कामाचा वसा घेतलेल्या नंदिनी दिवेकर या अंगणवाडी मदतनीस. नंदिनी या नववा महीना भरलेला असतानाही आपल्या वेदना बाजूला ठेवून जनजागृतीसाठी फिल्ड वर उतरल्या होत्या. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली या गावात त्या कोरोना संदर्भात कशी काळजी घ्यावी या बाबत गावकऱ्यांना माहिती देत असतानाच अचानक त्यांना प्रसूती वेदना होऊ लागल्या. त्याच वेळी त्यांच्या सोबतच्या अंगणवाडी सेविकेने त्यांना तात्काळ बोर्ली प्राथमिक आरोग्य केंदामध्ये दाखल केले व तिथे सुखरूपपणे त्यांची प्रसूती झाली. कोरोनामुळे आपल्याच माणसांजवळ जायला लोक घाबरत असतांना नंदिनी दिवेकर यांनी आपली आणि बाळाची पर्वा न करता गावकऱ्यांसाठी पुढाकार घेतला. त्यांनी दिलेल्या या भरिव योगदामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.
कोरोनाच्य़ा संकट काळात आपापल्या परिने गरजूंना मदत करण्यासाठी काही रणरागिणींनी आपल्या जीवाची परवा न करता समाजकार्य केले. आपल्याकडे जे आहे त्यामधून इतरांना मदत करण्याची आपली भारतीय संस्कृती आहे. याच संस्कृतीचे पालन करत राज्यातील काही रणरागिणींनी आपापल्या क्षेत्रातील कामाच्या व्यापातून वेळ काढत गरजूंना लॉकडाऊनच्या काळात मदत केली. या महिलांच्या याच कार्याची दखल घेत मॅक्स वुमन आणि महिला व बालविकास विभागातर्फे या कोरोना रणरागिणीचा गौरव करण्यात आला. यावेळी महिला व बालविकास मंत्री एड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते या हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय.ए.कुंदन उपस्थित होत्या.