सूर्यनारायणाची सकाळची लुसलुशीत कोवळी किरणं दुपार होताच एवढं प्रखर रूप धारण का करतात, हेच कळत नाही. आताशा घराबाहेर पडणं, नको वाटू लागलं आहे. पण कामं अडतायेत म्हटल्यावर बाहेर जाणं आलंच. म्हणतात नं, आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, हेच खरं!
स्कार्फ, सनकोट, शूज, हॅन्डग्लोज आणि गॉगल असा साजशृंगार करून बाहेर पडलो, तरी मानेलगत एखादा फॅन अटॅच का करता येत नाही, याची राहून राहून खंत वाटते. तापलेल्या स्कुटीवर बसल्यावर स्कुटीआधी आपल्यालाच उन्हाची किक बसते. स्कुटीने वेग घेतला की उकळत्या पाण्याच्या वाफारा तोंडावर यावा, तसा फील येतो. अशा वेळी वाटतं, म्हशींसारखं नदीच्या पाण्यात डुंबत बसावं, नाहीतर कोणीतरी गारेगार पाण्याचे फवारे मारावेत,नाहीतर बर्फ़ाचे क्यूब तरी आकाशातुन गारांसारखे पडावेत. असे विचार करण्यातही एक प्रकारचा गारवा मिळतो, जो आपला मेंदू नामक कॉम्प्युटर कुल ठेवतो. त्यामुळे अंगाची काहिली झाली, तरी हेड क्वार्टर शांत राहतं आणि दुपारचा नाईलाजास्तव करावा लागणारा प्रवास सुसह्य होतो.
आज अशाच भर दुपारी दळण आणि इस्त्रीला कपडे टाकायला म्हणून घराबाहेर पडले. हाकेच्या अंतरावर जायचं होतं, म्हणून डोक्याभोवती नुसती ओढणी गुंडाळून घेतली होती. तर चटके बसायला सुरुवात झाली. पायात चप्पल असूनही चिप्पी खेळताना लंगडत एक एक घर ओलांडून जावं तशी मी पाऊलं टाकू लागले. मग विचार केला, एवढा त्रास फक्त आपल्यालाच होतोय, की इतरांनाही होतोय? ते हा प्रॉब्लेम कसा फेस करतातेत, ते पाहू. म्हणून मान फिरवून सभोवताली पाहिलं, तर कितीतरी लोकं नाईलाजाने या प्रखर उन्हात घाम गाळून काम करत होती. त्यांच्या अंगावर ना सनकोट होता, ना पायी चप्पल. त्यांचा रापलेला आणि घामाने भिजलेला देह ऊन-वारा-पावसाने कणखर झाला होता. एका झाडाखाली दोन-चार कुत्री अंगाचं मुटकुळ घालून गपचिप पडून होती. एका फुटलेल्या पाईपमधून थेंब थेंब गळणारे पाणी मांजरी जिभल्या चाटत पित होत्या. तर एका पणपोईजवळ साचलेल्या पाण्यात चिमण्या चिवचिवाट करत खेळत होत्या.
त्यांच्या प्रतिकुलतेतही अनुकूलता शोधण्याच्या स्वभावामुळे साहजिकच माझं स्वगत सुरु झालं. सूर्य जसा सर्वांना समान प्रकाश देतो, तसाच सर्वांना समान कठोर वागणूकही देतो. पण त्या प्रतिकुलतेत जो ठाम पणे उभा राहतो, त्याचाच निभाव लागतो. मग आपण असा परिस्थितीचा बाऊ करणं कितपत योग्य आहे? परिस्थितीचे चटके सहन केल्याशिवाय यशाची गोडी कळत नाही. आज उन्हाचे चटके बसत आहेत, आणखी दोन महिन्यांनी याच धरतीवर पावसाच्या धारा थयथया नाचतील. तोपर्यंत उन्हाळा देखील एन्जॉय करावा आणि ज्यांना तो सक्तीने करावा लागतोय, त्यांना घोटभर पाणी, क्षणभर विश्रांती नाहीतर कौतुकाचे दोन शब्द देऊन क्षणिक गारवा देण्याचा प्रयत्न करावा.
-भैरवी.