'हाऊ टू ड्रेसअप'?

मेकअप, साजश्रृंगार आणि स्त्रियांचा फार जवळचा संबंध... परंतु ट्रॅडिशनल, वेस्टर्न लूक कधी, कुठे आणि कसा करायचा ? ऑफिस, वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला पडत असेल तो म्हणजे ‘हाऊ टू ड्रेसअप’ ? स्त्रियांच्या ‘ड्रेसअप’ बाबत सुवर्णरेहा जाधव यांनी केलेले उत्तम मार्गदर्शन नक्की वाचा...

Update: 2021-04-03 09:30 GMT

"What a strange power there is in clothing."-Isaac Bashevis Singer

मध्यंतरी माझ्या एका स्नेहींचा मला फोन आला. ते कार्पोरेट कंपन्यांसाठी बरेच ट्रेनिंग प्रोग्रॅम्स करत असतात. 'तू येशील का एखादे लेक्चर घ्यायला आमच्या कार्यक्रमात?' विषय कोणता विचारलं तर म्हणाले 'हाऊ टू ड्रेसअप'. थोडक्यात, अशा ठिकाणी कपडे कसे घालावे यावर मी बोलावं ही त्यांची इच्छा होती. म्हणाले की बर्याकचदा कित्येक स्त्रिया इतके अयोग्य कपडे घालून या कार्यक्रमांना येतात की त्यांना नम्रपणे सांगावे लागते की कृपया कपडे बदलून या. त्यांच्या 'अयोग्य' चा अर्थ म्हणजे शरीर पुर्णपणे न झाकणारे कपडे वगैरे असा बिलकुल नव्हता. एखादी गोष्ट करताना आपण विशिष्ट पद्धतीचे कपडे वापरतो. उदा.पोहायला जाताना आपण पाचवरी साडी नेसत नाही किंवा ट्रेकिंगला जाताना पायघोळ स्कर्ट वापरत नाही. कारण त्यासाठी स्विमसूटस् किंवा ट्रॅक पॅंन्ट्स आहेत.

अशा कार्यक्रमांमध्ये बरेचसे टीम गेम्स असतात आणि स्त्री पुरूषांचे मिक्स ग्रुप्स असतात. कधी कधी फिजिकल ऍक्टिव्हिटी असणारेही बरेचसे खेळ असतात. अशावेळी उठता बसता कम्फर्टेबल रहावे, ऑकवर्ड वाटू नये अशा पद्धतीचे कपडे वापरावे. खूप घट्ट आणि लो वेस्ट जीन्स घातल्या तर खाली पटकन बसायला झेपत नाही आणि वरचा टॉप /टीशर्ट तोकडा असल्यास ते चांगलंही दिसत नाही. त्याचप्रमाणे आपल्या टॉपची, कुडतीची नेकलाइन लो असेल तर समोर वाकताना काळजी घ्यावी लागते.

ज्या स्त्रिया फक्त साड्याच नेसतात त्यांनी ऑफिसमध्ये कामाला जाताना साध्या, सुटसुटीत हलक्या, परंतु चोळामोळा न होणार्या साड्या वापराव्या. खूप भडक रंग /जरतारी असलेल्या साड्या ऑफिसमध्ये बऱ्या दिसत नाहीत. हलके म्हणजे पेस्टलच रंग हवेत असं नाही. ज्यांना आपण 'अर्थ कलर्स' म्हणतो, म्हणजे पृथ्वीच्या रंगांशी निगडीत रंग आणि त्यांच्या शेड्सही खूप छान दिसतात. धारी पदराच्या, स्टार्च केलेल्या साड्या सर्वात उत्तम पण कॉटनच्या या साड्यांचा मेंटेनन्स सोपा नसतो. त्यामुळे त्या फारश्या वापरल्या जात नाहीत. दिसतात मात्र त्या अतिशय ग्रेसफुल. त्यावर एखादा चंकी नेकलेस आणि साजेशी कानातली घातली की चित्र पूर्ण!

मी स्वतः ऑफिसला नेसायच्या साडीवर कमीतकमी अॅक्सेसरीज वापरते. जवळपास नाहीच. अगदी बिंदीही नाही. एखादी मोठी, साडीच्या रंगाला साजेशी किंवा कॉन्ट्रास्टिंग लाकडी किंवा मातीची किंवा धातूची बांगडी आणि घड्याळ मला पुरेसे होतं. त्यात एक स्मार्ट ऑफिस बॅग, पुढून बंद असेलेले आणि शक्यतो बॅगच्याच रंगाचे ऑफिस शूज आणि हलकसं परफ्यूम आपला लुक पूर्ण करते असं मला वाटतं. आपण एफिशियंटच दिसतो. त्यासाठी वेगळे स्टेटमेंट करण्याची गरज भासत नाही. पॉवर ड्रेसिंग यापेक्षा वेगळे ते काय ?

इंटरव्ह्यूला जाण्यासाठी वापरायच्या कपड्यांचेही काही नियम आहेत. अर्थात इंटरव्ह्यू कोणत्या कामासाठी आहे, त्यावरही बरच अवलंबून असते.

त्या ऑफिसमध्ये गेल्याबरोबर समोरचे पॅनल आपल्याकडे पाहताच पहिलं काय नोटिस करत असेल तर आपला लुक. सोबर परंतु स्मार्ट अशी हलक्या रंगाची साडी किंवा ड्रेस, त्यावर प्रिंट असल्यास नाजुक असावा. खूप ठळक, मोठेमोठे पॅटर्न असणारा नसावा. चकचक नसावी. फार सुळसुळीत पदर किंवा दुपट्टा नसावा. जेणेकरून आपले लक्ष सतत तो सावरण्यात जाईल. पारदर्शक असू नये. बांगड्या वापरल्याच तर त्याचा आवाज होणार नाही हे बघावं. सोने -चांदी- हिऱ्याचे दागिने असलेच तर अगदी नाजूक असावेत. भली मोठी मंगळसूत्र तर नकोच! मंगळसूत्र असेलच तर ते वर ठसठशीत उठून दिसणार नाही असे घालावं. परफ्यूम वापरल्यास हलके वापरावे. जेणेकरून आपल्या आधीच त्या परफ्यूमच्या घमघमाटाने आपल्या येण्याची वर्दी आतील लोकांना देऊ नये. केशरचना अशी असावी की आपला हात सतत केस नीट करण्याकडे जाऊ नये. नखं व्यवस्थित मॅनिक्युअर केलेली असावीत, हाता पायाची त्वचा रखरखीत दिसू नये म्हणून हलके मॉईसचरायझर लावावे .

पायात अतिशय कम्फर्टेबल शूज, चपलं असावी, चालताना आवाज न करणारी. सवयीचंच फुटवेअर असावं, नवीन करकरीत असल्यास शु बाईट होऊ शकतात. पैंजण वगैरे तर बिल्कुल घालू नये. हल्ली लेगिंग्ज हा प्रकार बर्यारच स्त्रिया वापरतात. आपले शरीर किती ही सुडौल असले तरी त्यावरचा कुडता तोकडा असला तर बरा दिसत नाही. कुडतीची बाजूची स्लीट खूप वरपर्यंत नसावी. कारण चालताना ती उडते आणि ते ही चांगले दिसत नाही.

ज्या स्त्रिया वेस्टर्न कपड्यांमध्ये सहज वावरू शकतात त्यांनी शक्यतो शर्ट, ट्राउझर किंवा स्कर्ट (ए लाइन, गुडघ्याखाली येईल असा) वापरावा. त्यावर साजेसा शर्ट किंवा टॉप आणि स्कार्फ ! ब्लेझर असेल तर उत्तमच. ब्लेझर वापरताना अगदी ऑफिसमध्ये आत जातानाच घालावा. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात. कारण ऑफिस आतमध्ये वातानुकूलित असेल तरी जिथून आपण प्रवास करून येणार आहोत तिथे तापमान जास्त असेल तर आपल्याला खूप घाम येऊ शकतो. ज्यामुळे आपला मेकअप (केलेला असल्यास) निघून जाऊ शकतो. केसही चिपचिपीत होऊन खराब दिसतात.

इंटरव्ह्यूच्या आधी कच्चा कांदा लसूण किंवा तत्सम स्ट्राँग वास असलेले काही खाऊ नये, टेन्शन कमी करायला स्मोकही करू नये.

ज्यांची त्वचा मुळात चांगली आहे त्यांनी मेकअप फारसा करूच नये. मेकअपचा अर्थच मुळी 'जे कमी आहे ते भरून काढणे' असा आहे. लिपस्टिक किंवा आय मेकअप खूप भडक नसावा. हल्ली खूप सुन्दर न्यूड शेडस उपलब्ध आहेत ! आता कोव्हिडनंतर मास्क अनिवार्य झाले आहे, ते ही शक्यतो आपल्या पेहरावाला साजेसे असावं.

हे सगळे लक्षात ठेवून तयार व्हावे.

मात्र आपला इंटरव्ह्यू घेणार्याव पॅनलला असं वाटू नये की या व्यक्तीने तयार होण्यासाठी खूप वेळ घेतलेला आहे. ती गोष्ट अशावेळी आपल्या विरोधात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सोबर, स्मार्ट, सुटसुटीत हा आपला मंत्र असावा.

मोठया शहरातील मुलींना /स्त्रियांना यापैकी बरेचसे अंगवळणी पडलेलं असतं पण लहान शहरातून/ गावाहून येणाऱ्या मुलींना हे फारसे माहीत नसते म्हणून हा प्रपंच !

- सुवर्णरेहा जाधव

Tags:    

Similar News