बुडणाऱ्या आई बहिणीला तिने पाण्यातून बाहेर काढले, पण दुर्दैवाने...
डोंबिवलीतील 16 वर्षाच्या मुलिने बुडणाऱ्या आई बहिणीला वाचवले, पण दुर्दैवाने आता तिचाच शोध घेण्याची वेळ आली आहे..
डोंबिवली कोळेगाव परिसरात आई दोन मुलींसह कपडे धुण्यासाठी खदानीत गेली असता लहान मुलगी पाण्यात बुडाली. तिला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी घेतली. धक्कादायक बाब म्हणजे या दोघींनी वाचवण्यासाठी मोठ्या मुलीनेही पाण्यात उडी घेतली. यामध्ये आई आणि लहान मुलीला वाचवण्यात यश आलं असून मोठी मुलगी पाण्यात बुडाल्याचं सांगण्यात येत आहे.
विवेकानंद शेट्टी हे आपल्या पत्नी गीता आणि चार मुलांसह डोंबिवली कोळेगाव परिसरात राहतात. रविवारी (28 डिसेंबर) दुपारच्या सुमारास विवेकानंद यांची पत्नी गीता आपल्या चार वर्षाची मुलगी परी आणि 16 वर्षाची मुलगी लावण्या हिच्यासह कपडे धुण्यासाठी घरानजीक खदाणीत गेल्या होती. गीता कपडे धुवत असताना त्यांची लहान मुलगी परी याच ठिकाणी खेळत होती. खेळता खेळता परीचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. मुलगी बुडत असल्याचे पाहून गीता यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र गीता यांनाही पोहता येत नव्हते. आई आणि बहीण पाण्यात बुडत असल्याचे पाहून घाबरलेल्या लावण्याने दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. परंतु लावण्याला देखील पोहता येत नव्हते. मात्र मोठ्या धाडसाने तिने आईसह आपल्या लहान बहिणीचा जीव वाचवला. मात्र लावण्याला पोहता येत नसल्याने ती पाण्यात बुडाली.
या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांसह अग्निशमन विभागाने घटनास्थळी दाखल होत तातडीने लावण्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र रात्र झाल्याने शोध कार्य थांबवण्यात आलं. आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु केलं जाणार आहे.