विधानपरिषद निवडणूक महाराष्ट्रासह इतर राज्यातही पार पडणार मतदान, आज होणाऱ्या निवडणूकीबाबत सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की वाचा
राज्यात राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेच्या निवडणूकीची रंगत वाढली आहे. मतदानाला सुरूवात झाली आहे. तर दहा वाजेपर्यंत 68 आमदारांनी मतदान केले आहे. मात्र ही विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न झाले. मात्र काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार मागे घेण्यास नकार दिल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली. तर दहा दिवसात ही दुसरी निवडणूक असल्याने भाजप विरुध्द महाविकास आघाडीत चांगलीच चुरस रंगणार आहे. त्यामुळे आता दहाव्या जागेवर कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज्यसभा निवडणूकीत सहाव्या जागेसाठी अटीतटीची लढत झाली होती. यामध्ये भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला. तर या निवडणूकीत महाविकास आघाडीची दहा मतं फुटल्याने महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. त्यातच आता विधानपरिषद निवडणूकीच्या रिंगणात अकरा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणूकीत कुणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उमेदवारांची यादी
प्रविण दरेकर – भाजप
राम शिंदे – भाजप
श्रीकांत भारतीय – भाजप
उमा खापरे – भाजप
प्रसाद लाड – भाजप
एकनाथ खडसे- राष्ट्रवादी
रामराजे नाईक निंबाळकर- राष्ट्रवादी
आमशा पाडवी- शिवसेना
सचिन अहिर – शिवसेना
चंद्रकांत हंडोरे – काँग्रेस
भाई जगताप – काँग्रेस
20 जून रोजी सकाळी 9 वा विधानपरिषद निवडणूकीसाठी मतदानाला सुरूवात झाली. या सर्व उमेदवारांमध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं नाव आहे ते म्हणजे उमा खापरे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमा खापरे या एकमेव महिला उमेदवार आहेत. भाजपच्या उमा खापरे या बाजी मारणार की त्यांची सुद्धा विकेट पडणार याकडे राज्याचं लक्ष लागले आहे..
कोण आहेत उमा खापरे?
उमा खापरे या भाजपच्या अत्यंत आक्रमक नेत्या आहेत. त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी भाजपमध्ये महिला मोर्चा प्रदेश सचिवपदासह संघटनेत विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. भाजपमधील जुन्या नेत्या म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक म्हणूनही ओळखल्या जातात. तसेच उमा खापरे या पिंपरी-चिंचवडच्या आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेविका म्हणून चांगले काम केलं आहे. सलग दोनवेळा त्यांनी नगरसेविका म्हणून काम केलं आहे. 2001-2002 मध्ये त्या पिंपरी चिंचवड पालिकेत विरोधी पक्षनेत्या होत्या.