सोमालियात एका चार वर्षाच्या मुलीच्या योनी भागाला ब्लेडनं कापून ते पुन्हा शिवण्यात आलं, अत्यंत अमानुषपणे या चिमुकलीच्या जीवाशी खेळणारे बाहेरचे नसून तिच्या घरातलेच आहेत. आफ्रिका, आशिया आणि पुर्व मध्यातील काही देशांमध्ये हे प्रकार सर्रासपणे घडतात.
एक चार वर्षाची छोटीशी चिमुकली जिला स्वत:बद्दल काहीच माहीत नाहीये तिला फक्त खेळायचं बागडायचं इतकचं काय ते माहीत. तिच्या घरी एके दिवशी अचानक एक वयस्कर बाई येते तेव्हा तिला तिची आई सांगते की, या तुला पवित्र करण्यासाठी आल्या आहेत तुला फक्त थोडसं दुखेल, थोडासा त्रास होईल, मग नंतर आयुष्यभरासाठी तु पवित्र, निर्मळ होशील. ती बाई त्या मुलीला खाली झोपवते, कोणत्याही प्रकारची भूल न देता किंवा औषध न देता तिच्या गुप्तांगाजवळील एक छोटासा हिस्सा कापला जातो आणि तो पुन्हा शिवला जातो. ती मुलगी बेशूध्द होते विव्हळते ओरडते परंतु तिच्या आईला सुध्दा तिची दया येत नाही हे मोठ दुर्दैवं म्हणाव लागेल. यालाच इस्लाम धर्मात खतना म्हटलं जातं. मुस्लीम धर्मात मुलांचा खतना केला जातो ही बाब सर्वांनाच माहिती आहे, परंतु मुलींचा देखील खतना केला जातो ही बाब तितक्याशा लोकांना अजुनही माहीत नाहीये.
सोमालिया आफ्रिकन महाद्विपमधील एक देश आहे आणि सोमालियात आजपर्यंत ९८% मुलींचा खतना केला गेला आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात खतना करण्याचं प्रमाण वाढलं आहे. सध्या पवित्र रमजानचा महिना असल्यानं देखील या काळात खतनाचं प्रमाण वाढलंय. सोमालियात खतना करणाऱ्यांची एक टोळी देखील आहे. हा त्यांचा पिढीजात व्यवसाय असून ही लोकं घरोघरी जाऊन प्रत्येकाला विचारतात की, तुम्हाला तुमच्या मुलीचा खतना करायचा आहे का? आणि तेथील लोकं ते करतात देखील. सध्या लॉकडाऊन मुळे सगळेच घरी आहेत आणि शाळांना सुट्ट्या देखील आहेत. खतना केल्यानंतर मुलींना सावरायला म्हणजेच बरं व्हायला जवळपास एक ते दीड महिन्याचा कालावधी लागतो. लॉकडाऊन असल्यामुळे सध्या एवढा वेळ मिळतो आहे. परिणामी सोमालियात सध्या खतन्याचं प्रमाण वाढलं आहे.
खतना नक्की काय आहे? आणि तो का केला जातो?
सोमालियात लहाणपणीच मुलींचा खतना केला जातो, तीच्या गुप्तांजवळील एक अंग आहे ज्याला इंग्लिश मध्ये फिमेल जेनिटल म्युटीलेशन किंवा (FGM) असं म्हणतात. मुस्लीम समाजात लहाणपणीच मुलांच्या गुप्तांगावरील अतिरिक्त त्वचा कापून काढली जाते, हा झाला मुलांचा खतना. मुलींच्या गुप्तांगावर क्लिटॉरस नावाचा एक छोटासा पातळ पडदा असलेला भाग असतो तो मुलींच्या गुप्तांगाच्या वरिल भागावर असतो जो ब्लेडनं कापून काढला जातो आणि तो शिवला देखील जातो असं केल्यानं मुलींची संभोग करण्याची इच्छाच मरुन जाते. मग तिच्या लग्नापर्यंत कोणत्याही पुरुषासोबत तिचे शारिरिक संबंध होत नाही आणि ती पवित्र राहते असा समज मुलींचा खतना करण्यायामागे असतो.
खतना प्रथा मोडण्यासाठी जगभरातील अनेक संस्था सध्या काम करत आहेत, काहींना यात यश मिळालं आहे. तर, काहीजण अजूनही या प्रथेच्या विरोधात देशभर जाऊन काम करतात. लहान मुलींचा खतना केल्याने गुप्तांगासंबंधीत रोग वाढण्याच्या शक्यता जास्त असतात. त्या मुलीला मोठेपणी प्रसुतीदरम्यान सहन न करता येण्यासारख्या वेदनांना सामोरं जावं लागतं. तसेच त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण होतो.
जेव्हा खतना केला जातो तेव्हा त्या लहान मुली वेदनेनं विव्हळत असतात आणि बेशुध्द पडतात. सोमालियात खतनाला 'हराम की बोटी' असं देखील म्हणतात. सोमालियात खतना करणाऱ्या टोळ्या पैशांसाठी सध्या घरोघरी जाऊन खतना करण्यासाठी पालकांना प्रेरीत करतात आणि पालक देखील जीवघेण्या प्रथेला बळी पडून आपल्या मुलींच्या जीवाशी खेळण्यासाठी तयार होतात.