#Corona; शाळा पुन्हा बंद...
पहिली ते नववी आणि अकरावीच्या सर्व व्यवस्थापन व माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने जाहीर केला आहे.
मुंबईत वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून दहावी-बारावीचे वर्ग वगळून, पहिली ते नववी आणि अकरावीच्या सर्व व्यवस्थापन व माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने जाहीर केला. राज्यातील अन्य शहरांमधील शाळा सुरू ठेवायच्या की बंद करायच्या याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. ठाणे, पालघर जिल्ह्यातील, नवी मुंबईतील शाळाही ३१ पर्यंत बंद असणार आहे. दरम्यान रायगडमध्ये रूग्णसंख्येचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.
मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे,त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्तींच्या प्रशासकीय समितीने जानेवारी अखेरपर्यंत किंवा पुढील आदेश देईपर्यंत न्यायालयीन कामकाज व्हर्च्युअल माध्यमातून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
तिकडे पुण्यामध्ये देखील निर्बंध कडक लावण्यात येणार आहे. पुणे शहरात २७ डिसेंबरपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. बाधितांपैकी ८० ते ८५ टक्के रुग्ण दोन्ही डोस घेतलेले आहेत. अशा बाधित रुग्णांमध्ये अनेकांना सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे शहरात निर्बंध कडक करावे लागतील, असा इशारा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे. पालकमंत्री अजित पवार याच्या उपस्थितीत आज मंगळवारी बैठक होणार आहे. या बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
तिकडे ठाणे जिल्ह्यातील २९४९ शाळा बंद राहणार आहेत. गेल्या आठवड्यात शंभरच्या घरात असलेली कोरोनाची रुग्णसंख्या जानेवारीत एकदम दोन हजारच्या घरात गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एक हजार ६२० माध्यमिक शाळा आणि जिल्हा परिषदेच्या एक हजार ३२८ प्राथमिक शाळा अशा दोन हजार ८४८ शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सोमवारी हा निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्यातील तब्बल सव्वाआठ लाख विद्यार्थ्यांना आता पुन्हा ऑनलाइन शिक्षण घेतील.