ATM च्या समोर उभे राहून हातातील ढोल वाजवत भिक्षा मागणारी एक भटक्या विमुक्ताची महिला हा video सध्या सोशल मीडियावर विनोदी video म्हणून फिरतोय. हे किती संतापजनक आहे. काही विपरीत परिस्थितीतून विनोद निर्माण होतात पण पोटासाठी भिक मागणारी महिला तिचे तुमच्या तथाकथित विकसित व्यवस्थेविषयीचे अज्ञान असणे हा विनोदाचा विषय होऊ शकतो. ATM च्या आत कोणी व्यक्ती नसते हे तिला माहीत नाही व ती तिथे भिक्षा मागते आहे म्हणून तिची खिल्ली उडवली जात आहे.अशी खिल्ली उडविणारे लोक असंवेदनशील व वृत्तीने नीच आहेत.
तिच्या हातातच पैसे समाज म्हणून आपण कधी पोहोचू दिले नाहीत तर ती कधी बँकेत पोहोचणार आणि कधी बचत करणार व तिला कधी ATM मिळणार आणि कसे वापरतात हे कळणार ? तुम्ही शिक्षणाचा आणि रोजगाराचा पासवर्ड च तिला दिला नाही त्यामुळे तिला ATM वापरणे सोडाच पण वापरही माहीत नाही,याचे हसू येण्यापेक्षा या माणसांना आपण अजून किती कोसो मैल दूर मागे ठेवलं आहे याची माणूस म्हणून लाज वाटायला हवी, एकीकडे डिजिटल क्रांतीच्या गप्पा मारताना इकडे त्या सेवा वापरणे सोडा पण त्या अस्तित्वात असणेही ही माहीत नसलेले लोक आहेत, हे डिजिटल क्रांतीचे वास्तवावर हसले पाहिजे.. केवळ पैसे असलेले हे मशीनच निर्जीव नाही तर पैसे असणारी माणसेही निर्जीव आहेत
हे लोक आणि या महिला कोण आहेत हे आपण समजावून घेणार नाही का ? कोणतीही आर्थिक पार्श्वभूमी नाही, शिक्षण नाही,पिढ्यानपिढ्या घरात कोणी शिकलेले नाही. रोजगाराचे कोणतेही साधन नाही. अशा भटक्या विमुक्तातील हे लोक. स्वत:चे गाव हे लोक सोडून शहरात भिक्षा मागायला येतात.शहराबाहेर कुठेतरी रिकाम्या जागेत राहतात. तिथे पाल टाकून उघड्यावर या महिला सर्व गैरसोयी झेलत जगतात. दिवसभर देवाचा देव्हारा घ्यायचा आणि ढोलके वाजवत फिरायचे अशी यांची दिनचर्या. जी भिक मिळेल त्यावर गुजराण. पुन्हा मुले पळवणारी टोळी आली म्हणून राईनपाडा त ५ भटके लोक मारले ही घटनां ताजी आहे. या सर्वांना अतिशय संशयाने लोक बघत असतात. अशा स्थितीत गावोगाव हे लोक फिरत राहतात आणि सहानुभूती सोडाच पण खिल्ली उडवली जाते आहे.
https://youtu.be/5Ndwdyh-2uA