साडीत असलेल्या महाराष्ट्रीयन महिलेला तिच स्वयंपाक घर कुठेच सुटत नाही हे अनेकदा ऐकलंय आणि आपल्या घरातही आपण पाहिलयं. स्वयंपाक घराशी तिचा असणारा जिव्हाळा तिला आनंद देणारा असतो. त्यात दोन महिला एकत्र आल्या की सुरु होतात त्यांच्या कौटुंबिक गप्पा-टप्पा… हे चित्र सामान्यांमध्येच नाही तर वेगवेगळ्या स्तरावरही आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. मग ते घर, दार असो किंवा लोकसभा-विधानसभा असो… महिला एकत्र आल्याकी सुरु होते त्यांच्या गप्पांची मैफिल… याचाच मला प्रत्येय आला तो म्हणजे विधानभवनातील महिला सदस्य कक्षात.
पावसाळी अधिवेशनाचे कव्हरेज करत असताना महिला सदस्य कक्षात जाण्याचा योग आला. यावेळी आमदार दिपिका चव्हाण माझ्याशी बोलताना आपल्याला विधानभवनात यायला उशीर का झाला हे सांगू लागल्या. बोलता-बोलता त्यांनी आपल्या बॅगेतून दोन लोणच्याच्या बरण्या काढल्या आणि त्यातील एक मला घेण्याचा आग्रह केला, हा आग्रह करता करता त्यांची लगबग सुरुच होती. मी त्यांना नको म्हणून सांगत असताना त्यांची फोन लावायचीही गडबड सुरु होती. माझा नकार त्यांनी हसत हसत स्विकारला आणि फोनवर बोलू लागल्या “ मी तुमची वस्तु आणली आहे तुम्ही कुठे आहात महिला कक्षात लवकर या.” त्यांचे एवढे बोल माझ्या कानावर आले पण मी फोनकडे फारसं लक्ष दिलं नाही. थोड्याचवेळात महिला कक्षात दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या मनिषा चौधरी आल्या. त्या येताच दिपिका चव्हाण यांनी लोणच्याची बरणी त्यांच्या हातात दिली आणि म्हणाल्या तुम्ही मला जे आणायला सांगितलं होतं ते मी आणायला विसरली नाही हं, आठवणीने घेऊन आले बघा. मग काय त्या दोघींच्या गप्पा सुरु झाल्या. राजकीय पटलावर एकमेकांच्या विरुद्ध उभ्या राहणाऱ्या या महिला यावेळी मात्र अगदी जवळच्या मैत्रिणींप्रमाणे गप्पा मारत होत्या.
या गप्पांमध्ये कुठेही राजकारणाच्या गोष्टी नव्हत्या. त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं होतं की त्या सत्ताधारी आणि विरोधीपक्ष नसून खूप जवळच्या मैत्रिणीचं आहे जणू . गप्पा झाल्यानंतर सभागृहात जाण्याच्या घाईत मला दोघीपण म्हणाल्या आमचा एक फोटो काढतेस का? त्यावेळी मी होकार देत या क्षणाचे साक्षकार होत मी तो क्षण कॅमेरात कैद केला.
अवघ्या १० मिनिटांचाही हा क्षण नसावा मात्र या दोघींच्या भावविश्वातील अतिशय महत्त्वाचा क्षण.कामावर जाणाऱ्या महिलांबद्दल नेहमीच शंका घेतली जाते, या घरातली कामे नीट करत नसतील, मुलांच्या सांभाळात लक्ष घालत नसतील आणि महिला आमदार म्हणजे घराबरोबरच समाजसह राजकारणाचाही साभांळ करतात त्यांच्याबद्दलच्या गैरसमजुतीला नेहमीत उधाण आलेल असते. मात्र या १० मिनिटांच्या क्षणात या सर्व गैरसमजुती पुसून जाण्याची ताकद असली तरी हे क्षण बघण्याची दृष्टी मात्र किती लोकांकडे असेल याबद्दल शंका आहे. राजकारण, पक्ष विसरुन मैत्रिणी जश्या गप्पा मारतात तसंच काहीसं विधानभवनातील आंबटगोड चित्र मला पाहायला मिळालं
प्रियंका आव्हाड
awhad.priyanka11@gmail.com
9969392653