जागतिक महिला दिन म्हटलं की हल्ली व्हॉट्सॲप-फेसबुक-ट्वीटरचे प्रोफाईल पिक्चर बदलणं, रिक्षा फिरवल्या सारख्या इकडच्या पोस्ट तिकडे फिरवणं, महिलांच्या सन्मानाच्या बाता मारणं हे सारं ‘अनिवार्यतः’ आलंच. इतरवेळी तिच्या शरीराच्या इंचाइंचाची ‘पारख’ करणारी आणि त्यावर कॉमेंट मारणारी पोरं सुद्धा हा एकदिवसीय आदरसोहळा पाळतात.
परवा या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने औरंगाबादच्या एम.जी.एम. विद्यापीठात आयोजित आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झालो होतो. या परिषदेत महिलांच्या अनेक प्रश्नांवर चहूबाजूंनी चर्चा केली गेली. अनेक चर्चासत्रे पार पडली. पितृसत्ताक समाज व्यवस्था, महिलांच्या सामाजिक, आर्थिक, वैयक्तिक, आरोग्यविषयक समस्या, महिलांचे माध्यमातील चित्रण अशी अनेक विषयांची हाताळणी झाली. मात्र दोन दिवसाच्या एकूण सर्व सत्रात सर्वाधिक संस्मरणीय असे एक चर्चासत्र घडले. चर्चासत्राचे शीर्षक होते ‘बॉर्न टू स्ट्रगल’. मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी या चर्चासत्राच्या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.
मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या आज आपणाला नव्या राहिल्या नाहीत. थोडी हळहळ, सांत्वन, अजूनही माणुसकी शिल्लक असलेले अन मदतीला आलेले आठ-दहा हात आणि आकडेवारी देणारी न्यूज चॅनेल्सच्या आरोळ्या यापलीकडे आपण कधी गेलोच नाही. याच मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाचे काय होते असा प्रश्न फार चर्चिला जात नाही. या चर्चेसाठी सामाजिक कार्यकर्ते अभिषेक भोसले आणि याच त्या महिला सुनंदाताई खराटे, विद्याताई मोरे, वर्षाताई मोरे, राणीताई मोरे उपस्थित होत्या. आपापल्या नवऱ्याने आत्महत्या केल्या नंतरच्या साऱ्या अडचणी या महिलांनी खुलेपणाने मांडल्या. त्यांच्या मांडणीतल दुःख स्पष्ट जाणवत होतं. पण त्यांच्या बोलण्यात एक कडवटपणा सुद्धा वातावरण गंभीर करत होता.
यातल्या विद्याताई एक वेगळच रसायन होत्या. वयाच्या चौदाव्या वर्षी त्याचं लग्न झालं, पण वयाच्या अठाराव्या वर्षी त्यांच्या पदरी विधवापण आलं. लग्नाला पात्र होण्याच्या वयात त्यांना विधवेच्या आयुष्यास समोर जावं लागलं होतं. पदरी तेव्हा एक मुलगा आणि एक मुलगी देऊन नवऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. कर्ज किती तर केवळ सत्तर हजार. पण आपल्यासाठी छोटा वाटणारा आकडा त्यांच्यासाठी अस्मानी संकट म्हणून उभा ठाकला होता.
काही महिन्यातच सासरच्या लोकांनी साथ सोडली. ना घर ना शेती त्यांच्या वाट्याला आली. ती माऊली आपल्या दोन पिलांच्यासाठी अहोरात्र मेहनतीसाठी तयार होती. फक्त मुलांना चांगल शिक्षण देऊन मोठं करायचं यासाठी जगायचं हे तिने ठरवलं. पण सुखाने जगू देईल तो कसला समाज? नवरा मेलेल्या बाईला समाज कोणत्या नजरेने पाहतो आपण सगळेच जाणतो. त्या दिसायला सुंदर आणि त्यात केवळ अठरा वर्षाच्या असल्याने समाजातली पुरुषी गिधाडं त्यांच्यावर नजरा ठेऊन होती. इतक्या कोवळ्या वयाची ही बाई दुसरा संसार नक्की थाटणारच अशी पैज खुद्द सख्या दिराने गावात लावलेली हे सांगताना त्यांचे डोळे पाणावले.
नवरा मेल्यावर अंत्यविधीसाठीचे लाकडे आणण्यासाठीसुद्धा पैसे नव्हते, याच दिराने पाचशे रुपयांची लाकडे आणली आणि नंतर त्यांच्याकडून बाराशे रुपये लाकडांचे घेतले. केवळ या पैजेच्या विरोधात उभा राहायचं आणि आपलं पावित्र्य राखायचं हे मनी स्मरून त्यांनी लग्न केलं नाहीच. एकाकी पडलेल्या विद्याताई जमेल तशी मजुरी करू लागल्या, रोजंदारीतून दिवसाकाठी फक्त पंचवीस रुपये मिळायचे. कामाच्या ठिकाणी सुद्धा गिधाडी नजरा पाठ सोडत नव्हत्या. पत्र्याच्या घरात रात्री-अपरात्री पुरुषातलं कुठलं ‘जनावर’ आत शिरेल या भीतीने अख्खी रात्र उघड्या डोळ्यांनी काढाव्या लागल्या.
गावात ‘रंडकी’ या शब्दाशिवाय त्यांचा उल्लेख केला जात नव्हता. हाताला काम मिळवतांना याच ‘रंडकी’ या ओळखेने जगावं लागत होते. सासरच्या लोकांनी घराबाहेर काढल्यामुळे ना घरदार, ना शेती, ना स्वतःच्या नावाचं रेशनकार्ड, ना आधारकार्ड, ना कोणतेच दस्ताऐवज. त्यामुळे कोणत्याच शासकीय, निमशासकीय योजनांचा आधार होत नव्हता. पण तरीही अशा खडतर परिस्थितीत त्या धीराने लढत राहिल्या. त्यांच्यासारखीच कमी-अधिक प्रमाणात इतरांची कहाणी इतर महिलांनी चर्चासत्रात मांडली. यांची ओळख फक्त एकच ‘एकटी बाई’. कुणाच्या नवऱ्याने पन्नास हजारासाठी आत्महत्या केली म्हणून विधवा तर कुणी नवऱ्याने सोडलेली बाई.
अशा हजारो एकट्या बायका आज मराठवाडा-विदर्भात आपलं आयुष्य काढतायत. विद्याताई या केवळ एक उदाहरण आहेत. पण अशा महिलांना आधार दिला तो सुनंदाताई खराटे यांनी. कळंब, वाशीम येथे विधवा-परित्यक्ता एकल महिला संघटना त्यांनी निर्माण केली आणि विद्याताई सारख्या एकट्या महिलांना आधार दिला. या महिलांना दस्ताऐवज मिळवून देण्यापासून ते बचत गट, विविध योजना, कामे, घरे मिळवून देण्यापर्यंत सारी कामे आज ही संघटना करते. सुनंदा ताई खराटे यांच्या सांगण्यानुसार आजमितीला केवळ दोन तालुक्यात नऊशेहून अधिक महिला या संघटनेच्या सदस्य आहेत.
कालपर्यंत मजुरी करून आठवड्याला पंचवीस रुपये मिळवणाऱ्या या स्त्रिया आज वार्षिक दोन-दोन लाखांचे उत्पन्न काढत आहेत. विद्याताईची मुलगी आज पुण्यात शिक्षण घेतेय. समाजाने हे सुखासुखी करू दिलं असेल असा विचार करणं म्हणजे मूर्खपणा आहे. गावाकडे पुण्यात शिकण्याची क्रेझ असते म्हणून तिला पुण्यात पाठवलं असं समजू नका. त्या म्हणाल्या की मुलगी दिसायला सुंदर असल्याने तरण्याताठ्या पोरीकडे गावाच्या ‘गिधाडांची’ नजर कशी जाणार नाही? त्यात बिनाबापाची पोर म्हटलं की प्रश्नच नव्हता. शाळेत येताजाता या नजरा तिच्यामागेही असायच्या. याच कारणासाठी विद्याताई सारख्या अनेक महिलांच्या मुली आज पुण्यात शिकत आहेत. पण या एकट्या महिलांनी हार नाही मानली. त्या अजूनही लढाई करतायत. त्यांची लढाई सुरूच आहे.
या महिलांची लढाई समोर आणण्यासाठी ‘दि हिंदू’ वृत्तपत्राचे राधेश्याम जाधव सर, अभिषेक भोसले अशी काही मंडळी काम करतायत. सुनंदाताई खराटे सारख्या सामाजिक कार्यकर्त्या त्यांना पाठबळ देतायत. या महिलांचा हा लढा प्रचंड काटेरी रस्त्यातून गेला आहे आणि आजही जातोय. पण महिला दिनादिवशी अशी खरी ‘Women Empowerment’ पाहायला-ऐकायला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. यासाठी एम.जी.एम. विद्यापीठ, कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, राधेश्याम जाधव, अभिषेक भोसले, विद्यापीठाच्या डीन डॉ. रेखा शेळके आणि त्यांची सर्व टीम यांचेही मनस्वी आभार. जाता जाता विद्या ताई आणि त्यांच्या सारख्या लढणाऱ्या हजारो-लाखो एकल ‘रणरागिणी’ महिलांना सलाम!!!
– जय राणे
(लेखक बारामती येथील तुळजाराम चतुरचंद पत्रकारिता महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.)