खासदार सुप्रिया सुळे यांच्या मागणीला यश : 18 वर्षांवरील सर्वांना लस, केंद्र सरकारचा निर्णय

Update: 2021-04-19 15:27 GMT

देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचे प्रमाण लक्षात घेता केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून हे लसीकरण सुरू होणार आहे. या संदर्भात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मागणी केली होती. त्यानंतर आज देशातील 18 वर्षावरील सर्वांना कोरोना लस देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी डॉ. हर्षवर्धन यांचे आभार मानले आहेत.

केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणास परवानगी दिली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी सरकारकडे सरसकट लसीकरणाची मागणी केली होती. सरकारने आता १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी परवानगी दिली, याबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री मा. डॉ. हर्षवर्धन जी,आपले मनापासून आभार असं ट्वीट करत सुप्रिया सुळे यांनी डॉ. हर्षवर्धन यांचे आभार मानले आहेत आव्हान अंमलबजावणीचे


कोरोनावरील लसीकरण सुरू झाले असले तरी अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा असल्याच्या तक्रारी येत आहेत. महाराष्ट्रातही यावरुन मोठ्या प्रमाणात राजकारण रंगले आहे. यासर्व पार्श्वभूमीवर 18 वर्षांवरील सर्वांना ही लस देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातील लोकसंख्येला पुरेल एवढ्या लसींचा पुरवठा होईल का, त्याची सोय कशी असेल याबाबत केंद्राने अजून माहिती दिलेली नाही. देशात सध्या कोव्हॅक्सीन, कोविशिल्ड आणि रशियाची स्पुटनिक v या लसी देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील यासंदर्भातली मागणी केली होती. आतापर्यंत 45 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. सगळ्यात आधी कोरोनाशी लढणाऱ्या आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स यांना लस देण्यात आली होती. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील सर्व लोक तसेच गंभीर आजार असलेल्या 45 वर्षांवरील सगळ्यांना लस देण्याचा निर्णय घेतला गेला. पुढच्या टप्प्यात 45 वर्षांवरील सगळ्यांना कोरोनाची लस देण्यास सुरूवात करण्यात आली. पण आता वाढते रुग्ण पाहता केंद्राने मोठा निर्णय घेतला आहे.

Tags:    

Similar News