'ती हट्टी, स्वयंप्रकाशीत', करीयरसाठी करोडपती स्थळाला नकार देणारी मुलगी
आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवतेय. मग आपल्या यशाच्या आड येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला ती सर करत असते. अशाच एका तरूणीचा अनुभव शेखर पासेकर यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
ती हट्टी स्वयंप्रकाशी
माझ्या कौटुंबिक मित्राच्या मुलाची कहाणी.
तो सशस्क्त आर्थिक कुटुंबातला, आई वडील प्रतिष्ठित डॉक्टर. त्यात हा एकुलता एक.. हा सुध्दा मेडिकलला, निर्व्यसनी मुलगा. इतर मित्रांच्या मुला मुलींबरोबर माझी मैत्री लवकर जमते. तशीच अभिषेक सोबतही जुळलेली. आम्ही एकत्र मुव्ही पण पाहतो, फिरायला जातो, तो ही बऱ्याच गोष्टी शेयर करतो आणि हे पण सांगतो 'ए काका डॉन ला नाही सांगायचे'... मी पण इकडचे तिकडे करत नाही.
एक दिवस मित्राचा कॉल आला कुठे रे तू ?? मी - इथेच आहे.
मित्र - अभिसोबत बोल रे जरा तोंड उतरवून बसला आहे एक हप्ता झाला. मी हो म्हटले. मग आरामात अभी ला कॉल केला,
मी - कुठेस रे?
अभि - बोल ना काका?
मी - मला CCD ला कॉफी पाज
अभि - पैसे नाही माझ्या खिशात
मी - ये संध्याकाळी
मी CCD रद्द करून त्याला गार्डनमध्येच घेऊन गेलो, सरळ दगडफेक करून टाकू या विचाराने मी म्हटलं का रे पोरी बरोबर लफड्यात पडलायस का? आई - बाप काळजी करता आहेत ना?
अभि - लफडयात नाही रे काका प्रेमात पडलोय.
मी त्रिफळाचित! नाकासमोर चालणारं पोरगं, घरी मर्सडीज आहे तरी टू व्हीलर वर फिरणारा जमिनीवर राहणारा चक्क प्रेमात?
दोन तीन दिवस झालेत. अभि मला एका नावाजलेल्या सोन्याच्या शो रूम मध्ये घेऊन गेला. दार उघडलं तर समोर एक सावळ्या रंगाच्या, नाकी डोळे नीट, रेखीव चेहऱ्याचा मुलीने आमचं स्वागत केले, काय हवं नको ते विचारलं आणि समोरच सोफ्यावर बसायला सांगितलं. आम्ही बसलो. ट्रे मध्ये एकाने कोकम सरबत आणले. इकडे अभिने मला बोट टोचले आणि स्वागत करणारी मुलगी बघ असे खुणावले.
अभि - कशी वाटली?
मी -छानच आहे.
काऊंटर वर जुजबी चौकशी करून आम्ही बाहेर पडलो .भाऊ प्रेमात पडला होता पण मुलीचे नाव, गाव, पत्ता, आई वडील कोण हे माहीत नाही.
मी बरीच उलथापालथ करून पोरीच्या घरचा पत्ता मिळवला तिच्या घरी पोचलो आणि मागणीच घातली. डॉक्टर ला पण मुलगी लांबून दाखवून झाली होती. मध्यम वर्गीय गरिबाची पोरगी आहे होकारच असेल असं गृहित धरून आम्ही बिनघोर होतो पण मुलीचा ठाम नकार. मी तिच्या आई वडिलांच्या शब्दशः पाय धरायचे बाकी ठेवले होते. मला करियर करायचेय असा तिचा हटट्! अगं चार पिढ्या बसून खाशील तू मी त्रागा करून अनिता वर रागावलो पण ती ढिम्म, तुम्ही बसा काका मी येते अभ्यासिकेत जाऊन असं म्हणून ती निघून गेली.
इकडे अभिषेक ला समजावून सांगताना आम्हाला मानसिक थकवा येत होता. त्याचे लग्न झाले तो ऑस्ट्रेलियात सेटल झाला. एक दिवस सुवर्ण पेढी वरून जातांना पावले सहज वळली. मला अनिता ला भेटायची ओढ लागलेली. मनातल्या मनात मी चरफडत होतो की किती मूर्ख मुलगी आहे ही छान परदेशात गेली असती, सुखात राहिली असती. मी दरवाजा उघडून आत तर आता वेगळीच मुलगी स्वागत करत होती मी सरळ काऊंटर वर अनिता कुठे दिसत नाही? असं विचारलं. त्यावर काका ती PO झाली नॅशनल बॅंकेत असं उत्तर आलं.
मी - कधी?
काऊंटर - वर्ष झाले
मी - ब्रांच?
काऊंटर - मुंबईत जुहू की कुठे तरी.
मला माहिती आहे तू आज ही कुठली तरी परीक्षा देत असशील, पास तर तु होणारच! म्हणून मी तुझा शोध आता थांबवतोय कारण तुझ्या बॅंकेत पोहोचल्यावर मला खात्री आहे की हेच उत्तर मिळेल, 'अरे अंकल वो CA बन गयी है और आजकल अंधेरी मे खुद का ऑफिस भी बनवा लिया है उसने.'
असंच होणार आजकाल मुली स्वाभिमानी झाल्यात आणि सगळीकडे आहेत. कोणी BE करतेय/UPSC / MPSC / पोलीस भरती / नर्सिंग / लॉ / डॉक्टर होत आहेत. मुख्य म्हणजे त्या नकार दयायला शिकल्या आहेत. जशी तुम्ही बसा काका मी आले अभ्यासिकेत जाऊन म्हणत लगबगीने घर सोडणारी अनिता वाचलीत तशाच सगळ्या आहेत हट्टी स्वयंप्रकाशित!
लेखक
शेखर पासेकर