तीन मुली, चौथ्या मुलासाठी होता का दबाव? अवैध गर्भपात मृत्यू प्रकरणात संशय वाढला
बीडमध्ये गर्भपात करताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. पण ही घटना फक्त गर्भपाताचीच नाही तर तिला अनेक कंगोरे देखील आहेत. बीड मध्ये अवैध गर्भपाताची साखळी आहे का? अवैध गर्भपात म्हणजे नेमकं काय? वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ काय सांगतो? या सर्व प्रश्नांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. राज्याचं लक्ष वेधून घेणाऱ्या या प्रकरणाच्या तळाशी नेमकं कोण आहे हे जाणून घेण्यासाठी वाचा हा रिपोर्ट....
काही दिवसांपुर्वी देशाचा लिंगगुणोत्तराची एक आकडेवारी आली होती. ज्यात हजार पुरूषांमागे स्त्रियांचं प्रमाण अधिक होतं. या आकडेवारीमुळे सगळीकडे आनंद साजरा करण्यात आला होता. पण तरीही आपल्याला रोज कुठे ना कुठे अवैध गर्भपात किंवा स्त्री भ्रुण हत्येच्या बातम्या वाचायला मिळतात. मग ही लिंगगुणोत्तराची आकडेवारी फसवी आहे का? असा सवाल उपस्थित होतोय. हा प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारणही तसंच आहे. दोन दिवसांपुर्वी बीडमध्ये गर्भपात करताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. पण ही घटना फक्त गर्भपाताचीच नाही तर तिला अनेक कंगोरे देखील आहेत. ते कोणते हे समजून घेण्यासाठी आपल्याला संपूर्ण घटना जाणून घ्यावी लागेल.
बीड जिल्ह्यात गेल्या काही काळापासून अवैध गर्भपात होत असल्याची कुजबुज सुरू होती मात्र तशी सत्य माहिती कधी समोर आली नव्हती. पण आता मात्र या अवैध गर्भपातामुळे एक महिलेचा मृत्यूच झाल्याने अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचं प्रकरण उघडकीस आलं आहे. ५ जुनला बीड तालुक्यातील बकरवाडी गावात उसतोड मजूर असलेल्या शितल गाडे या विवाहित महिलेचा अवैध गर्भपात करताना मृत्यू झाला आहे. ऊसतोड मजूर असलेल्या शीतलला या अगोदरच तीन मुली आहेत. ज्यांचं वयोमार अनुक्रमे ९,६ आणि ३ वर्षे असं आहे. तीन मुली असुन सुध्दा पुन्हा चौथ्यांदा त्या गर्भवती होत्या.
परंतु हा गर्भदेखील हि मुलीचाच असल्याची त्यांनी गर्भलिंग निदान करून खात्री करून घेतली. त्यामुळे शितल यांनी गर्भपात करण्यासाठी अंगणवाडी सेविका असलेल्या मनिषा सानप आणि नर्स सिमा डोंगरे यांची मदत घेतली. मनिषा सानप आणि सिमा डोंगरे यांनी जनावरांच्या गोठ्यामध्ये गर्भपात करण्यात आला. या गर्भपातादरम्यान शितल यांच्या गर्भपिशवीला इजा झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तसत्राव होऊ लागला परंतु तो रक्तस्राव न थांबल्याने पहिल्यांदा त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तिथेही न थांबल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तत्पूर्वीच शितल यांचा मृत्यू झाला. या मृत्यूबद्दल संशय आल्याने पाच तज्ञ डॉक्टरांच्या समितीकडून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदनामुळेच हा अवैध गर्भपाताचा प्रकार उघडकीस आला.
या अवैध गर्भपात प्रकरणात मयत महिलेच्या पती ,सासरा, भावाला सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर दुपारी या प्रकरणातील एजंट असलेल्या अंगणवाडी सेविका मनिषा सानप यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले पण नर्स सिमा डोंगरे मात्र फरार होत्या. या प्रकरणात दिवसभर पोलिसांकडून चौकशी केली परंतू शेवटपर्यंत मनिषा सानप या महिलेने उशिरापर्यंत तोंड उघडले नव्हते. तिने गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांचे नाव सांगण्यास टाळाटाळ केली बाकी इतर सर्व कबुली तिने दिली आहे.
नर्स सिमा डोंगरेचा मृत्यू एक गुढ
पण ८ जुनला या प्रकरणातील फरार आरोपी नर्स सिमा डोंगरे यांचा मृतदेह तलावात आढळून आला आहे. त्यामुळे सिमा डोंगरे यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली आहे हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासोबतच हे एक मोठं रॅकेट असण्याची देखील शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येतेय. ही साखळी वाढण्याची शक्यता असून गेवराई व औरंगाबाद मधील काही डॉक्टरांची नावे आता समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात मृत शितल गाडेंच्या भावाने कबुली दिली आणि त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात अजून कोण कोण दोषी आहे या दिशेने आपला तपास सुरू केला आहे.
अंगणवाडी सेविकेच्या घरात गर्भलिंग निदानाचं साहित्य?
या प्रकरणात शितल यांचे गर्भलिंग निदान गेवराई तालुक्यातील रानमळा या ठिकाणी करण्यात आले आणि त्यासाठी त्यांच्याकडून २५ हजार रुपये घेण्यात आले होते. तर शितल यांचा गर्भपात बकरवाडी येथे जनावरांच्या गोठ्यामध्ये करण्यात आला आणि त्यासाठी त्यांच्या कुटूंबियांकडून ४५ हजार रूपये घेतले गेले. मनीषा सानप अंगणवाडी सेविका यांच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली त्यावेळेस गर्भपात करण्याचे साहित्य व सोनोग्राफी करण्याचे साहित्यही त्या घरांमध्ये आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यात मध्ये एकच खळबळ उडाली आहे. अंगणवाडी सेविकेच्या घरात जर हे साहित्य असेल तर जिल्ह्यात अशा किती अंगणवाडी सेविका आहेत? त्या अशा प्रकारचे काम करत आहेत का? त्याचबरोबर बीडचे एस पी पंकज देशमुख डी वाय एस पी संतोष वाळके जिल्हा शल्य चिकित्सक संतोष साबळे यांनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
चाऱ्यामध्ये जाळून अर्भकाला नष्ट करण्याचा प्रयत्न
बीडच्या अवैध गर्भपात प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा गर्भपात शेतातील जनावरांच्या गोठ्यात बाजेवर केला जात होता. विशेष म्हणजे सौर ऊर्जेच्या उजेडात हे पाप करण्यात आले आहे. जेथे गर्भपात केला त्या गोठ्यापासून बाजूलाच 100 फुटांच्या अंतरावर असलेल्या एका दरीत हे अर्भक सरमाडाने जाळण्यात आले आहे. आरोपी सासऱ्याला घेवून पोलिसांनी बीड तालुक्यातील बक्करवाडी गावात जावून स्पॉट पंचनामा करून जाळलेल्या ठिकाणची आजूबाजूची माती, राख, ज्या बाजावर गर्भपात झाला त्या ठिकाणी आढळलेले रक्ताचे डाग फॉरेन्सिक तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.
या प्रकरणात पती गणेश सुंदरराव गाडे, सासरा सुंदरराव बाबूराव गाडे (दोघे रा. बकरवाडी, ता. बीड), भाऊ नारायण अशोक निंबाळकर (रा. शृंगारवाडी, ता. माजलगाव), महिला एजंट अंगणवाडी सेविका मनीषा शिवाजी सानप (रा.अर्धमसला, ता. गेवराई), प्रयोगशाळा तंत्रज्ञ वासुदेव नवनाथ गायके (रा. आदर्शनगर, बीड), परिचारिका सीमा सुरेश डोंगरे यांच्याविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. यातील नर्स सीमा हिने पाली येथील तलावात बुधवारी दुपारी आत्महत्या केली. इतर पाचही लोक पोलिसांच्या ताब्यात आहेत. मयत शितलच्या पती सासरा आणि भावाला पाच दिवसाची पोलीस कोठडीत आहेत.
अवैध गर्भपात म्हणजे काय?
अवैध गर्भपात जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला गर्भपात म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल. गर्भपात ही गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयात वाढत असलेले बीज बाहेर काढून गर्भावस्थेचा शेवट करण्याची क्रिया आहे. गर्भपात तांत्रिक गुंतागुंतींमुळे नैसर्गिकपणे देखिल घडू शकतो परंतु बहुअंशी वेळा शस्त्रक्रियेमार्फत घडवून आणला जातो. गर्भधारणा होऊन सहा महिने (२४ आठवडे) पूर्ण व्हायच्या आत गर्भ पडला तर त्याला 'गर्भपात' म्हणतात. आणि जर हा गर्भपात गर्भातील बाळाचे लिंग पाहून केला गेला तर तो गुन्हा ठरतो कारण भारतामध्ये गर्भलिंग निदानालाचा बंदी आहे. कायद्यानुसार तो गुन्हा आहे. रितसर परवानगीशिवाय केला गेलेला गर्भपात म्हणजे अवैध गर्भपात होय.
मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (एमटीपी) कायदा 1971
महिलांना पुर्णपणे गर्भपातावर बंदी आहे असं नाही पण त्याचे काही नियम आहेत. भारत सरकारचा मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (एमटीपी) कायदा १९७१ त्यासाठी तयार करण्यात आला आहे. या कायद्यात काळानुरूप बदलही होत गेले आणि आता २०२१ मध्ये झालेल्या बदलांनुसार महिलांना गर्भाला २० आठवडे होण्यापुर्वी त्याला पाडण्याची मुभा आहे. परंतू गर्भपाताची मर्यादा 20 आठवड्यांच्या आधीच्या कमाल मर्यादेवरून 24 आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे, परंतु केवळ विशेष श्रेणीतील गर्भवती महिलांसाठी जसे की बलात्कार किंवा अनैतिक संबंधातून वाचलेल्यांसाठी. परंतु या समाप्तीसाठी दोन नोंदणीकृत डॉक्टरांची परवानगी आवश्यक असेल.
20 आठवड्यांपर्यंतच्या सर्व गर्भधारणेसाठी एका डॉक्टरची परवानगी आवश्यक असते. पूर्वीचा कायदा, MTP कायदा 1971, 12 आठवड्यांपर्यंतच्या गर्भधारणेसाठी एका डॉक्टरची आणि 12 ते 20 आठवड्यांदरम्यानच्या गर्भधारणेसाठी दोन डॉक्टरांची परवानगी आवश्यक होती. विशेष श्रेणीतील गर्भपात साधकांसाठी आरक्षित 20-24 टाइमलाइनसाठी आता दोन डॉक्टरांची परवानगी आवश्यक आहे.
महिला आता त्यांच्या वैवाहिक स्थितीकडे दुर्लक्ष करून, गर्भनिरोधक अयशस्वी झाल्यामुळे होणारी अवांछित गर्भधारणा संपुष्टात आणू शकतात. आधीच्या कायद्याने असे नमूद केले होते की केवळ "विवाहित स्त्री आणि तिचा पती" हे करू शकतात.
राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासन स्थापन करणार्या तज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय मंडळाने निर्णय घेतल्यास गर्भाच्या अपंगत्वाच्या बाबतीत गर्भपातासाठी उच्च गर्भपात मर्यादा देखील नाही.
एकंदरीत ही सर्व घटना अशी घडलेली आहे. याप्रकरणात पिडीतेच्या कुटुंबियांशी भेट घेण्यासाठी ऍडव्होकेट हेमा पिंपळे गेल्या होत्या. त्यांच्याशी आम्ही बातचित केली त्यावेळेस वेगळीच माहीती समोर आली. "मृत महिलेनेच मुलाच्या हव्यासापोटी चौथा गर्भ धारण केला होता. तिच्या पतीला, सासू सासऱ्यांना मुली असुनही काहीही आक्षेप नव्हता. तिच्या या मुलाच्या हट्टासाठी तिने गरोदर राहिल्यावर गर्भ लिंग निदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिच्या भावाने तिला मदत करून अंगणवाडी सेविका मनिषा सानप यांच्य़ाशी संपर्क करून दिला." अशी माहिती त्यांनी गावकऱ्यांशी बोलल्यानंतर मिळाली असं त्या सांगतात.
सध्या या प्रकरणात शितल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पतीला, सासऱ्याला आणि भावाला अटक करण्यात आली आहे. तर शितल यांच्या तिन्ही मुलींची जबाबदारी एकट्या वयस्कर महिलेच्या खांद्यावर येऊन पडली आहे. मग प्रश्न हा उरतो की एका महिलेला मनात मुलासाठीची इतकी लालसा कशी निर्माण झाली? ती झाली की तिच्यावर घरच्यांचा दबाव होता? आणि इतकी कसली अडचण होती की मुलगा होण्यासाठी शितल यांना चार वेळा गर्भ धारण करावा लागला शिवाय जे आकडे लिंग गुणोत्तराच्या प्रमाणात वाढले आहेत ते या मुळेच वाढले आहेत का? याउप्पर या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या नर्स सिमा डोंगरे यांचा मृतदेह देखील तलावात आढळून येतो. यामुळे या प्रकरणाचा गाभा किती खोल असू शकतो कुणाकुणाचे हात शितल गाडेंच्या रक्तात माखले आहेत हे पोलिस तपासात येत्या काळात उघड होईलच.