छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे संस्कार देणाऱ्या स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ यांचा जीवनप्रवास आता प्रेक्षकांना अनुभवायला मिळणारंय. सोनी मराठी वाहीनीवर स्वराज्यजननी जिजामाता ही मालिका 18 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
याआधी अनेक चित्रपट, नाटकांमधून राजमाता जिजाऊ यांचं चरित्र पहायला मिळालं होतं. आता या मालिकेतून जिजाऊंचा जीवनप्रवास अगदी सुरुवातीपासून अनुभवता येणारंय.
“शहाजीराजांची स्वराज्यसंकल्पना ज्यांनी जपली, जोपासली आणि स्वराज्यसंस्थापक शिवरायांना घडवलं त्या जिजाऊ मासाहेबांचं जीवनचरित्र प्रेक्षकांसमोर आणणं ‘सोनी मराठी’च्या माध्यमातून शक्य होत आहे ही आनंदाची बाब आहे आणि तितकीच जबाबदारीचीही! ही मालिका केवळ मनोरंजन नाही तर संस्कार असेल आणि तमाम जिजाऊंच्या लेकींसाठी अभिमानाचा हुंकार असेल!’’
असं मालिकेचे निर्माते डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलंय.
स्वराज्यजननी जिजामाता मालिकेची निर्मिती डॉ. अमोल केल्हे यांच्या जगदंब क्रिएशनची केली आहे. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेनंतर त्यांची ही दुसरी निर्मिती आहे. या मालिकेचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.