"40 जण आमच्या संपर्कात.." पुन्हा एकदा राजकीय नाट्य

Update: 2022-07-11 08:20 GMT

राज्याच्या राजकारणात मागील पंधरा दिवसात अशा काही घडामोडी होतील याची पुसटशी ही कल्पना कोणालाच नव्हती. या सगळ्या सत्तानाट्यचे सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस असल्याचं म्हटलं जात आहे. कारण मागच्या अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा एक डायलॉग चांगलाच गाजला होता तो म्हणजे 'मी पुन्हा येईल..' (Mi Punha Yein) पण त्यावेळी देखील राजकारणात अशा काही घडामोडी घडल्या की ज्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये असलेली युती तुटली आणि शिवसेनेने राष्ट्रवादी, काँग्रेस सोबत सरकार स्थापन केलं. आता देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा सत्तेत येण्याची संधी न मिळाल्याने ते अस्वस्थ असल्याचे देखील अनेकवेळा म्हंटल गेलं. त्यामुळे कोणत्याही प्रकारे हे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. भाजपच्या अनेक नेत्यांनी हे सरकार कधी पडेल याच्या अनेक तारखा सुद्धा दिल्या होत्या. आणि या सगळ्याला अखेर यश आलं ते म्हणजे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर. देवेंद्र फडणवीस पुन्हा आले खरे मात्र त्यांना उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावे लागले. आता मागच्या पंधरा दिवसात ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या किंवा त्याआधी पडद्यामागे ज्या काही घडामोडी घडल्या त्या नक्की काय असतील हे माहित करून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे.

अनेक लोक तर म्हणत होते की, या राजकीय नाट्यावर एक चित्रपटच बनवला पाहिजे. कारण ज्या घडामोडी घडल्या त्या होत्याच इतक्या नाट्यमय. तर या सगळ्या राजकीय घडामोडींवर चित्रपट नाही परंतु एक वेबसिरीज येते आहे. प्लॅनेट मराठी (Planat Marathi) 'मी पुन्हा येईन..' या नावाची वेब सिरीज घेऊन येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसांपूर्वी ज्या काही घडामोडी घडल्या त्या पार्श्वभूमीवर ही वेब सिरीज असणार आहे. प्लॅनेट मराठी निर्मित या वेब सिरीज मध्ये भारत गणेशपुरे, सयाजी शिंदे, सिद्धार्थ जाधव, उपेंद्र लिमये असे अनेक दिग्गज कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर याचे लिखाण आणि दिग्दर्शन अरविंद जगताप यांनी केले आहे.

या वेब सिरीजचा टिझर रिलीज होताच सर्वत्र याची चर्चा सुरू झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चेत असलेला डायलॉग म्हणजे 'आमच्या संपर्कात इतके आमदार आहेत' या वाक्याने महाराष्ट्राच्या राजकारणात धुमाकूळ घातला. आता हेच वाक्य ओटीटीवर पुन्हा एकदा धुमाकूळ घालणार हे मात्र नक्की. महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही संदिग्धता कायम आहे. पुढे नक्की काय होईल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. मात्र आपण इतकं म्हणू शकतो की या सगळ्या राजकीय नाट्यांवर यापुढे देखील अनेक चित्रपट व अशा वेब सिरीज येत राहतील..

Full View

Tags:    

Similar News