मेधाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा! अखंड ऊर्जेचा स्त्रोत आहेत ताई. मेधाताई आणि नर्मदा ही नावं एकरूप झालेली आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छांचा फोन केला तरी बोलणं नर्मदेचंच. श्वास नर्मदा, ध्यास नर्मदा.
ज्यांचं व्यवस्थेत कोणीच नाही त्यांचं मातृत्व निभावणं सोपं नाही. विस्थापित, वंचित, गोरगरीबांना ताईंचा केवढा आधार वाटतो ते त्या त्या स्थळी गेल्याशिवाय कळणार नाही. झोपडपट्टीतल्या चौकात एका फाटक्या सतरंजीवर बसून १९ दिवसांचं उपोषण ही सोपी गोष्ट नाही. तेवढी ऊर्जा कुठून आणतात माहित नाही.
प्रवासाला एसटीचा लाल डब्बा. जेवणाचं भान राहिलंच याची शाश्वती नाही. नावावर एक सातबारा नाही. नावावर काही असलेच तर आंदोलनात नोंदलेले खोटे गुन्हे! त्या काळी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून उच्च्च विद्याविभूषित आणि जागतिक धरण आयोगावर काम केल्याचा मोठा अनुभव याच्या जोरावत ताई सुखासीन आयुष्य सहज जगू शकल्या असत्या पण मग नर्मदेला सखी आणि हजारो विस्थापित, वंचितांना हक्काची "ताई", "दिदी" मिळाली नसती.
सहकारी कार्यकर्त्यांना कसं वागवावं हे ताईंकडे पाहून शिकावं. प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही, आधी नवख्यातला नवखा कार्यकर्ता आणि स्वत: सर्वात शेवटी अशी आजच्या काळाला अजिबात न शोभणारी रचना मेधाताईंनी बांधली, पाळली. नर्मदेत लढलेलेच नाही तर अगदी काल चळवळीत आलेल्या कार्यकर्त्याला सुद्धा मीच या चळवळीचा नेता आहे असं वाटावं इतका मालकी हक्क 'जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयात' वाटून टाकला जातो. नेतृत्वावरून ना वाद ना मानपानाचे रूसवेफुगवे! सब का साथ, सब साथ साथ.
- विश्वंभर चौधरी