राणा दाम्पत्यावर मुंबई पोलिसांचे गंभीर आरोप; आज जामीनअर्जावर सुनावणी

खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जामिनाला विरोध करताना मुंबई पोलिसांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे शनिवारी या दोघांच्या जामीनअर्जावरील सुनावणीमध्ये काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.;

Update: 2022-04-30 06:03 GMT

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अटकेनंतर आता राज्य सरकारने कोर्टात गंभीर दावा केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा हट्ट या दोघांनी केला होता. यामागे केवळ धार्मिक उद्देश असल्याचे ते सांगत असले तरी यामध्ये सरकार पाडण्याचा कट होता, असा आरोप मुंबई पोलिसांनी केला आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली, त्यावेळी पोलिसांनी हा दावा केला आहे. महाविकास आघाडी सरकारला आव्हान द्यायचे, मुख्यमंत्री हिंदूविरोधी असल्याचे दाखवायचे आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवून राज्यपालांमार्फत सरकार बरखास्त करण्याचा भाजप आणि राणा पती पत्नी यांचा कट होता, असा दावा मुंबई पोलिसांनी या सुनावणीवेळी केला. तसेत या दोघांना जामीन देऊ नये अशी भूमिका मांडली,

प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी आणि त्याचबरोबर सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली राणा दाम्पत्य सध्या तुरुंगात आहे. त्यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जावर राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत उत्तर दाखल केले आहे. आता त्यांच्या या जामीनअर्जावर शनिवारी सुनावणी होणार आहे.

मातोश्री हे शिवसैनिकांसाठी श्रद्धास्थान आहे, पण तिथेच हनुमान चालीसा वाचवण्याचा आग्रह धरुन तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न या दोघांनी केला असेही पोलिसांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे. तसेच हिंदुंना मोकळेपणे आपली पूजाअर्चा करता येत नाही, असे दाखवून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचाही कट होता, असाही आरोप पोलिसांनी केला आहे. एवढेच नाही तर आमदार रवी राणा यांच्यावर १८ फौजदारी खटले आणि नवनीत राणा यांच्या ७ फोजदारी खटले आधीच दाखल आहेत, त्यामुळे त्यांना जामीन मिळाला तर ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करु शकतात, असा दावा करत सरकारने त्यांच्या जामिनाला विरोध केला आहे. एवढेच नाही तर या दाम्प्त्याने आतापर्यंत केलेल्या वक्तव्यांमधून त्यांच्यावरील राजद्रोहाचा आरोप खरा ठरत असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.

Tags:    

Similar News