अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या शपथ विधीला कमला हॅरिस नेसणार साडी? भारतीयांमध्ये उत्सुकता!
भारतीय वंशाच्या असणाऱ्या कमला हॅरिस बुधवारी अमेरिकेच्या उपाध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. कमला हॅरिस या अमेरिकेच्या संसदीय इतिहासातील पहिल्या महिला उपाध्यक्ष असतील.;
अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष होण्याचा मान भारतीय वंशाच्या असणाऱ्या कमला हॅरिस यांनी पटकावला आहे. येत्या गुरूवारी २१ जानेवारीला कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतील. कमला हॅरिस या पहिल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन उपाध्यक्ष आहेत. कमला हॅरिस यांचा जन्म अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील ऑकलंड येथे २० ऑक्टोबर १९६४ रोजी झाला. हॉवर्ड आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले आहे.
अमेरिकेच्या उपाध्यक्ष पदाची सूत्र हाती घेताना कमला हॅरिस भारताचा पारंपारिक पोशाख असलेली साडी नेसणार असल्याची शक्यता त्यांच्याच परिवारातील एका व्यक्तिने ट्विट केल्यामुळे वर्तवली जात आहे. अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष जो बायडन यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्यासोबत डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस या उपाध्यक्ष झाल्या. कमला हॅरिस यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राष्ट्राला संबोधित करताना भारताचा उल्लेख केला होता.
सीएनएनला दिलेल्या एका मुलाखतीत फॅशन डिझायनर बिभू मोहपात्रा यांनी सांगितले की, 'कमला हॅरिस यांनी उपाध्यक्ष पदाची सूत्र हाती घेताना साडी नेसण्याचा निर्णय घेतला तर त्यात आश्चर्य वाटणार नाही.' मोहापात्रा यांच्या म्हणण्यानुसार, 'मॅडम व्ही.पी. कमला हॅरिस लोकांना एकत्र आणण्यासाठी साडीचा एक चांगला वापर करु शकतात.'
कमला हॅरिस यांना प्रचाराच्या भाषणादरम्यान एका व्यक्तीने साडीसंदर्भात प्रश्न विचारला होता. ही निवडणूक जिंकल्यानंतर तुम्ही भारतीय पारंपरिक पोशाख असलेली साडी नेसणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना कमला हॅरिस यांनी 'आधी निवडणूक जिंकूया' असे उत्तर दिले होते.