रूपाली चाकणकर यांनी बदलापूर प्रकरणाबाबत संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन तपासाचा घेतला आढावा
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष श्रीमती रूपाली चाकणकर यांनी आज बदलापूर येथील प्रकरणाबाबत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस सह आयुक्त, ठाणे डॉ ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडून आतापर्यंतच्या तपासाचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, 'या प्रकरणी आरोपीची पोलीस कोठडी २६ तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे. एस आय टी ने ही तपास सुरू केला आहे. मुलींची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यानुसार कलम वाढविण्यात आली आहेत.
आमच्या जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या समुपदेशकांकडून मुलींचं आणि कुटुंबाचे समुपदेशन सुरू आहे.
सबंधित अधिकाऱ्यांनी आज तातडीने बैठक घेऊन मनोधैर्य योजनेतून आवश्यक ते सहकार्य या कुटुंबाला करण्याची कार्यवाही केली आहे. मुलींना न्याय मिळेल, आरोपीला कठोर शिक्षा होईल यासाठी आयोग पाठपुरावा करेल.
घडलेली घटना दुर्दैवी आहे पण यानिमित्ताने समाजात तेढ निर्माण करणे, अशांतता करणे याचे जर प्रयत्न केले जात असतील तर त्यावरही पोलिसांनी लक्ष ठेवावे. सायबर पोलिसांनी सतर्क राहावे अशा सूचना त्यांनी यावेळी पोलिसांना दिल्या. यावेळी आयोगाच्या सदस्या ऍड गौरी छाब्रिया उपस्थित होत्या.