स्त्रीचे मन आणि तिची कामेच्छा

सेक्स लाईफमध्ये अनेक पुरूष पत्नीच्या असहकार्याची तक्रार करत असतात. पण त्यामागची कारणं काय असू शकतात याचे विश्लेषण केले आहे स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. साधना अमोल पवार यांनी....;

Update: 2021-01-30 08:41 GMT

नो डाऊट, सेक्स ही मानवाची मूलभूत गरज आहेच.

हवा, अन्न, पाण्याइतकीच मूलभूत...

आणि ही गरज खूप absolute, आणि primary म्हणजे की, ज्याच्या वाचून आपण जगूच शकत नाही अशी नसली तरी आनंदी जीवनासाठी खूप महत्त्वाची आणि इतर गरजांच्या तुलनेत अनेक भावनिक गुंतागुंतीनी वेढलेली अशी आहे. या विषयावर फारसं बोललं जात नाही,लिहिलं जात नाही.आणि लिहिलं तरी ते लिहिणारे एक्सपर्टस असतीलच असे नाही ,त्यामुळे ते मांडत असलेले बरेच मुद्दे exaggerated तरी वाटतात किंवा काही मुद्दे फार underestimated तरी वाटतात.

या विषयावर लिहा असा आग्रह बरेच दिवस होता म्हणुन प्रॅक्टिस मधील अनुभवांवरून ,काही सहकारी डॉक्टर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतरचे या विषयावरील मुद्दे मी मांडत आहे,या लेखात फक्त 'स्त्रीला सेक्स करण्याची इच्छा न होणे' याच मुद्द्यावर साधारण विषय कव्हर होईल आणि फारच मोठा लेख होवू नये या हिशोबाने लिहिले हे.कामपूर्ती, लैंगिक संबंधातून पसरणारे आजार किंवा वंध्यत्व हा या लेखाचा विषय नाही.

तर,बऱ्याचदा आमच्याकडे जोडपी येतात.नवऱ्याची तक्रार असते की, हीला इच्छाच नसते सेक्सची.....काहीही केलं तरी ती थंडच आणि ढिम्मच असते. उलट स्त्रीचं बहुतांश वेळा म्हणणं असतं की, मला नाही सारखं सारखं त्यात इंटरेस्ट वाटत..कोणाला अभ्यासाच्या, करीयरच्या टेन्शनमुळे,कोणाला गर्भधारणेच्या भीतीमुळे,कोणाला पुरेशी प्रायव्हसी आणि वेळच नसल्यामुळे,कोणाला सेक्स दरम्यान वेदना होत असल्यामुळे,तर कोणाला समस्त पुरुषजाती विषयीच असणाऱ्या घृणेमुळे, आणि contrary to popular belief of men क्वचितच प्रसंगी हॉर्मोन्समुळे..

स्त्रीला कामेच्छा कमी असण्याची कारणे अनेक असली तरी उपचार बहुधा गोळ्या, इंजेक्शने या स्वरूपातील नसतात तर स्त्रीचे आणि त्या जोडप्याचे योग्य समुपदेशन या प्रकारातील असतात.पण त्यासाठीच्या स्पेशालिस्ट डॉ. कडे म्हणजे मानसोपचारतज्ञ यांच्याकडे बहुतांश जोडपी जात नसल्याने आम्हीच या जोडप्याचे counselling/ समुपदेशन करतो.

तिच्याशी डॉक्टर म्हणून न बोलता मैत्रीण म्हणून बोलावं लागतं,तिच्यावर काहीही ठपका न ठेवता, जजमेंटल न होता तिचं ऐकून घ्यावं लागतं,तिला आणि त्यालाही समजावून सांगावं लागतं. कामजीवन /सेक्स लाईफ व्यवस्थित नसल्याने लग्नं मोडू शकतात किंवा लग्नं मोडकळीस आलेली असतात म्हणूनही कामजीवन /सेक्स लाईफ डिस्टर्ब असतं! असंही असू शकतं. एकमेकांमध्ये मोठी दरी असूनही अनेक लग्नं केवळ सेक्समुळे टिकलेली असतात.

मानसिक स्वास्थ्य पुरेसं ठीक नसणे हे स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या ही कामजीवनातील इंटरेस्ट कमी असण्याचे सर्वात मोठे कारण आहे. स्त्रियांमध्ये खूपच कॉमन असणारे साधे नैराश्य,अतीकाळजी किंवा आयुष्यात मोठा अपघात घडला असल्यास त्याची बराच काळ राहणारी कटू आठवण, कमी आत्मविश्वास असणे अश्या मानसिक समस्यांमुळे कामक्रिडेतील तिचा इंटरेस्ट संपू शकतो. पुरुष सेक्स ही एक तात्पुरती शारीरिक गरजेची गोष्ट मानतो पण स्त्रीचं तसं नसतं,या बाबतीत खरंच Women are from Venus and men are from Mars हे खरं आहे. हे समजून न घेतल्यामुळे बऱ्याच जोडप्यांमध्ये विसंवाद आढळतो.

स्त्री फार भावनिक असते,तिच्या भावविश्वात, तिला पसंत असलेल्या जोडीदाराकडून मिळणाऱ्या प्रेमाला फार महत्त्व असते. पार्टनर आवडत असेल तरच स्त्री उत्तेजीत होते,सक्रिय सहभाग घेते आणि तिला orgasm सुध्दा मिळतो. जोडीदारा बद्दल मनात अढी असेल तर ती केवळ शरीराची गरज म्हणून कामक्रीडेत सहकार्य करू शकत नाही.

पुरुषांप्रमाणे आणि बहुतांश पुरुषांना वाटते त्याप्रमाणे स्त्री नग्नतेने उत्तेजीत होत नाही, उलट नग्न पुरुष तिला किळसवाणा वाटतो. बहुतांश स्त्रियांना यामुळेच पॉर्न पाहणे आवडत नाही. पुरुषांप्रमणे ते स्त्रियांना उद्युक्त करत नाहीत. उलट त्यात असलेले अमानवीय अनैसर्गिक प्रकार बघून तिची असलेली इच्छाही कायमस्वरूपी मरून जावू कते. सेक्सबद्दल भीती निर्माण होवू शकते.

प्रथम समागम बहुतांश स्त्रीयांसाठी वेदनादायक असतो, त्या 'कबीर सिंग' पिक्चर मधल्यासारखं पहिल्यांदा सेक्स झाल्यावर ती हिरॉईन निवांत हसत पडलेली असते असं 99% मध्ये नसतं. अपवाद अर्थातच सगळीकडेच असतातच. त्यावेळी पुरुष जोडीदाराकडून केली गेलेली घिसाडघाई, जबरदस्ती, अनैसर्गिक समागम, अवास्तव अपेक्षा स्त्रीला आयुष्यभरासाठी frigid, कामक्रीडेत थंड बनवू शकतात.

पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या सेक्सबाबतच्या कल्पनांमध्ये फारच फरक असतो, फारच म्हणजे साधारण 'कबीर सिंग' मधल्या शाहिद कपूर आणि विवाह मधल्या शाहिद कपूर इतका! 😅

जेंव्हा स्त्रिया भेटतात तेंव्हा त्या सेक्सबद्दल क्वचितच बोलतात. स्त्री ही सेक्सला समर्पण किंवा अत्युच्च प्रेमाचे प्रतीक मानत असते, त्यामुळे तिला त्या क्रियेमध्ये घाई अजिबात आवडत नाही. प्रत्यक्ष सेक्सपेक्षा foreplay आवडतो बहुतांश स्त्रियांना. प्रत्यक्ष सेक्सपेक्षा cuddling आवडतं बहुतांश स्त्रियांना प्रत्यक्ष सेक्सपेक्षा..

मी इतकी छान आहे की माझ्या जोडीदाराला ,फक्त मी आणि मीच आवडते, माझ्यावर प्रेमाचा उमाळा आल्यामुळे तो माझ्या जवळ आलाय ही भावना तिला सुखावत असते.

लहानपणी जर काही लैंगिक चाळे झाले असतील,अत्याचार झाला असेल तर ते स्त्रीच्या सायकॉलॉजीला खूपच प्रभावित करत असते. लहानपणापासून जर स्त्री पुरुष एकत्र येणं काहीतरी मोठं पाप असं

कळत नकळत बिंबवलं गेलं असेल तर स्त्री सेक्स या क्रियेला अपवित्र मानत असते. जोडीदाराच्या तोंडाचा, अंगाचा जननेंद्रियांचा वास आवडत नसेल तर सेक्सबद्दल घृणा निर्माण होवू शकते.

दिवसभर कामाने दमून गेलेल्या स्त्रीकडून सेक्समध्ये सक्रिय सहभागाची अपेक्षा कशी ठेवणार? लहान मूल अंगावर पीत असेल तर, किंवा डिलिव्हरी नंतर किंवा काही कारणाने प्रायव्हेट पार्टसच्या ठिकाणी काही ऑपरेशन झाले असल्यास तो भाग दुखरा अती संवेदनशील होवू शकतो आणि त्यामुळे कामेच्छा कमी होवू शकते.

जोडीदाराने जर तिच्या ऑर्गजमची काळजी न घेताच सगळं उरकलं, आणि असं वारंवार झालं तर तिचा इंटरेस्ट निघून जातो. कारण एकदा excite झाल्यानंतर, विना orgasm पुन्हा पूर्ववत होणे तिच्यासाठी अत्यंत कठीण असते. त्यामुळे पुरुषांनी तिच्या orgasm ची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.

स्त्रीची नैसर्गिक कामेच्छा विशीपंचविशी पेक्षा पस्तीस ते पंचेचाळीस या वयात छान असते. त्याचं कारण कदाचित तेंव्हा आलेलं स्थैर्य,मुले मोठी झाल्याने स्वतःला वेळ देवू शकणे,आयुष्यात काहीतरी तरी अचिव्हमेंट केलेली असल्याने येणारा आत्मविश्वास हे असेल. यावेळी जोडीदाराने स्वतःला जास्त व्यस्त करून घेवून तिला योग्य तो वेळ दिला नाही तर तिची कुचंबणा होवू शकते.

पुरुषांनी हे लक्षात घ्यावं की, She is good in bed, when she is happy, comfortable, when she feels secure, confident about herself.

ती आनंदी असते तेंव्हा आपोआपच तिच्या योनीमार्गातील स्त्रावाला स्त्रवू द्यावं,तिला initiation घेवू द्यावं, मग हळूहळू पुरुषाचा सक्रिय सहभाग सुरू करावा.

स्त्रियांची कामेच्छा खूपशी त्यांच्या मनाशी जोडलेली असते हे खरे, त्यामुळे निरोगी काम जीवनासाठी तिचे मानसिक स्वास्थ सांभाळणे हे आवश्यक आहे. त्यासाठी तिच्या अपेक्षा पूर्ण करणे,तिला आवडेल असे वागणे,तिचे भावविश्व समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

बायको थंड आहे म्हणून नाराज

नवऱ्यानो, जोडीदारांनो

इट्स ए मन की बात!

समझो !

डॉ. साधना अमोल पवार,

स्त्री रोग व प्रसूती तज्ञ,पलूस

Tags:    

Similar News