आरक्षणासाठी मराठा समाजातील महिलांनी मोठं योगदान दिलेलं आहे. लाखोंच्या मोर्चांचं नेतृत्वही महिलांनीच केलं होतं. त्यामुळं हे मोर्चे अभूतपूर्व असे निघाले होते. मराठा क्रांती मोर्चांनी अांदोलनांचा एक आदर्शच उभा केला होता. त्यावेळी मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या महिलांना माध्यमांनी प्रसिद्धीही दिली होती. मात्र, आज मुंबई उच्च न्यायालयानं जेव्हा राज्य सरकारनं दिलेलं आरक्षण वैध ठरवलं त्यावेळी माध्यमांनी विधिमंडळातील महिला आमदारांच्या प्रतिक्रिया घेतल्याचं फारसं दिसलं नाही. त्यामुळं आज जेव्हा न्यायालयाचा निर्णय आला त्यावेळी विधानभवनामध्ये सर्वपक्षीय पुरूष आमदारांच्या प्रतिक्रिया घेण्यातच माध्यमांच्या प्रतिनिधींनी धन्यता मानली. मात्र, मॅक्सवुमनच्या टीमनं यासंदर्भात महिला आमदारांशी संवाद साधला. भारती लवेकर, देवयानी फरांदे आणि दीपिका चव्हाण या महिला आमदारांनी यासंदर्भात maxwoman ला प्रतिक्रिया दिल्या.