राज्य कुपोषणमुक्त करणार. सक्षम महिला, सुदृढ बालक सुपोषित महाराष्ट्र नारा बुलंद करणार

Update: 2023-07-14 12:32 GMT

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील कुपोषणमुक्तीसाठी तसंच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी युद्धस्तरावर काम करणार असल्याची ग्वाही दिली आहे. त्याचप्रमाणे देशभराच सध्या चर्चिला जात अससेला बेपत्ता मुली तसंच वाढते महिला अत्याचार या संदर्भात महाराष्ट्र पोलीस, महिला आयोग तसेच बालहक्क आयोग, विधी व न्याय विभागाची मदत घेऊन प्राधान्याने काम केले जाईल अशी भूमिका आदिती तटकरे यांनी व्यक्त केली. मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर झाल्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तातडीने कामास सुरूवात केली आहे . 

महाराष्ट्रातील बालमृत्यू, बालविवाह, कुपोषण या समस्यांच्या निर्मूलनाबरोबरच महिलांमध्ये आंत्रप्रन्योरशीप विकसित करण्याचं ही काम महिला व बालविकास विभाग करतं. महिला व बालविकास, ICDS, बालहक्क समिती, महिला आयोग, राजमाता जिजाऊ मिशन, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून महिला व बालविकास खाते महिला व बालकांच्या सर्वांगिण विकासाचे काम करत आहे. प्रत्येक महिलेला योग्य शिक्षण, काम, पोषणासंदर्भातली माहिती, बालकांच्या विकासात पुरुषांचा सहभाग, अशा विविध मार्गांतून हा विभाग यापुढे काम करेल असा विश्वास आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

अंगणवाडी सेविका या महिला व बालविकास विभागाच्या अँबेसेडॉर आहेत. या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, बचत गट तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या समन्वयातून राज्याला एक आदर्श वाटेल अशी व्यवस्था आपण निर्माण करू. पोषण अभियानात संपूर्ण देशात राज्याने सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. यंदा ही महाराष्ट्राची कामगिरी अशीच कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

महिला व बालविकास विभाग या अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विभागाची जबाबदारी पार पाडण्यासाठी निवड केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पक्षाचे नेते आदरणीय प्रफुल्लभाई पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब तसंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या सर्वांचे आदिती तटकरे यांनी मनापासून आभार मानले आहेत.

Tags:    

Similar News