भयंंकर! कावळ्याला खाऊ घातलं म्हणून महिला डॉक्टरला झाली मारहाण

भुतदया दाखवावी की नाही? पक्ष्यांना खाऊ घातले म्हणून महिला डॉक्टरला मारहाण…

Update: 2022-04-11 13:02 GMT

आपण सर्वांनी शाळेपासूनच भुतदयेचे धडे गिरवले आहेत. पण त्या शिक्षणाचा विसर सध्या काही जणांना पडताना दिसतोय. शहरी भागांमध्ये गेल्या काही वर्षांपासून पशूखाद्यावरून वाद झाल्याच्या घटना सारख्या समोर येत आहेत. शुक्रवारी मुंबईमध्ये सोसायटीच्या आवारात एका ३३ वर्षीय महिला पशुवैद्यकीय डॉक्टरला पशु-पक्ष्यांना खाऊ घालण्यावरून आई-मुलाच्या जोडीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी तिला मारपहाण करताना झाडाच्या फांद्यांचा वापर केला, ज्यामुळे त्या महिला डॉक्टरची कवटी फ्रॅक्चर झाली असून इतरही शारिरीक जखमा झाल्या आहेत. आग्रीपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अद्याप आरोपींना अटक केलेली नाही.

पीडित महिला डॉक्टरचं नाव मानसी मेहता (३३) ही आग्रीपाडा येथील शांती नगर येथील रहिवासी आहे आणि २० वर्षांपासून त्यांच्या अपार्टमेंटमध्ये पाळीव प्राण्यांवर उपचार करत आहे. घटनेनंतर तिला बीवायएल नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ती एका खासगी डॉक्टरांकडे उपचार घेत आहे.

आरोपी अर्चना रामकुमार गुप्ता (४२) आणि तिचा मुलगा पार्थ रामकुमार गुप्ता (१९) हे देखील गेल्या दोन वर्षांपासून याच सोसायटीत राहतात.

मानसी मेहता यांना फाटलेले कपडे, जखमा, कवटी फ्रॅक्चर झाली होती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहता यांची आई नीता कावळ्यांना पोळी खाऊ घालत असताना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. अर्चना गुप्ता हिने पक्ष्यांना खायला देण्यावर आक्षेप घेतल्याने हा वाद झाला.

नेमकं काय घडलं होतं?

मेहता यांनी माध्यमांना सांगितले की, "माझी आई कावळ्यांना चारत होती, तेव्हा अर्चना गुप्ता आली आणि माझ्या आईला शिवीगाळ करू लागली. तिचा मुलगा पार्थ यानेही सहभागी होऊन माझ्या आईला मारहाण केली. मी ताबडतोब गेले आणि आईची ढाल म्हणून त्यांना ढकलले. मात्र त्यानंतर त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी झाडाच्या फांद्या घेऊन माझ्या डोक्यावर दोनदा मारले. इतर रहिवासी आम्हाला मदत करायला लगेच धावून आले. नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी मला एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला ज्यामध्ये फ्रॅक्चर असल्याचे दिसून आले. मी खाजगी डॉक्टरांकडून उपचार घेत आहे," असं ती म्हणाली.

याआधीही नोंदवले होते आरोपींविरूध्द गुन्हे...

पिडीत डॉ. मानसी पुढे म्हणाली, "मी एक पशुवैद्यकीय डॉक्टर आहे आणि मी माझ्या निवासस्थानी प्राण्यांवर उपचार करत आहे आणि माझ्या परिसरातील भटक्या प्राण्यांना २० वर्षांहून अधिक काळ खाऊ घालत आहे. आरोपी कुटुंब दोन वर्षांपूर्वी आमच्या सोसायटीत स्थलांतरित झाले आणि तेव्हापासून ते आमचा छळ करत होते. जनावरांना चारा देण्यावरून आमच्याशी गैरवर्तन केल्याबद्दल मी यापुर्वी त्यांच्याविरुद्ध दोन अदखलपात्र गुन्हेही नोंदवले आहेत."

मेहता यांनी फोर्ट येथे जस्ट स्माइल चॅरिटेबल ट्रस्ट चालवणाऱ्या स्नेहा विसारिया यांना घटनेची माहिती दिली आणि त्यांच्या मदतीने पोलिसात तक्रार दाखल केली. विसारिया यांनी मिड-डेला सांगितले, "पिडीता मानसी मेहता यांनी मला कळवले की, तिच्या डोक्याला जखमा झाल्या आहेत आणि कवटीला फ्रॅक्चर झाले आहे कारण परिसरात जनावरे खायला घालत आहेत. मी तिला आणि तिच्या आईला घेऊन आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पक्ष्यांसह प्राण्यांना चारा देणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. तो गुन्हा नाही. उन्हाळ्यात अनेक पक्षी अन्न आणि पाण्याअभावी मरतात. आपण सर्वांनी त्यांना अन्नदान केले पाहिजे."

वरिष्ठ निरीक्षक योगेंद्र पाचे म्हणाले, "आम्ही अर्चना गुप्ता आणि तिचा मुलगा पार्थ गुप्ता यांच्याविरुद्ध मेहता यांना झाडाच्या फांद्याने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत. या प्रकरणी आरोपींना अजून अटक करायची आहे."

Tags:    

Similar News