केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यातून नियुक्ती मिळाली कि सेवा करण्याची संधी मिळते. सेवा करण्याची संधी मिळविण्यासाठी खूप स्ट्रगल करावे लागते. मुलींनो, करिअरच्या अनेक वाटा असल्या तरी यश मिळविण्यासाठी आत्मविश्वास अतिशय महत्वाचा आहे. जगात अशक्य असं काहीच नाही, ती जिद्द मला तुमच्यामध्ये दिसते आहे, तुम्ही चिकाटीने अभ्यासाला लागा, यश तुमच्या पदरात पडेल, असा विश्वास राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. रविंदर कुमार सिंगल यांनी व्यक्त केला.
पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन कुंभारवळण येथे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक दादा गायकवाड हे होते. पुढे बोलतांना ते म्हणाले कि, मुलींनो तुम्ही आपलं संभाषण कौशल्य अधिक चांगलं बनवलं पाहिजे, आपलं म्हणणे प्रभावीपणाने मांडले पाहिजे, बोलण्यात अडचण वाटत असेल, तर ग्रुप बनवून आपल्या आवडत्या विषयावर आपली बाजू मांडून चर्चा केली पाहिजे. ज्ञानाला नेहमीच मागणी असते. शिक्षणाएवढेच शारीरिक शिक्षण देखील महत्त्वपूर्ण आहे. स्पोर्टची मुले अतिशय शार्प असतात, इतरांपेक्षा ते पुढे असतात. त्यामुळे हि बाब तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, सर्वात आधी तुम्ही सर्व मुलींनी रोज दिनचर्या ठरवावी, नियंत्रित आहार, व्यायाम, शारीरिक कसरती, नियमित अभ्यासाचा सराव यावर भर देण्याचे आवाहन केले. मुलींनो तुम्ही सर्व मुली संवादाकडे लक्ष द्या, स्वतःवर विश्वास ठेवा, चुकांना घाबरू नका, इतरांपेक्षा वेगळे व्हा, भीतीशी लढा, स्वतःला प्रश्न विचारा, जिंकण्याकडे लक्ष ठेवा, लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा, मेडिटीशन करा, चांगली पुस्तक वाचा, टार्गेट तयार ठेवा, आपल्यात क्षमता निर्माण करा, अश्या मौल्यवान टिप्स देत अडचणीत आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी ठेवा असे आवाहन केले. शेवटी मुलींनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मनमोकळेपनाने उत्तरे दिली. पहिल्यांदा संस्थेत आल्यामुळे चिमुकल्या मुलींनी आयपीएस डॉ. सिंगल यांना हाताने बनविलेले ग्रीटिंग भेट दिले. ते बघून त्यांनी चिमुकल्या मुलींचे कौतुक केले. ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक दादा गायकवाड यांनी सन्मानचिन्ह आणि तुळशीचे रोप देऊन डॉ. रविंदर सिंगल यांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता अधीक्षिका स्मिता पानसरे, संजय गायकवाड, सौ. सुजाता गायकवाड, मुकेश चौधरी, रुपाली कुंभारकर, रितेश जांभुळकर, प्रसन्न गायकवाड, रवी ओहोळ, चांदणी शिरोळकर यांनी अथक परिश्रम घेतले.
सिंधुताई सपकाळ दुसऱ्यांसाठी जगल्या...
मूल्यांच्या आधारावर मार्गक्रमण करणे हेच जीवन आहे. इतरांसाठी जगणे हिच मानवी जीवनाची फलश्रुती आहे. अतुनलीयतेपेक्षा अनुकरणीय यात जीवनाची सार्थकता आहे. अनाथांची माई सौ. सिंधुताई सपकाळ ह्या अनाथ, निराधार, निराश्रित बालकांसाठी जगल्यात. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत हाती घेतलेले कार्य सोडले नाही त्यामुळेच त्यांचे कार्य जगभर पोहोचले, त्यांना सरकारद्वारे पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले, हि खूप मोठी गोष्ट आहे. त्याच तुम्हा मुलींसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत असं हि अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. रविंदर कुमार सिंगल यांनी सांगितले.
कोण आहेत डॉ. रविंदर सिंगल?
डॉ. रविंदर कुमार सिंगल हे भारतीय पोलीस सेवेच्या १९९६ च्या बॅच मधील आयपीएस अधिकारी असून सध्या ते अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य मुंबई येथे कार्यरत आहेत. याशिवाय त्यांची प्रसिद्ध मोटिवेश्नल स्पिकर, उत्कृष्ट छायाचित्रकार, आयर्नमॅन, टेडेक्स स्पीकर, लेखक, गुरू, मॅरेथॉनर, सायकलीस्ट अशी पोलीस दलात आगळी-वेगळी ओळख आहे. त्यांनी त्यांच्या कामगिरीतून संपूर्ण देशभर महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्याचे कार्य केले आहे. सर्वोच्च मानाचा आयर्नमॅन किताब मिळविणारे ते भारतीय पोलीस सेवेतील पहिले अधिकारी आहेत. |