महाराष्ट्रात पुन्हा हुडहुडीची शक्यता...
राज्यात पुन्हा एकदा १२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी गारठा वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेल्या आठवड्यात सुद्धा मुंबईसह राज्य थंडीने गारठले होते. मात्र त्यानंतर गेल्या दोन दिवसांपूर्वी अचानक राज्यात उन्हाळ्याची लाट आल्याचे जाणवू लागले होते.;
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील तापमानामध्ये चढ उतार होताना पाहायला मिळत आहे. कधी कडाक्याची थंडी तर कधी अंगाला चटके बसणारा उन्हाळा राज्यातील जनता अनुभवत आहे. तर कधी ढगाळ वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांमध्ये व्हायरलचे प्रमाण सुद्धा दिसून येत आहे. तर या तापमानातील चऋ उताराचा शेती पिकांवर देखील परिणाम होत आहे. दरम्यान १२, १३ आणि १४ फेब्रुवारी दरम्यान राज्यातील किमान तापमानत घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात जर हवामानात घट झाली तर त्याचा परिणाम उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान विभागाने राज्यातील जळगाव, औरंगाबाद, जालना, नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या जिल्ह्यात हुडहुडी भरणार असल्याचे दिसून येत आहे. तसेच मराठवाड्यातील लातूर आणि नांदेडमध्ये देखील किमान तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मागील काही दिवसापूर्वी राज्यातील काही भागात थंडीचा जोर कमी झाला होता. त्यामुळे राज्यातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. आता पुन्हा एकदा थंडीचा पारा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात सातत्याने तापमानात होणारी चढ उतार पाहाता, याचा फटका शेतीला बसल्याच्या पाहायला मिळत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस आणि कधी कडक उन यांमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या बदलत्या हवामानाचा रब्बी हंगामाच्या पिकांवर परिणाम होत आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, गहू, हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही भागात बदलत्या हवामानाचा केळी पिकावर देखील परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. हवामानातील बदलामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने केळीच्या उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील स्थिती कशी असणार Meteorologist माणिकराव खुळे काय म्हणतात पहा...
१- खान्देश, नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर असे १० जिल्हे वगळता मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमान सरासरी इतके किंवा मराठवाड्यात त्याहीपेक्षा खाली घसरणीमुळे रात्रची थंडी जाणवत आहे. सदर १० जिल्ह्यात मात्र किमान तापमान सरासरीपेक्षा एक ते दोन डिग्रीने वाढल्यामुळे तेथे रात्रीची थंडी फारशी जाणवत नाही. दिवसाच्या कमाल तापमानात मात्र संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २ डिग्री वाढीमुळे असलेला ऊबदारपणा हा तसाच जाणवत आहे. महाराष्ट्रातील सदर थंडीचे 👆 हे मिश्र वातावरण मागे सांगितल्याप्रमाणे रविवार दि.१२ फेब्रुवारीपर्यंत असेच असेल.
२- मात्र सध्या (दि.९-१०फेब्रुवारी) पश्चिमी प्रकोपामुळे ज. का.,लडाख, हि. प्र., उ. खण्ड मध्ये पडत असलेल्या बर्फ व पावसामुळेच आपल्याकडे सोमवार दि.१३ फेब्रुवारीपासुन महाराष्ट्रात पुन्हा हळूहळू थंडीत वाढ होण्याची शक्यता जाणवते.
३- अर्थात दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात कोणतेही ढगाळ वातावरण, पाऊस, अथवा गारपीट नाही. ह्याचीही शेतकऱ्यांनी मनी नोंद ठेवावी असे वाटते.
माणिकराव खुळे
Meteorologist(Retd.)
IMD Pune.