स्त्री आणि रश्मी पुराणीकवरची टिका...

Update: 2019-11-29 09:49 GMT

ट्रोल कोण कसे होईल हे सांगता येत नाही. पत्रकार तर सतत होत राहतात. काल कोणी होते आज कोणी आहे. त्यातच रश्मी पुराणिक ही ए बी पी माझाची प्रतिनिधी सापडली आहे. रश्मीला ट्रोल करणाऱ्या मंडळींना मला काही बोलायचे आहे. "आपण सगळेच एका स्त्री लोकप्रतिनिधीचे समर्थक आहात. आणि काही दिवसांपूर्वी आपण सगळे त्याच नेतृत्वावर आक्षेपार्ह विधान केल्यामुळे संतप्त झाला होतात. त्यावर खूप प्रतिक्रिया देखील आल्या. त्या विषयावर मनातून लिहिणारा मी देखील होतो. आज आपण तीच कृती परत करत आहात. एका स्त्रीला अर्वाच्य आणि घाणेरड्या भाषेत ट्रोल करत आहात. स्त्रीच्या चारित्र्याचा सन्मान करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. खास करून त्यांची जे एका स्त्री नेतृत्वाचे समर्थक आहेत. त्यामुळे ताईचे समर्थन करणाऱ्या मंडळींची जबाबदारी विशेष वाढते. आपण निष्ठा प्रेम सिद्ध करण्याच्या नादात आपले नेतृत्व असलेली स्त्री दुखावली जातेय का? याचा विचार नक्की करावा. रश्मी पुरणीकच्या पोस्टवर, ट्विटवर टीका नक्की करा पण शब्दाचे भान ठेवा. "

रश्मी तू देखील चुकलीच...

https://twitter.com/Marathi_Rash/status/1199949838080720896?s=20

'चिक्की खाऊन ऊर्जा मिळाली' हे रश्मी पुराणिक यांचे विधान आणि त्याखाली टाकलेला हॅश टॅग देखील असाच हेतुपूर्वक व नाहक वाटतो. अंगावर वाद ओढवून घेणारा... काही वादविषय मुद्दाम काढले जातात की काय? प्रश्न पडतो. पंकजा मुंडे यांना जाणीवपूर्वक उचकावत काही मंडळीना कोणते समाधान मिळते कोणास ठाऊक?

पण पंकजा मुंडे यांच्या समर्थक मंडळींना विनंती की शब्दाचे भान राखून विरोध करावा. कारण आपल्या ट्रोल ने एका स्त्रीचा सन्मान दुखावला जात आहे. आपल्या पैकी काही लोक या आधी रश्मी पुराणिक यांच्या साह्यार्थ धावून गेले होते. विरोधाला अनेक शब्द आहेत. चांगली आणि संसदीय...

ती आपण वापरू या...

 

- सुशिल कुलकर्णी

 

Similar News