दिवाळीनंतर महाराष्ट्रातील शाळा प्रत्यक्ष उघडण्याचे संकेत राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार दहावी आणि बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा विचार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. त्यामुळे दिवाळी संपल्यानंतर येणाऱ्या सोमवारी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेची पायरी चढता येईल.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात एसओपी देखील तयार करण्यात आला आहे. कशा पद्धतीनं शाळा सुरू करण्याचं नियोजन असेल याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
एसओपी मंजूर झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर इयत्ता 10वी 12 वीच्या परीक्षा मे महिन्यातच होतील अशी माहिती देखील यावेळी त्यांनी दिली आहे. शाळा सुरू करण्याआधी पालकांची परवानगी देखील घेतली जाणार आहे. यासंदर्भात पालकांच्या परवानगीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याबाबत नियोजन करण्यात आलं आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहे.