी घेऊन मी अभिनयात येण्याचे ठरवले. माझ्यासाठी मुख्य म्हणजे लहान गावातून मुंबई -पुण्यासारख्या शहरात जाणे, अभिनय करणे आणि यथावकाश या अनोळखी क्षेत्रात स्थिरावणे नक्कीच सोपे नव्हते.
माझ्या बोलण्याचा टोन सांगलीचा होता, तो मला प्रयत्नपूर्वक काढून टाकावा लागला.. एक मोठा अथक प्रवास होता तो. पण मी साध्य करत गेले. लहान गावात राहणारे आणि शहरात राहणारे यांच्या विचारसरणीत जमीन -आस्मानाचे अंतर आहे. मी स्त्री असल्याने कुणी मला माझ्या अधिकारांपासून रोखत असेल तर मी त्याविरुद्ध बंड करते. ह्या माझ्या कृतीला जर कुणी फेमिनिस्ट म्हणत असेल तर होय मी फेमिनिस्ट आहे.. ज्याचा मला सार्थ अभिमान आहे.
माझ्या सिनेमातील भूमिका ह्या नेहमीच खूप विविधांगी होत्या. माझ्या अभिनय प्रवासात सुदैवाने मला चाकोरीबाहेरच्या भूमिका नेहमीच साकारायला मिळाल्यात. मराठी सिनेमा आणि नायिकेने घातलेली बिकिनी म्हणजे सांस्कृतिक वादळ हे ठरलेलं! पण भूमिकेची गरज म्हंणून मी बिकिनी घातली. हिंदी सिनेमात 'इंटिमेट सीन' दिलेत. यात भूमिकेची -व्यक्तिरेखेची गरज म्हणून 'सेन्सेटिव्ह' वाटावेत असे सीन दिलेत. असे दृश्य देणे ही त्या त्या भूमिकांची गरज होती.
एकाच साच्यातील थोडक्यात काय तर सोज्वळ भूमिकांमध्ये मी अडकून बसले नाही.. मग मी 'बोल्ड ' ठरले. काहींनी माझ्या 'ऑन स्क्रीन' आणि 'ऑफ स्क्रीन' इमेजला समांतर रेषेत आणलं तो त्यांचा संकुचितपणा होता.. प्रत्यक्षातील सई कुठल्याही नेक्क्सट्ट डोअर घरगुती मुलीइतकी साधी आहे. मला टीव्ही बघायला, स्वयंपाक करायला, गप्पा मारायला आवडतं. मी पार्टी ऍनिमल नाही. ठराविक मैत्रिणीच्या गराड्यात मी रमते. त्यामुळे स्क्रीनवर कुठलीही भूमिका लीलया पार पाडणारी सई प्रत्यक्षात खूप वेगळी -साधी आहे. प्रत्यक्षात मला स्वैराचार, पार्टी यातले काहीही आवडत नाही.. तो माझा मार्ग नाही.. प्रतिमा आणि प्रत्यक्षातील मी फार वेगळे आहोत.
महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री -पुरुष समानतेचा मुद्दा ऐरणीवर येतो. आमच्या अभिनयाच्या क्षेत्रात हिरोला मिळणारे मानधन हे हिरोईनला मिळणाऱ्या मानधनापेक्षा वरचढ असते.. हा प्रश्न फक्त पुरुषप्रधान संस्कृतीपुरता मर्यादित नाही. हे एक सत्य आहे. की, हिरोंच्या अभिनेत्यांच्या नावावरच फिल्म्स विकल्या जातात.. सिनेमा इतिहासात नायिकांच्या नावावर सिनेमा विकला गेल्याची उदाहरणं फार कमी आहेत.. श्रीदेवी ह्या अभिनेत्रींच्या नावावर सिनेमा विकला जात असे. श्रीदेवीने वयाच्या चौथ्या वर्षांपासून पन्नाशीपर्यंत सातत्याने हिंदी आणि साऊथ फिल्ममधे मेहनतीने आपलं नाव निर्माण केलं. त्यामुळे श्रीदेवीला हा अधिकार होता. तिला तिच्या समकक्ष हिरोपेक्षा नेहमी जास्त मानधन मिळाले आहे. त्यामुळे हिरोइतके मानधन मलाही मिळालेच पाहिजे. कारण, स्त्री पुरुष समानतेचे युग आहे असं नेहमी ह्याबाबत म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही.
एकसारखा कामाचा अनुभव, शैक्षणिक अहर्ता असणाऱ्या स्त्री आणि पुरुषाला कॉर्पोरेट क्षेत्रात पगार बरोबरीने मिळायला हवा अशा मताची मी आहे. मी खुलून बोलते, डिप्लोमॅटिक वागणे -बोलणे मला जमत नाही. म्हणून मी 'बोल्ड' ठरवली गेल्यास ते ठीक आहे. पण दुर्भाग्याने माझ्या स्क्रीन इमेजचा लोकांनी फार गंभीरपणे विचार केला.. काही कलाकार असेही आढळून येतात, ज्यांनी बोल्ड सिन दिलेत, बिकिनी देखील घातली पण त्या कलाकार 'सई ताम्हणकर' नाही बनू शकल्या! माझ्या टॅलेंट आणि आत्मविश्वासाने मला सई बनवलं आहे.. पुरुषप्रधान दुनियेत स्वतःचं अस्तिस्त्व निर्माण केलं मी याचा सार्थ अभिमान आहे मला, हेच माझे फेमिनिझम!
- सई ताम्हणकर, अभिनेत्री