रविवार ४ फेब्रुवारी रोजी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात गावभेट दौऱ्यावर असताना, महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्षा आणि राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर RUPALI CHAKANKAR यांनी खामगाव येथे आयोजित "सन्मान 'ती'चा" हळदीकुंकू या कार्यक्रमात उपस्थिती लावली. हा कार्यक्रम राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात बोलतांना,रूपाली चाकणकर यांनी उपस्थित महिलांना पती गमावलेल्या भगिनींना "विधवा" न म्हणता "पूर्णांगिनी" म्हणण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले की, "विधवा" हा शब्द स्त्रीला कमकुवत आणि अपूर्ण दर्शवतो, तर "पूर्णांगिनी" हा शब्द तिच्या आत्मनिर्भरतेची आणि पूर्णत्वाची भावना व्यक्त करतो.
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील अनेक ग्रामपंचातींनी विधवा प्रथा बंदीचे ठराव करून आदर्श निर्माण केला आहे. याचा उल्लेख करताना, रूपाली चाकनकर यांनी या प्रयत्नाचे कौतुक केले आणि इतर ग्रामपंचायतींनाही याच मार्गावर चालण्याचे आवाहन केले. गावभेट दौऱ्यादरम्यान रूपाली चाकणकर यांनी उपस्थितांशी संवाद साधून गावातील समस्या आणि विकास कामांची माहिती घेतली. त्यांनी गावातील विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभा कार्याध्यक्ष शशिकांत किवळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या खडकवासला ग्रामीण अध्यक्षा शुभांगीताई खिरीड, खामगावच्या सरपंच संतोषी दारवटकर, ग्रामध्यक्षा सुवर्णा वालगुडे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश शेळके आणि खामगाव मधील अनेक महिला उपस्थित होत्या.
रूपाली चाकणकर यांनी सर्व उपस्थित महिलांचे आभार मानले आणि त्यांच्या सुखमय आणि समृद्ध जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.