डॉ. नीलम गोऱ्हे कोण आहेत?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या डॉ. नीलम गोऱ्हे कोण आहेत? त्यांचा सामाजिक, राजकीय प्रवास एका क्लीकवर जाणून घ्या...;
डॉ. नीलम गोऱ्हे मूळच्या पंढरपूरच्या आहेत. त्या डॉकटर आहेत पण संपूर्ण कारकीर्द त्यांनी सामाजिक कार्यास वाहून दिली. हळूहळू सामाजिक कार्यापासून सुरू झालेला प्रवास राजकारणात येऊन पोहचला. राजकारणात सतत सक्रिय राहणं, महिलांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवत त्यांची मदत करणं हा नीलम गोऱ्हे यांचा स्वभाव... प्रत्येक काम जिद्दीने आणि न्यायपूर्वक करणाऱ्या नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती पदी निवड झाली.
नीलम गोऱ्हे यांची महत्वाची कामे...
महाराष्ट्रातील ५००० पेक्षा अधिक कुटुंबे व महिलांना कायदेशीर मदत, सल्ला मार्गदर्शन, समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात पुढाकार घेणे. घरगुती हिंसाचार, बलात्कार, छळ अशा विषयांमध्ये महिलांच्या मदत गटांची स्थापना नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. स्त्री आधार केंद्रामार्फत न्यायालयात न्याय मिळवून देण्यासाठी सहाय्य आणि सक्रीय सहकार्य देखील करत असतात.
नीलम गोऱ्हे यांचा राजकीय प्रवास...
रिपब्लिकन पक्षातून त्यांनी त्यांची राजकीय सुरुवात केली त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात त्यांनी भारिपमध्ये प्रवेश केला. भारिपच्या तिकीटावर त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत सुद्धा त्यांनी काम केले आहे. त्यानंतर मग त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी 2005 मध्ये शिवसेना उपनेत्या म्हणून काम पाहिलं, 2007 मध्ये त्या शिवसेनेच्या प्रवक्त्या झाल्या त्यानंतर 2010 मध्ये त्यांनी शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून काम केलं. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सन्माननीय सदस्य म्हणून तीन वेळा त्यांनी काम केलं. सध्या त्या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याकडे पक्षातील एक जबाबदार आणि विश्वासू व्यक्तिमत्व म्हणुन त्यांच्याकडे पाहिलं जातं होतं. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे...