मार्च २०२० पासून कोविड १९ या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगामध्ये झालेला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार मार्च २०२० पासून राज्यामध्ये सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेले आहेत. दरवर्षी साधारणतः जून मध्ये सर्व राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष सुरु होत असते. तथापि सन २०२१-२२ मध्ये नेहमीप्रमाणे शाळा सुरु करता आलेल्या नाहीत. वेळेवर शाळा सुरु करता न आल्यामुळे विहीत वेळेत पाठ्यक्रम पूर्ण करणेबाबत समस्या निर्माण होऊ शकते. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांचा इयत्ता १ ली ते १२ वी चा पाठ्यक्रम सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता कमी करणेबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती,मात्र यावर आता निर्णय झाला आहे.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती देत म्हंटले आहे की, सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता इ. १ ली ते इ. १२ वीपर्यंतचा २५ % पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच, कोरोनामुळे यंदाही शाळा वेळेत सुरु न करता आल्याने विहित वेळेत पाठ्यक्रम पूर्ण व्हावा व तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना त्यांची शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करता यावीत,याअनुषंगाने हा निर्णय घेतला आहे.कमी केलेल्या पाठ्यक्रमाची तपशीलवार माहिती
लवकरच जाहीर करण्यात येईल असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.