मोदींच्या वाराणसीत 'कोरोना माई'ची पूजा; शेकडो महिला 21 दिवस करणार पूजापाठ
पूजा केल्याने कोरोना देवी खुश होऊन मुक्ती देईल अशी त्यांना अपेक्षा आहे.
कोरोना महामारीचं संकट सर्व देशभरात पाहायला मिळत आहे. अशावेळी अनेक ठिकाणी काही आश्चर्यजनक काही घटना समोर येत आहे. असाच काही प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघ म्हणजेच, उत्तर प्रदेशच्या वाराणसी मध्ये पाहायला मिळत असून, जिथे काही महिला कोरोनाला 'कोरोना माई' म्हणून पूजा करत आहेत.
कोरोनाला हरवण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या पध्दतीने प्रयत्न करत असताना, उत्तर प्रदेशच्या नगर काशी भागात गंगा नदीच्या घाटांवर काही महिला धर्मिक कार्यक्रम करून कोरोनाला हरवण्याचा दावा करत आहे.
ह्या महिला सकाळ-संध्याकाळ कोरोनाला देवी मानून घाटावर तिची पूजा करत असून, पूजा केल्याने कोरोना देवी खुश होऊन मुक्ती देईल अशी त्यांना अपेक्षा आहे.
त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाराणसीच्या जैन घाटावर शेकडो महिला आशा पूजा करताना पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे कोरोना देवीला खुश करण्यासाठी 21 दिवसांची विशेष पूजा करण्याचा नियोजन सुद्धा करण्यात आले आहे. मात्र हा फक्त अंधश्रद्धेचा भाग असल्याचं अंधश्रध्दा निर्मूलन समितीचं म्हणणं आहे.