...आणि बुधवार पेठेतील त्या घटनेचं एक वर्तुळ पुर्ण झालं

मुलींचा दलाल विक्रम परमारच्या टोळीने तिला जिवंत जाळलं होतं. लॉकडाऊनच्या काळात विक्रम पुणे स्टेशनवर भीक मागताना दिसू लागला. स्टेशन परिसरातील बेसहारा एकट्या दुकट्या गरीब असहाय बायका पोरींची माहिती तो अन्य दलालांना देऊ लागला. मात्र तिथे देखील त्याचे उद्योग सुरूच होते. आणि काही दिवसांनी... विक्रमचं पुढं काय झालं जाणून घेण्यासाठी वाचा समीर गायकवाड यांचा लेख;

Update: 2021-01-24 01:30 GMT

पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत १९९८ साली घडलेल्या घटनेचे एक वर्तुळ गतसालच्या लॉकडाउनमध्ये पूर्ण झाले. बुधवार पेठेतील पिंपळाच्या झाडानजीकच्या छोटेखानी मंदिराला लागून बहुमजली चांदणी बिल्डिंग आहे. या इमारतीत साखरीबाईचा कुंटणखाना होता. साखरीबाईचं मूळ नाव शकुंतला मुंदळा नाईक. पस्तिशीतली ही बाई अत्यंत कठोर निर्दयी आणि कमालीची व्यावहारिक होती. पैसा तिचं सर्वस्व होतं. साखरीबाईकडे घटनेच्या दोनेक वर्षांपूर्वी शांता नावाची एक तरुणी रिप्लेसमेंट मध्ये आली होती. साखरीने तिला तिच्या अड्ड्यात सामावून घेतलं आणि त्या बदल्यात तिच्या धंद्यात पाती केली.

शांता दिसायला अप्सरा मदनिका वगैरे नसली तरी तिचं स्वतःचं एक वेगळं सौंदर्य होतं आणि तिचे काही आशिक देखील होते. पैकी एक दल्ला तिचा नवरा असण्याची बतावणी करायचा. शांतेने देणी चुकवण्यासाठी म्हणून साखरीबाई कडून सात हजार रुपये उचल घेतले आणि तिथून तिचे दिवस फिरले. सतत पैशावरून टोमणे बसू लागल्यावर मारहाणीच्या भीतीने शांतेने एका दिवशी पोबारा केला. साखरीबाईने शांताचा खूप शोध घेतला मात्र तिचा काही थांगपत्ता लागला नाही. काही महिन्यानंतर जूनच्या मध्यावधीत साखरीबाईला कुणकुण लागली की शांता इथेच बुधवारपेठेत आलीय आणि नव्या ठिकाणी धंदा करू लागलीय. ही खबर कानी पडताच साखरीबाईचा पारा चढला. अवघ्या काही दिवसात तिने शांताचा ठावठिकाणा शोधून काढला. शांता बुधवारपेठेतच परतली होती मात्र तिचा पत्ता होता प्रेमज्योती बिल्डिंग पहिला मजला !

१९ जून १९९८ च्या कुंद ढगाळ दिवशी साखरीबाईने प्रेमज्योती इमारतीकडे आपला मोर्चा वळवला. जाताना आपल्या अड्ड्यातल्या दोन तीन पोरी तिने आवर्जून संगे नेल्या होत्या. जेणेकरून शांताला पलायन करणं शक्य होऊ नये. संध्याकाळची वेळ होती. अख्ख्या बुधवारातल्या बायका संध्याकाळच्या तयारीला लागल्या होत्या. काही तोंडाला मेकअप फासून उभ्या होत्या तर काही सज्ज होत होत्या तर काहींची झोप नुकतीच आटोपली होती.

या दरम्यानच साखरीने बेसावध उभ्या असलेल्या शांताला पकडलं. तिने तिथेच तिला मारझोड सुरु केली. शांता गयावया करत होती. रडत होती. आक्रोश करत होती. आपण शांता नसल्याचं सांगत होती. एक अर्थाने ते खरंच होतं. तिचं मूळ नाव होतं सुनीता धोत्रे. सुनीताला तिच्या इच्छेविरुद्ध धंद्यात लोटलं होतं आणि तिचे परतीचे सर्व मार्ग बंद केले होते. परिस्थितीने नाडलेल्या सुनितेचा अनेकांनी उपभोग घेतल्यानंतर ती वेश्यावस्तीच्या दलदलीत रुतली होती.

साखरीने तिला अक्षरशः फरफटत चांदणी बिल्डिंगच्या आवारात आणलं आणि तिला पैशासाठी छळू लागली. संतापाने बेभान झालेल्या साखरीने रॉकेलने भरलेला कॅन तिच्या अंगावर रिकामा केला आणि पेटती काडी तिच्या अंगावर टाकून तिला जिवंत पेटवून दिलं. पेटत्या अवस्थेतली सुनीता गडाबडा लोळू लागली. चांदणी इमारतीच्या समोरच अगदी काही मीटर अंतरावर शुक्रवार पेठ पोलीस चौकी आहे. भाजलेल्या अवस्थेतच सुनीताने तिथे धाव घेतली. ड्युटीवर असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलनी घटनेचे गांभीर्य ओळखून पुढची सूत्रे लवकर हलवली. साखरीबाईला अटक झाली आणि नंतर तिला सजा देखील लागली. मला आठवतं की या घटनेचा तपास फरासखाना पोलीस स्टेशनच्या एका महिला पीआयनी अगदी व्यवस्थित पार पाडला होता. त्यामुळेच साखरीबाई खुनाच्या आरोपात दोषी सिद्ध झाली होती.

साखरीबाई आत गेली आणि सुनीताची हत्या झाली म्हणून धंदा थांबला नाही. त्यांची जागा दुसऱ्या योनीने घेतली. काहीच बदलले नाही. सगळं जसंच्या तसंच राहिलं. दरम्यान साखरीबाईसाठी बायका पुरवण्याचं काम करणारा आणि सुनीताला साखरी कडे आणून विकणारा विक्रम परमार याची हालत आस्ते कदम खस्ता होत गेली. काही वर्षांनी तो पुणे स्टेशनवर भीक मागताना दिसू लागला. मात्र तिथे देखील त्याचे उद्योग सुरूच होते.

स्टेशन परिसरातील बेसहारा एकट्या दुकट्या गरीब असहाय बायका पोरींची माहिती तो अन्य दलालांना देऊ लागला. त्याचं वय वाढत गेलं आणि व्यसनांनी त्याला पोखरलं. त्याला शेवटचं पाहिलं तेंव्हा तो अट्टल गंजेडी नशेबाज वाटला होता. मळक्या फाटक्या कपड्यात वाढलेल्या दाढीच्या खुंटातला. दात पडलेले, गालफाडे आत गेलेली. डोळे खोल गेलेले. अत्यंत भेसूर वाटला होता तो. लोक त्याच्या अवताराला भिऊन पैसे देतात हे त्याला उमगलं होतं त्यामुळे त्याचं तशातही फावलं होतं. लॉकडाउनच्या काळात तो हाल हाल होऊन मेला. त्याच्या अंगात किडे अळ्या झाल्या होत्या. बेवारस म्हणूनच त्याचा अंत्यविधी झाला तेंव्हा त्याच्या चितेच्या ज्वाळेत सुनीतेच्या बदलाच्या सूडाच्या इच्छांना मुक्ती लाभली असावी हे नक्की..

वर्तुळ पुरं होत असतं फक्त वेळ यावी लागते.

- समीर गायकवाड

Tags:    

Similar News