जवळपास पंधरा वर्षांपासून कामामुळे सलग इतके दिवस घरात बायका मुलांसमवेत राहण्याचा वेळ मिळालाच नव्हता. कायम बाहेर फिरणे, कधी महाराष्ट्रात असूनही घरी राहता येत नव्हतं, मुलाचा, मुलीचा, बायकोचा किंवा लग्नाचा वाढदिवस असो, कुठला सण असो की मुलांच्या सुट्ट्या असो. कायम कामानिमीत्त बाहेर. सगळ्या धावपळीत मुलांचं बालपण, शिक्षण, घरातील जवाबदाऱ्या, इतकंच काय तर शाळेतील एकाही पालकांच्या मिटींगला हजर राहता आलं नाही.
मुलं कधी मोठी झाली कळलंच नाही, कामाच्या झपाट्यात कधी पुरेसं लक्षच दिल नाही. तीनेक वर्षांपूर्वी सहकुटुंब अमेरिका दौरा केला, तेव्हा पहिल्यांदा बायको मुलांसोबत सलग महिनाभर राहायला मिळालं, त्यानंतर लोकडाऊन मुळे आत्ताच..
अनेकदा घरी असून देखील कायम फोन सुरू असायचे किंवा कुणीतरी कामानिमित्त आलेलं असायचं. अनेकदा जेवायचं ताट वाढलं की फोन यायचा आणि फोन संपेपर्यंत बायको पोर माझं ताट झाकून झोपून गेलेले असायचे.
अनेकदा इतर राज्यातून रात्री उशिरा यावं लागायचं. कधी 24 24 तास ट्रेनचा प्रवास, उशिरा येणाऱ्या विमानांचा प्रवास, कामाचा मनावर आणि शरीरावर पडलेला ताण, याचा परिणाम घरी आल्यावर सुद्धा फक्त पडून राहण्यात व्हायचा. मुलांना वाटायचं की बाबा खूप दिवसांनी आलाय, त्यांच्या अपेक्षा असायच्या, बायको समजवून सांगायची, बाबा थकलाय, त्याला त्रास देऊ नका म्हणायची.. आज हे सगळं आठवलं की वाटत इतरांच्या मुली जन्माला याव्यात या हट्टापायी मी माझ्या मुलांना मात्र बापपण पुरेस देऊ शकलो नाही, ही उणीव कायम सलत राहते. मुलांचं बालपण आता परत येणार नाही.
घरातील इतर कौटुंबिक जवाबदाऱ्या बायकोने लीलया पाळल्या. खरतर तीच माहेर भोपाळच, आमच्यापेक्षा शैक्षणिक, आर्थिक बाबतीत खूपच चांगलं, मराठी येत नव्हती, आपलं कल्चर, अगदी जेवण बनवण्याच्या पद्धती लोकांचं बोलणं चालणं वागणं सगळंच तिला नवीन होत, त्यात ती जेनेटिक्स विषयात पीएचडी झालेली. परंतु माझ्या ह्या ध्यासापायी तिने एकदाही माझी पीएचडी, माझं शिक्षण वाया गेलं अस म्हणाली नाही. मी कायम बाहेर असल्याने घराची सगळी जवाबदारी तिने स्वीकारली. अनेकदा आर्थिक चणचण असायची, पण तिने कधी जाणवू दिलं नाही. घरी नेहमी नातेवाईक, मित्राचं जाणं येणं असायचं, तिने कधीही कुणाला नाराज केलं नाही. लॉकडाऊनमध्ये खऱ्या अर्थाने घरात काय काय करावं लागतं हे अनुभवलं आणि बायकोने इतकी वर्षे काय काय केलंय हे जाणवलं. तिच्या बाबतीत माझी एकच तक्रार असते की ती कधी तक्रारच करत नाही, कसलीही तक्रार...
कामाचा मोबदला म्हणून सुरुवातीला अनेक वर्षे फक्त देशात पहिला, राज्यात पहिला असे पुरस्कारच मिळायचे. सुरुवातीला घरी सांगायचो की अमुक अमुक पुरस्कार मिळाला आहे. पुरस्काराचा कार्यक्रम संपवुन घरी आलो की मुलं विचारायचे की बाबा ट्रॉफी कुठं आहे? त्यांना काय सांगणार की बाबारे पुरस्कार सरकारी अधिकारी ठेऊन घेतात...त्यानंतर मी पुरस्काराबाबत घरी सांगणेच बंद केले.
असंख्य आठवणी आहेत, चांगल्या वाईट. बायको पोरांचा आणि माझा असा जवळपास चवदा वर्षांचा वनवास ह्या कोरोना आणि लोकडाऊनने संपवला. सलग इतका वेळ घरी राहायला मिळालं, त्यामुळं खरोखर धन्यवाद कोरोना आणि धन्यवाद लोकडाऊन....
गिरीश लाड