युक्रेनमध्ये अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांशी महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी संवाद साधला
रशिया–युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हजारो भारतीयांसोबतच तिथे अडकलेल्या अमरावतीमधील ८ विद्यार्थ्यांशी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री अँड. यशोमती ठाकूर यांनी व्हिडीओ कॉलद्वारे आज संवाद साधला. यावेळी तिवसा तालुक्यातील तुषार अशोग गंधे यांच्यासह सर्वांना धीर देत लवकरात भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. अँड. ठाकूर यांच्याशी झालेल्या संवादामुळे या कठीण काळात आपली चौकशी केल्याबद्दल धीर मिळाल्याचे तुषार यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने सांगितले.
रशिया–युक्रेन युद्ध पेटले असताना भारतातील जवळपास २० हजार विद्यार्थी असून यात महाराष्ट्रातील १२०० तर अमरावतीतील ८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
अशावेळी जिल्ह्यातील अभिषेक बारबडे, प्रणव फुसे, साहिर तेलंग, तुषार गंधे, तनिष्क सावंत, वृषभ गजभिये, स्वराज पौंड आणि प्रणव भारसाकळे या ८ विद्यार्थ्यांचा संपर्क क्रमांक मिळताच अँड. ठाकूर यांनी तातडीने त्यांच्याशी संवाद साधला व तेथील परिस्थितीची माहिती घेतली. शिवाय त्यांनी घाबरून न जाता थोडा संयम ठेवावा असा धीर देत, आम्ही आपल्याला भारतात सुखरूप आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाच्यावतीने परराष्ट्र मंत्रालय व केंद्र सरकारशी सातत्याने पाठपुरावा करीत असून लवकरच आपण भारतात सुखरूप असाल अशा विश्वास अँड ठाकूर यांनी त्यांना दिला. याकामी आपण स्वतः लक्ष देऊन असल्याचे ही त्या म्हणाल्या.
विद्यार्थी हितासाठी प्रचार सोडून निर्णय घ्यावा.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसह इतर राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांना आज अत्यंत प्रतिकुल परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. विमान प्रवासाचे भाडेही प्रचंड वाढवण्यात आले. युद्ध परिस्थीतीमुळे हवाई मार्गाने आणण्यात अडचणी येत आहेत. केंद्र सरकारने तातडीने या विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पंतप्रधानांनी तात्काळ यात लक्ष घालून विद्यार्थ्यांना मायदेशी आणावे अशी विद्यार्थ्यांच्या हितासाठी विनंतीपर मागणी अँड ठाकूर यांनी केली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा प्रचारात व्यस्त असून त्यातून थोडा वेळ काढल्यास आमचे विद्यार्थी सुखरूप घरी पोहचतील असेही म्हटले आहे.