तिला जगू द्या, सोशल मीडियाच्या ट्रोलिंगचा धोका

अमृता फडणवीस यांच्या नवीन गाण्याच्या व्हिडिओवरुन त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. पण असे ट्रोलिंग किती भयानक ठरु शकते याचे विश्लेषण केले आहे संजय आवटे यांनी....;

Update: 2020-11-20 12:34 GMT

'तिला जगू द्या' हे गाणं अमृता फडणवीसांनी कसं गायलंय, हे काही मला फार समजलं नाही. तसंही, गाण्यातलं मला काहीच समजत नाही. प्राजक्ता पटवर्धन यांनी लिहिलेलं ते गीत आहे फारच वाईट, हे समजतं. पण, कवी संमेलनं ऐकून-ऐकून त्याची आताशा सवय झालीय. अमृतांनी ते गाणं कसं गायलं आहे, हा मुद्दा वेगळा. कदाचित वाईट गायलं असेलही. डिसलाइक करण्यात गैर नाहीही. व्यक्ती म्हणून, त्यांच्या राजकीय मतांबद्दल, नव-याच्या पदाचा गैरवापर केल्याबद्दल, अमृतांविषयी साधार आक्षेप असतीलही. पण, त्यावरच्या एकूण प्रतिक्रियांमुळं माझ्या पुन्हा लक्षात आलं: हे सोशल मीडियावाले कोणाला जगवू तर शकणार नाहीतच, पण उद्या एखाद्याचा जीव मात्र घेऊ शकतील.




 भयंकर आणि भयावह बेताल होत चालला आहे हा सोशल मीडिया. तिकडं तो अर्णब 'मीडिया ट्रायल' करतो. तुम्ही तर थेट जीवच घेत सुटला आहात एकेकाचे. आत्महत्या करायचा एखादा, अशा झुंडीमुळे. त्यातही ती व्यक्ती 'ती' असली की मग रसवंतीला बहरच! काय सुरू आहे हे? प्रश्न, आज इथे हे कोणाविरुद्ध सुरू आहे, हा नाहीच आहे. मुद्दा या विध्वंसक झुंडशक्तीच्या प्रत्ययाचा आहे. ही झुंडशक्ती स्वतःच न्यायदान करत, उद्या कोणाच्याही अंगावर येऊ शकते. वाईट पेरता आहात बाबांनो, जे उगवणार आहे, ते तर याहून वाईट आहे.





 (आता, 'आधी पेरलं कोणी' विचारत बसू नका. उद्या तुमच्या मुला-मुलींना याच भवतालात जगायचं आहे, एवढं भान ठेवा! आणि, हा भवताल फक्त राजकीय वा पक्षीय नाही, हेही लक्षात असू द्या.) अमृताच्या नावानं इथं उगवत असलेली विषवल्ली वेळीच ओळखायला हवी. आज अमृता आहे, उद्या आणखी कोणी असेल, पण काळ सोकावतोय.


Tags:    

Similar News