राजकारण आणि निवडणुका म्हटलं तर शरद पवार आणि बारामतीचं नाव घेतल्याशिवाय चर्चाच पुढे जाऊ शकत नाही. अशा या राजकारणाच्या पंढरी समजल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी विजयाची हॅट्ट्रीक केलीय. तब्बल दीड लाखांनी त्यांनी भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा पराभव केलाय. विजयानंतर सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली. 'श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!!' या ओळी त्यांनी ट्वीट केल्यायत.
2014 मध्ये 2009 च्या तुलनेत सुप्रिया सुळेंचं मताधिक्य मोठ्या प्रमाणात घसरलं होतं. त्यामुळं 2019 मध्ये काही दगाफटका होऊ नये यासाठी त्यांनी आधीपासूनच खबरदारी घेतली. पाच वर्षांत कार्यक्रम आणि भेटीगाठींसाठी त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला. बारामती लोकसभा मतदारसंघातील तालुक्यांमध्ये जनसंपर्क ठेवण्यावर त्यांनी सुरुवातीपासूनच भर दिला. मतदारसंघातील समस्या, लोकांचे प्रश्न सोडवून देण्याला त्यांनी प्राधान्य दिलं. मतदारसंघातला बराचसा भाग हा दुष्काळी असल्यानं त्यादृष्टीनंही सुप्रियांनी पाऊलं उचलली. जिरायती भागात त्यांनी दौरे केले. इंदापूरचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी लक्ष घातले.