या 'लेडी सिंगम'ची पुन्हा होतेय चर्चा; कारण ठरलंय...

या 'लेडी सिंगम'ची पुन्हा होतेय चर्चा; कारण ठरलंय...

Update: 2020-12-06 11:59 GMT

नेहमी आपल्या डॅशिंग कामाने चर्चेत असणाऱ्या औरंगाबादच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. शनीवारी औरंगाबाद मध्ये बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाहणी केली. यावेळी बंदोबस्तात असलेल्या मोक्षदा पाटील यांचे काही फोटो व्हायरल झाले असून या फोटोची सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे.

झालं असं की,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वैजापुर येथील गोलवाडी येथील समृद्धी महामार्गाची पाहणी केली. आता मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर एक दिवस आधीपासूनच बंदोबस्ताची आखणी सुरू होती. कार्यक्रमाचे ठिकाण आणि परिसरात वेगवेगळ्या पॉइंटला पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमाला किती उशीर होईल याचा अंदाज नसतो,त्यामुळे पोलिसांनीही आपल्या घरूनच स्वतःचा डबा आणला होता.

मुख्यमंत्री जाताच बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपले डबे उघडत जेवणासाठी बैठक मांडली. कर्मचाऱ्यांची जेवण सुरू असतानाच त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील या सुद्धा आल्या. एसपी मॅडम आले म्हटल्यावर कर्मचाऱ्यांना वाटलं काहीतरी सूचना देण्यासाठी आल्या असतील म्हणून ते सर्वजण उठून उभे राहिले. पण झालं काही वेगळच.

मोक्षदा पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या डब्यातील भाजी-पोळी घेत त्यांच्या सोबतच जेवणाचा आस्वाद घेतला. काही वेळेसाठी कर्मचाऱ्यांना काय घडतंय हेच कळत नव्हतं. जिल्ह्याच्या प्रमुख आपल्या डब्यात आपल्यासोबत जेवत आहेत, यावर त्यांना विश्वासच बसत नव्हता.त्यामुळे मोक्षदा पाटील यांची ही कृती पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या मनात घर करून गेली असून, पाटील यांच सोशल मिडियात कौतुक होत आहे.

या संदर्भात आम्ही IPS मोक्षदा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, "पोलिसिंग हे नेहमीच एक टीमवर्क असतं आणि पोलिस हे एक कुटुंब आहे. हा त्या अंमलदाराचा दयाळूपणा होता ज्याने मला आपली चपाती दिली. पोलिसांचे कुटुंबीय नेहमी टिफिनमध्ये 2 चपात्या जास्त देतात ज्यामध्ये नोकरीतील आव्हानं स्पष्ट होतात."









Tags:    

Similar News