एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार देखील धोक्यात आले आहे. 40 पेक्षा अधिक आमदारांचा एकनाथ शिंदे यांना पाठींबा असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ आता खासदारही बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता खरी शिवसेना कोणाची एकनाथ शिंदे गटाची की उद्धव ठाकरेंची? असं म्हंटल जात असताना एकनाथ शिंदे गटाने आपल्या गटाचे नाव ठरवले आहे. त्यांनी या गटाला शिवसेना बाळासाहेब असं नाव दिले आहे. या गटाचे नाव शिवसेना बाळासाहेब असं ठेवण्यात आले असल्याचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी TV 9 वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.
या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धाव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली तर प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती केली. मंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे आणखी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या 34 आमदारांचे राज्यपालांना पत्र दिले. यामध्ये मीच पक्षाचा गटनेते असल्याचं म्हणत त्यांनी प्रतोद म्हणून आमदार भरत गोगावले यांची नेमणूक केली. राज्याच्या राजकारणात अशी नाट्यपूर्ण परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता शिंदे गटाने आपल्या गटाला शिवसेना बाळासाहेब असं नाव दिले आहे. आता महाराष्ट्रात महा विकास आघाडी सरकार राहणार का? याची चर्चा सुरू आहे महा विकास आघाडीतील पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सुद्धा गोठ्यात आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.