फडणवीस, राज ठाकरे राज्याचे खरे शत्रू; मनिषा कायंदे भडकल्या

Update: 2022-04-25 12:22 GMT

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मशिदीवरील भोंगे यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षांने घेतलेल्या आक्षेपावर तोडगा काढण्यासाठी आणि राज्यात शांतता कायम राहावी यासाठी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी पाठ फिरवली. यांना राज्यात अराजक मजवायची असल्यानेच ते या बैठकीला अनुपस्थित राहिले आणि हेच या राज्याचे खरे शत्रू आहेत, असा घणाघाती आरोप शिवसेनेच्या विधान परिषद आमदार आणि प्रवक्त्या डॉ.मनीषा कायंदे यांनी केला आहे.

त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास सरकार धार्मिक स्वातंत्र्याला संरक्षण देणारे, त्याचवेळी विरोधी पक्षाच्या भूमिकेचा आदर करणारे सरकार आहे. पण कोणाच्या दुराग्रहामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार असेल तर त्यावर कठोर कारवाई करण्याची हिंमत या सरकारमध्ये आहे.

मशिदीवरील भोंगे या विषयावरून विरोधी पक्षाने जो वाद निर्माण केला आहे, त्यावर सर्वमान्य तोडगा काढावा यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांची आज बैठक बोलावली होती, याकडे लक्ष वेधतांना मनिषा कायंदे म्हणाल्या, वास्तविक, मनसे आणि भाजप भोंगे या विषयावर गंभीर असते तर स्वतः राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित राहून त्यांनी राज्याच्या हितासाठी उपयुक्त सूचना केल्या असत्या. पण दोघेही नेते मुंबईत असूनही त्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली आहे.

त्या पुढे म्हणाल्या, याचा अर्थ स्पष्ट आहे की राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील जनतेच्या सुरक्षेशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना या राज्यात दंगल घडावी आणि सामान्य माणूस त्यात भरडला जावा हाच उद्देश दिसतोय. उद्धव ठाकरे सरकार बरखास्त करण्यासाठी टोकाची भूमिका घेणारे विरोधी पक्ष हेच या राज्याचे आणि इथल्या जनतेचे खरे शत्रू आहेत, असा दावा डॉ. मनिषा कायंदे यांनी केला.Manisha

Tags:    

Similar News