राजकीय भांडणं आपल्यासाठी काही नवीन नाहीत, कार्यकर्ते रस्त्यावर एकामेकांशी भांडतात तर नेते मंचावरून एकामेकांची उणी धुणी काढतात. मात्र आता गेल्या काही काळात राजकीय नेत्यांची मंचावरची भांडणं ही वैयक्तीक होताना दिसत आहेत. शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात ही शाब्दीक बाचाबाची झालीय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात खासदार भावना गवळी या भाजपा आमदार राजेंद्र पाटणी घरात घुसून मारण्याची धमकी देताना दिसत आहेत. भावना गवळी यांनी भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांना थेट "जास्तीचे नाटकं नाही करायचे, तुला घरात घुसून मारेन... अशी सीबीआय चौकशी लावेल माय-बाप दिसेल," असे म्हटल्याचे या व्हिडिओत ऐकू येत आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाशिम जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्येही या व्हिडिओचीच दिवसभर चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार-खासदाराची ही बाचाबाची पाहून उपस्थित कार्यकर्तेही अवाक झाले होते, शेवटी सर्वपक्षीयांनी पुढाकार घेऊन या बैठकीतला हा तंटा मिटवला. पण, लोकप्रतिनीधींकडून अशा प्रकारचं वर्तन होणं चुकीचं असल्याचं अनेकांचं मत आहे.
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये हा वाद झाला अन क्षणातच शहर बंद व्हायला सुरुवात झाली. भाजपाच्यावतीने पाटणी चौकामध्ये आंदोलनही केले गेले. त्यामुळे शहरातील दुकानदारांनी सुध्दा घाबरून आपली दुकानं बंद केली. पाटणी आणि गवळी यांच्या भांडणामध्ये या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. वातावरण चिघळू नये याकरिता जागोजागी पोलीस कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून मतभेद सुरू आहेत, मात्र त्यावर दोन्ही नेते दुर्लक्ष करीत आपआपला कारभार चालवतायत. मात्र प्रजासत्ताक दिनी यांच्या भांडणाचा कळसच झाला अन् भावना गवळी आणि राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली.