कोरोनानंतर परिस्थिती बिकट झाली होती ,असा विषाणू पुन्हा न येण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले जातात .पण काही विषाणू पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहेत . जसं कि H3N2 हा विषाणू . महाराष्ट्रात कोरोना सारखी लक्षणे असलेल्या H3N2 इन्फ्लूएंझाची प्रकरणे वाढत असून राज्यात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात H3N2 इन्फ्लूएंजाचा प्रसार वाढत आहे .त्यामुळे कोरोननांतर आता पुन्हा एकदा भीतीचं सावट राज्यावर आलं आहे. राज्यात या रोगाची साथ पसरली असून सर्दी आणि खोकल्यामुळे अनेकजण हैराण आहेत. या विषाणूची लक्षणेही कोरोनासारखी असल्याने अधिक चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एमबीबीएसचं शिक्षण घेणारा एक विद्यार्थी बाहेर फिरायला गेला होता. तिथून आल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली होती. तसंच, तो H3N2 बाधित असल्याचं निष्पन्न झालं होतं.त्याला रुग्णालयात दाखल केलं मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुसरी घटना नागपुरात घडली आहे. नागपुरात ७५ वर्षीय व्यक्तीचा H3N2 मुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यात H3N2 मुळे आतापर्यंत २ मृत्यू झाले असून संपूर्ण देशभरात या विषाणूमुळे चारजणांचा जीव गेला आहे.
H3N2 ची काय आहेत लक्षणे ?
H3N2 ची लक्षणे सामान्यच आहेत
खोकला
ताप
थंडी वाजून येणे
मळमळ
उलट्या
घसा खवखवणे/घसा दुखणे
अतिसार
नाक वाहणे
शिंका येणे यांचा समावेश होतो.
गंभीर प्रकरणांमध्ये संक्रमित व्यक्तीला श्वास घेण्यात अडचण, छातीत दुखणे/अस्वस्थता, अन्न गिळण्यात अडचण आणि सतत ताप येऊ शकतो. जर कोणाला ही लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.बदलत्या हवामानामुळे ताप, सर्दी, खोकला या आजारांमध्ये वाढ होत आहे. राज्यातील अनेक दवाखाने आणि रुग्णालये रुग्णांनी फुलून गेली आहेत. दरम्यान, H3N2 चा वाढता प्रसार चिंता वाढवत आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसंच, सोशल डिस्टन्सिंगसारख्या कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केल्यास H3N2 चा प्रसार रोखता येईल, असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.