सासूच्या पार्थिवाला सुनांनी दिला खांदा

सासूच्या निधनानंतर सुनांनी सासूच्या पार्थिवाला खांदा दिल्याची घटना बार्शी तालुक्यातून समोर आली आहे;

Update: 2021-08-05 11:19 GMT

सासू - सूनांमधले वाद आपल्यासाठी नवे नाहीत. घरापासून ते थेट पोलिस ठाणे आणि कोर्टाच्या पायरीपर्यंत हे वाद गेल्याचे आपण अनेकदा पाहीले असतील. मात्र, सासूच्या निधनानंतर मुंढे कुटूंबातील चारही सुनांनी सासूच्या पार्थिवाला खांदा दिला. परंपरेला छेद देणारी ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मळेगाव येथून समोर आली.

दमयंती कारभारी मुंडे यांचे वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. अध्यात्माची गोडी असलेल्या दमयंती मुंडे यांनी आयुष्यात देवधर्मासोबतच तत्व आणि मुल्यांचही पालन केलं. त्यांनी आपल्या चारही सुना अनिता यशवंत मुंढे, वैशाली जयवंत मुंढे, अर्चना गुणवंत मुंढे आणि मनोरमा बळवंत मुंढे यांना कायम मुलींप्रेमाणे प्रेम अन् माया दिली. या सुनांनीही कधी सासूबाईंचा शब्द खाली पडू दिला नाही की, शब्दाने कधी दुखावले नाही.

वृद्धापकाळाकडे झुकलेल्या दमयंती मुंढे यांना प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे आणि जेव्हाच्या तेव्हा अगदी मागण्याअगोदर हजर करत मुंढे कुटुंबियांनी सासूच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला आहे. आधात्माची आवड असलेल्या दमयंती मुंढे यांचे एकादशीच्या दिवशीच निधन झाले.

त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. दुपारी अंत्यविधी निघाला त्यावेळी मुंढे कुटुंबातील चौघा सुनांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. दमयंती यांचे भाऊ चंद्रकांत, हरिश्‍चंद्र आणि संभाजी तर मुले यशवंत, जयवंत, गुणवंत, बळवंत यांनी देखील खांदा दिला. दमयंती मुंढे यांचे पती कारभारी मुंढे हे स्वतः शिक्षक होते. त्यामुळे त्यांनी या बदलास संमती दिली.

स्वतः दमयंती मुंढे या १९९० ते ९५ ह्या काळात पंचायत समितीच्या सदस्य म्हणून कार्यरत होत्या. याशिवाय संपूर्ण राज्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानातून आपल्या गावाची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या तत्कालीन सरपंच गुणवंत मुंढे यांच्या त्या मातोश्री होत्या. ज्या सासु-सुनांच्या भांडणांचे भांडवल करून टीव्ही सिरीयल जोमात चालतात त्यांचे अनुकरण करुन आपल्या घरातील वातावरण बिघडवतात अशा सासू - सुनांच्या डोळ्यात मुंढे कुंटूबांने झणझणीत अंजन घातले आहे.

Tags:    

Similar News