बायांनो, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबरोबर केकची नाही तर कोशिंबिरींची लाट येवू द्या
स्त्री रोग व प्रसुतीतज्ज्ञ डॉक्टर साधना पवार यांचं महिलांना आवाहन;
बायकांनो, परत लॉकडाऊन झालाच तर काहीही करा पण, ते आईस केक तेव्हढे बनवू नका. गेल्या वर्षी कोरोनाच्या साथीबरोबरच ही घरच्याघरी आईस केक बनवायची पण साथ आली होती.
सगळ्या मित्र मैत्रिणींच्या आयांनी केलेल्या केकचे फोटो स्टेटसला बघितल्यामुळे बच्चे कंपनीद्वारे आमच्याकडेही तो घाट घातला गेला होता. त्या केकसाठीचे घटक पदार्थ पाहून मात्र डोकंच गरगरलं होतं. आपण केक या गोंडस पदार्थाद्वारे शरिरात जे काही ढकलतो ते भयावह रित्या उच्च उष्मांक असलेले आहे. याची तेंव्हा जाणीव झाली.
हे असले मैदा, बटर, तूप, पिठीसाखर आणि वरून कॅरॅमल वगैरे असले घटक पदार्थ असलेले केक इतक्या कष्टाने केलेले असल्यामुळे अजिबात वाया घालवू न देता आणि शिवाय कोरोनाचे टेन्शन त्यामुळे अंमळ कमी होत असल्यामुळे पोटभर खाऊन बायकांनी मस्त पैकी आपली वजने चार पाच किलो वाढवून घेतली होती.
मजा म्हणजे तेंव्हा कडक लॉकडाऊन मध्ये भाजी पाला फळे मिळोत ना मिळोत पण बायकाना किराणावाले बझारवाले हे केकचे साहित्य मात्र व्यवस्थित पुरवत होते.
बायकांनो, लक्षात ठेवा भारत मधुमेहाची राजधानी आहे जगातली आणि कोरोना झालाच तर शुगर जास्त असलेल्याना जरा जास्त रिस्क आहे. स्वयंपाक घर ज्याच्या हाती तो घरा उध्दारी, तारी हे लक्षात असू दे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबरोबर आईस केकची लाट न येता वेगवेगळ्या कच्च्या कोशिंबिरींची लाट आली तर बरं होईल.
कळलं ना?
काय म्हणता मग?
- डॉ साधना पवार
लेखिका स्त्री रोग व प्रसुतीतज्ज्ञ आहेत..