ठाणे शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने महीला सुरक्षा वाऱ्यावर; भाजप महिला आघडीकडून आंदोलन
मुंबई: सर्वसामन्यांच्या सुरक्षेसाठी ठाणे शहरात लावण्यात आलेले 80 टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा आरोप करत, भाजप महिला आघाडीच्या वतीने आज महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तसेच कोट्यवधींची उधळपट्टी करून कंत्राटदरांच भल केलं जात असल्याचा आरोपही महिला आंदोलकांनी केला.
गेल्या काही दिवसांपासूनच्या घटना पाहता ठाणे शहरातील महिला सुरक्षीत नाही, त्याच ताज उदाहरण म्हणजे तीन हात नाका येथील घटना म्हणता येईल. शहरातील सीसीटीव्ही बंद असल्याने गुन्हेगारांची हिम्मत वाढली असल्याचा आरोप, भाजपच्या ठाणे शहर महिला अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी केला आहे.
ठाणे शहराला स्मार्ट सिटी म्हंटले जाते, करोडोंचे प्रोजेक्ट आणले जातात, पण पुढे त्या प्रोजेक्टच काय होते हे ठाणेकरांना माहित सुद्धा होत नाही.चार वर्षांपूर्वी ठाणे शहरात 10 कोटी रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. मात्र चौदाशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यापैकी एक हजार कॅमेरे बंद असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
अनेकदा पोलीस गुन्ह्याच्या तपासासाठी सीसीटीव्ही कॅमेरेतील चित्रीकरण तपासायला जातात, तेव्हा हे कॅमेरे बंद असतात. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा कॅमेरे बंद असतील, तर हे कुणाचं तरी फायदा करण्यासाठी फक्त कागदावर प्रकल्प राबवले जात असल्याचा आरोपही यावेळी, आंदोलकांनी केला.