Fact Check: जगातील पहिली कोरोना लस चाचणी केलेल्या महिलेचा मृत्यू?

Update: 2020-04-27 00:30 GMT

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलेलं असताना अनेक देश या विषाणूवरील लस शोधण्याच्या प्रयत्नात गुंतले आहेत. असाच एक प्रयोग इंग्लडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत करण्यात येत आहे. जगात सर्वप्रथम कोरोना विषाणूवरील लसीची मानवी चाचणी दोन व्यक्तींवर करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूला हरवण्यासाठी बनवण्यात आलेल्या लसीचा पहिला मानवी प्रयोग लंडन मधील एका महिलेवर तीन दिवसांपुर्वी करण्यात आला होता. मात्र, या प्रयोगात तीचा जीव गेला असल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली आहे. यावर ब्रिटीश सरकारने खुलासा करताना ही बातमी सत्य नसून केवळ अफवा असल्याचं स्पष्ट करत अशा अफवा न पसरवण्याची तंबी दिली आहे.

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. एलीसा ग्रॅनेटो या कोरोना लसीची प्रायोगिक टेस्ट घेणाऱ्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. ऑक्सफर्डमध्ये या लसीची चाचणी घेण्यासाठी एलिसा यांच्यासह आणखी एका व्यक्तीला लस टोचण्यात आली. शुक्रवारी त्यांना ही लस टोचण्यात आली होती. रविवारी त्यांचं निधन झाल्याची अफवा सर्वत्र पसरली. यानंतर खुद्द एलिसा यांनी बीबीसी ला दिलेल्या मुलाखतीत त्या ठणठणीत असून या प्रयोगासाठी सहाय्य करण्याचा आनंद असल्याचं एलिसा यांनी सांगितलं.

Similar News