गरोदर राहण्याचं नेमकं योग्य वय तरी काय?
वयाची तिशी ओलांडलीये का? घरचे लग्न कर म्हणुन मागे तगादा लावतायत? लग्न झाल्यानंतर मुल जन्माला घाला म्हणुन मागे लागले आहेत? तिशी ओलांडली आता तुला काही मुल होत नाही अशी भिती घातली जातेय का? तर जरा थांबा... ३० काय अगदी वयाच्या ३५ मध्येही आपण गरोदर राहू शकता. काय आहे यामागचं कारण जाणून घ्या या लेखामध्ये....;
जर आपण सिंगल आहात आणि आपलं वय ३० च्या जवळपास आहे तर जगासाठी आपला आयुष्यातील सगळया महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे आपलं लग्न! लोक आपल्याला वयाच्या तिशीनंतर आपलं आयुष्य संपणार आहे याची जाणीव करून द्यायला जराही कसर सोडत नाहीत. असं काय होतं ३० नंतर? घरातली मंडळी जे स्पष्ट शब्दात सांगत नाहीत ते मी आपल्याला सांगतो. वयाची तिशी ओलांडल्यानंतर अशी मान्यता आहे की आपली फर्टीलिटी संपते. लग्न करा, लग्न करा अस तगादा लावण्यामागेही हेच कारण असतं ना की आयुष्य पुढे सरकवा, मुलं जन्माला घाला. त्यातही जर आपण महिला आहात आपली पस्तीशी पार झाली आहे तर मग तर आपल्याकडून कुणी अपेक्षाच करत नाही. आता तर आपण म्हाताऱ्या झाल्या आहात आता आपल्याला काय मुलं होणार? पण पुरूष कायमच तरूण असतो नाही का... चला तर मग आज जाणून घेऊयात मुलं जन्माला घालण्याचं योग्य वय काय आहे?
वयाच्या पस्तीशीनंतर फर्टीलिटी अचानक कमी होत जाते. आई होणं थोडं कठीण होऊ लागतं. आपल्याला ठाउक आहे का की ही आयडीया कुठून आली आहे? आजपासून ३०० वर्षांपुर्वी केल्या गेलेल्या रिसर्चमधून! फ्रान्स मध्ये झालेल्या एका अभ्यासातून असं निदर्शनास आलं की ज्या महिलांचं वय ३५ पेक्षा जास्त होतं त्यापैकी एक तृतियांश महिलांना मुलंच झाली नव्हती आणि एक वर्ष प्रयत्न करूनही मुलं काही झाली नव्हती. या एका रिसर्चचा दाखला अगणित माध्यमांच्या आणि वैद्यकिय रिपोर्टसमध्ये दिला गेला आहे. पण ३०० वर्षांपुर्वीचा काळसुध्दा वेगळा होता ना... तेव्हा ना वीज होती ना आजसारखं अन्न ना औषधं! त्या काळात तर आपल्याला पस्तीशीनंतर वृध्द घोषित केलं जायचं. आजचा काळ वेगळा आहे. आधी शिक्षण मग करीयर या सर्व जंजाळात ३० -३५ पर्यंत तर मुला बाळांचा विचार अनेकांच्या मनाला शिवत सुध्दा नाही. पण जेव्हा की आपल्याला इतकी भिती घातली गेली आहे की जर ३० – ३५ पर्यंत मुल जन्माला नाही घातलं तर आपण कधीच मुल जन्माला घालू शकत नाही. परिणामतः याकरता अंडी फ्रीज करणारी एक नवी इंडस्ट्रीच उभी राहीली आहे.
बीजांडं फ्रीज करता येत...
आपल्याला सांगितलं जातं की आपण तारूण्यातच आपली अंडी फ्रीज करून ठेवा आणि निश्चिंत व्हा. जेव्हा मुल जन्माला घालायचं असेल तेव्हा अंडी वापरता येऊ शकतात. ही प्रक्रीया खुप महाग असते आणि कंपन्या यातून करोडो रूपयांचा कमाई करतात. पण आपल्याला ठाऊक आहे का की या प्रक्रीयेच्या यशाचा दर फक्त २० टक्केच आहे. त्यातही ज्या महिलांनी आपली अंडी फ्रिज केली आहेत त्यापैकी फक्त ५ टक्केच महिलांनी त्यांचा वापर केला आहे.
गर्भधारणा न होण्याची कारणे कोणती?
चला तर अंडी जरा बाजुला ठेऊयात. आधी हे समजुन घ्या की मुल न होण्याची नेमकी कारणं काय आहेत. वयाखेरीज आणखी अनेक कारणं आहेत जी आपण दुर्लक्षित करतो. धुम्रपान. धुम्रपान संपुर्ण प्रजनन प्रणालीवर वाईट परिणाम करतं. फक्त महिलांसाठीच नाही तर पुरूषांसाठीही धुम्रपान वाईटच आहे. पुढचा क्रमांक लागतो व्यायामाचा! व्यायाम शरीरीसाठी चांगला असतो नाही का? पण कोणत्याही गोष्टीचं अती कधीच चांगलं नसतं. नॉर्वेमध्ये झालेल्या एका अभ्यासात असं दिसुन आलं की ज्या महिला दर दिवशी हेवी वर्कआउट करत होत्या त्यांचे इतर महिलांच्या तुलनेत गरोदर राहण्याचे चान्सेस एक तृतियांश कमी झाले होते. ज्यावेळी त्यांनी व्यायामाची तीव्रता कमी केली तेव्हा कुठे त्या गरोदर राहू शकल्या.
PCOD किंवा PCOS म्हणजे काय?
आपण गर्भधारणा का नाही करू शकत आहात याची आणखी अनेक कारणं असू शकतात. आपल्या जोडीदाराचा शुक्राणू दर कमी असू शकतो किंवा आपल्या शरीरात स्त्री बीजांची निर्मितीच होत नसेल. आणि सध्या आढळणारं सर्वात सामान्य कारण PCOD किंवा PCOS म्हणजेच Polycystic Ovarian Disease किंवा Polycystic Ovarian Syndrome!
यात नेमकं होतं काय तर स्त्रीबीजांमध्ये बीजकोष तयार होतात ज्यामुळे वेळेत बीजांड सुटत नाहीत. याचं नेमकं कारण काय तर हार्मोन्स! PCOD एक हार्मोनल डिसॉर्डर आहे. त्यामुळे याच्या उपचाराखातर आपल्याला गर्भ निरोधक गोळ्यांच्या नावाखाली हार्मोन्सच दिले जातात. PCOD वर आपण पुन्हा कधी तरी विस्ताराने जाणून घेऊ. तुर्तास आपण फक्त पुढील गोष्टींची काळजी घ्याल. जर आपली पाळी अनियमित आहे, जर दर महिन्याला आपल्या चेहऱ्यावर मुरूम म्हणजेच पिंपल्स येतायत, जर आपल्याला रात्रभर व्यवस्थित झोप लागत नाहीये तर एकदा डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला जरूर घ्या.
तसंही मुल जन्माला घालण्याचं एक योग्य असं वय नसतं. यौवनापासून रजोनिवृत्तीपर्यंत म्हणजेच मेनोपॉजपर्यंत आपण कधीही गर्भधारणा करू शकता. हा हे खरं आहे की पौगंडालस्थेत महिला आणि पुरूष दोघंही सर्वाधिक प्रजननशील असतात. पण असंही होत नाही की पस्तिशीनंतर अचानक फर्टीलिटी एकदम कमी होऊन जाते. हे अगदी हळूहळू होत असतं. आपली प्रजनन प्रक्रीया जर व्यवस्थित काम करतेय तर गरोदर राहणं शक्य आहे. हे ही समजुन घ्यायला हवं की कधीही गरोदर राहता येत नाही. आपण गरोदर फक्त महिन्यातुन एकदाच होऊ शकता जेव्हा आपण ऑव्ह्युलेट होत असता. आपल्यासाठी ऑव्ह्युलेशन दिवस कोणता आहे हे आपण आपल्या डॉक्टरांकडूम माहिती करून घ्या.
गर्भधारणा नेमकी कधी होते?
जेव्हा आपण ऑव्ह्युलेट करत असता तेव्हा बीजांड शुक्राणूसोबत संगमासोबत तयार होऊन बसलेलं असतं. पण हे खुप वेळ वाट नाही पाहू शकत. बीजांडाकडे फक्च २४ तास असतात. तरी शुक्राणू योनीमध्ये २ ते ३ दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो. त्यामुळे आपल्याला गरोदर राहायचं असेल तर ठीक ऑव्ह्युलेशनच्या दिवशी किंवा त्याच्या दोन तीन दिवस आधी संभोग करू शकता.
आपण पस्तिशीमध्येही गरोदर राहू शकता. रजो निवृत्ती ही चाळीशी किंवा पंचेचाळीशीनंतर सुरू होत असते आणि तेव्हा आपण गर्भधारणा नाही करू शकत. पण मग म्हणून याचं टेंशन दहा वर्ष आधीपासूनच घेण्याची काय गरज? तर टेंशन घेऊ नका आनंदात राहा. जितक्या आनंदात राहाल तितके आपले हार्मोन्स आपल्या बीजांडाला आनंदी ठेवतील आणि आपल्याला गर्भधारणा करणं सोपं जाईल.