एकीकडे भारत देश स्वातंत्र्यदिनाच्या ७५ वा आजादी का अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत असताना जळगावच्या दादावाडी येथील रहिवाशी असलेल्या योगेश बडगुजर या तरुण गिर्यारोहकाने १५ ऑगष्ट रोजी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी युरोप खंडातील सर्वात मोठे उंच शिखर एल्ब्रुस (५६४२ मीटर १८५१० फुट उंच ) सर करून आपल्या देशाचा तिरंगा ध्वज मोठ्या डौलाने फडकवत खान्देशाची मान उंचावली आहे. त्याच्या या यशाने खान्देशासह संपूर्ण भारतातून त्याच्या या यशाचे कौतुक केले जात आहे.
या अगोदर योगेश बडगुजर याने २५ जून २०२२ रोजी आफ़्रिका खंडातिल सर्वात उंच शिखर माउंट किलिमांजारो ५८९५ मीटर १९३४१ फूट उंच शिखर सकाळी ०७ः४५ वाजता सर केले होते. योगेश प्रकाश बडगुजर हा अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेला तरुण असून त्याला लहानपणापासून गिर्यारोहणाची आवड असल्याने जगातील बहुतांश शिखर पादाक्रांत करण्याची त्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आफ्रिका आणि युरोप खंडातील सर्वात उंच शिखरे सर करून खान्देशच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तसेच त्याने महाराष्ट्रातील सोंडाई , कर्नाळा , पेबविकट ,कळसुबाई , आणि माहुली तसेच सिक्कीम मधील रेनॉक आदी शिखरे त्याने सर केली आहेत .
जळगावातील दादा वाडी परिसरात योगेशच कुटुंब राहत, योगेश हा मुंबई महानगरपालिकेतील अग्निशामक दलात गेल्या ५ वर्षांपासून फायरमन या पदावर कार्यरत आहे. दरम्यान योगेश बडगुजर हा १९ रोजी जळगावात येणार आहे.
जगातील ७ खंडांमधील सर्वात उंच शिखरे पादाक्रांत करण्याचा संकल्प -
जगामध्ये ७ खंड असून योगेशने युरोप ,आफ्रिका या खंडातील सर्वात उंच शिखरे पादाक्रांत केली आहेत . तसेच उत्तर अमेरिका खंडातील डेनाली ६ हजार १९० मीटर , दक्षिण अमेरिका खंडातील माउंट ऑक्सोबोव्ह ६ हजार ९६२ मीटर , अंटार्टिका खंडातील विन्सन मासीक ४ हजार ८९२ , ऑस्ट्रेलिया खंडातील कॉस्ट्यूज को २ हजार २२८ मीटर आणि आशिया खंड तसेच जगातील सर्वात मोठे शिखर एव्हरेस्ट ८ हजार ८४८ . ८६ मीटर उंचीचे शिखर पादाक्रांत करण्याचा मनोदय योगेश बडगुजर याने बोलून दाखविला.जगातील सर्वात मोठे शिखर असलेले एव्हरेस्ट सर करण्याचा संकल्प असून यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणी येत असल्याने एव्हरेस्टवर अद्याप चढाई शक्य नसल्याची खंत योगेश याने बोलून दाखविली .